सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ गुंफण नात्यांची – भाग 1 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
या दिवशी जागतिक महिला दिन जरा जास्तच दणक्यात साजरा झाला. अर्थातच कारण होत तसं. यावर्षी सगळ्या प्रमुख पदावर स्त्रियांचाच राज्य होतं. देशाचे राष्ट्रपती अर्थात राष्ट्रपत्नी महिला, पंतप्रधान महिला उपराष्ट्रपती, सभापत्नी सगळ्या खात्यांचे मंत्रिपदे महिला भूषवीत होत्या. सर्व ऑफिसेस मधून अधिकारी म्हणून महिलाच.. विद्यापीठाच्या कुलगुरू महिला, सर्व प्राध्यापक वर्ग महिला, पोलीस प्रमुख पदी ही महिलाच, जिकडे पाहावे तिकडे महिला राज्य..
सगळीकडे आनंदोत्सव साजरा होत होता. सगळ्या प्रमुख इमारती फुलांच्या माळांनी सुशोभित केल्या होत्या. झगमगत्या दिव्यांची रोषणाई केली होती. रात्री फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम निश्चित झाला होता. साठ-सत्तर वर्षांपूर्वी असणारे चित्र आता पार पालटून गेले होते. त्यावेळची अबला आता खऱ्या अर्थाने सबला बनली होती. यात सहलेने अवघ्या पुरुष वर्गाला नामोहरम केले होते. समाजात मान वर करून ताठ मानेने हिंडण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. पुरुष प्रधान संस्कृती पूर्णतः लोप पावली होती. संपूर्ण समाज बदलून गेला होता. पूर्वीची जातिव्यवस्था संपून गेली होती. फक्त दोनच जातींची दखल घेतली जात होती; ती म्हणजे स्त्री जात आणि दुसरी पुरुष जात. विशेष म्हणजे या दोन्ही पैकी स्त्री वर्गाचे सगळीकडे वर्चस्व होते. अर्थात हे तिला सहजासहजी मिळाले नव्हते. हा बदल, हे परिवर्तन घडवण्यासाठी अनेक पिढ्यांनी निकराची झुंज दिली होती. यामुळेच हा जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणावर साजरा होत होता.
या उलथापालथीमध्ये राज्यांच्या नावावर पण हल्ला झाला होता. महाराष्ट्राचे नामकरण ‘माय-मराठी’ असे झाले होते. मुंबई मुंबईच राहिली होती. ते पुणे बदलून ती ‘पुण्यनगरी’ झाली होती. सोलापूरचे सोलापूर नाव हद्दपार होऊन त्याऐवजी ‘साली सिटी’ अशी नवी ओळख झाली होती. सांगलीचे नाव बदलायची जरूर नव्हती. आई जगदंबेचे कोल्हापूर; ते ही तसेच राहिले होते. काही महिला संघटनांना कोल्हापूर हेच नाव बरोबर वाटत होत तर काहींच्या मते ‘ते कोल्हापूर’ असा उच्चार होत असल्याने ते योग्य वाटत नव्हते. महिलांच्या बहुमताप्रमाणे ‘करवीरनगरी’ असेच नाव त्यांना हवे होते. त्यांच्यामते जेथे करवीर निवासिनी राहते, वसते ती; हो हो: ती करवीर नगरी! हो-ना करता करता अखेर ‘करवीर नगरी’ या नावावर शिक्कामोर्तब झाले. अजूनही कराड, सातारा, नागपूर, चंद्रपूर अशा अनेक गावांचा नावांच्या नावांचा बदल करण्याचा विचार सुरू होता. दूरचित्रवाणीच्या अनेक महिला चॅनल वर यासंदर्भात चर्चा सुरू होती. पुण्यनगरी मध्ये रस्त्यांची नावे सुद्धा बदलली होती. प्रसिद्ध बाजीराव रस्ता आता मस्तानी रस्ता झाला होता. ऐतिहासिक सदाशिव पेठ आता सदाशिव पेठ राहिली नव्हती. ती पार्वती पेठ झाली होती. जिथेजिथे स्त्रीवर्गाचा झेंडा फडकणे शक्य होते तिथे तिथे तो फडकत होता.
सगळा समाज ढवळून निघाला होता. महिलाराज असल्यामुळे खून, दरोडे, चोऱ्या यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली होती. पण साध्या साध्या गोष्टींवरुन भांडणे, रुसवेफुगवे यांना ऊत आला होता. राज्यसभेत साड्याचे, हेअर स्टाईल असे विषयही भांडणांना पुरेसे ठरत होते. सगळ्या आमदाराणींना चारचाकी गाड्या मिळाल्या होत्या. सगळ्यांनी आपापल्या गाडीवर आपल्याच पतिराजांना चालक पदावर नेमले होते. वरवर सगळे सुस्थितीत चालले असले तरी ते काही खरे नव्हते. पुरुष वर्गाची विलक्षण कुचंबणा होत होती. त्यांच्या अस्तित्वाला काही महत्त्वच उरले नव्हते. विज्ञान तंत्रज्ञान आणि मेडिकल सायन्स इतके पराकोटीचे पुढारलेले होते की गर्भधारणा होण्यासाठी सुद्धा पुरुषाची गरज स्त्रीला भासत नव्हती. बायोटेक्नॉलॉजी च्या नवनवीन शोधांमुळे टिशू कल्चर, स्टेम सेल्स यांच्या वापरामुळे मिलना शिवाय जीव तयार करण्याचे तंत्र विकसित झाले होते. बहुतांश स्त्रियांना हाच पर्याय सोपा वाटत होता.
© सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर ८४८२९३९०११
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈