सौ.मंजुषा आफळे
कवितेचा उत्सव
☆ प्रभात फेरी ☆ सौ. मंजुषा आफळे ☆
सोनपिवळी पहाट
सौरदिवा तेवतोय
वासुदेव अजूनही
दवबिंदू झेलतोय
अजरामर प्राचीन
भारतीय लोकधारा
खेडोपाडी अजूनही
वाहतो मंजुळ वारा
विकासाच्या वाटेवर
वासुदेवही धावले
गाणी गात घरोघरी
आकाशवाणीत भेटले
गंधाळलेले सुस्वर
रामप्रहरी ऐकता
ईश्वराची भेट घडे
भूतकाळाची सांगता
महत्त्व दानधर्माचे
सांगती शुभशकुन
वासुदेव हो निघाले
येता सूर्यनारायण
धुके हळूच विरता
नवीन आशा उमंग
मनातल्या गाभाऱ्यात
शितल भावतरंग
प्रभात फेरी ही न्यारी
भेट ती जिवाशिवाची
अमर ही परंपरा
स्वाभिमानी भारताची.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈