??

☆ वृद्धत्व श्रावणबाळाचे !! …’स्नेहसावली’ संस्थांतील एक समाजसेवक ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा नितांत सुंदर अभिनय असलेला “नॉट आऊट १०२” हा चित्रपट बघण्यात आला. अमिताभ १०२ वर्षांचा व त्याचा मुलगा ऋषी कपूर ७५ वर्षाचा. ऋषी कपूरला सतत आपण म्हातारे झालेलो आहोत असे वाटत असते. तर अमिताभला १०२ व्या वर्षीदेखील आपण तरुण आहोत व जीवन मुक्तपणे अनुभवत मजेत जगले पाहिजे असे वाटत असते. ह्या दोघांच्या विरुद्ध मानसिकतेमधून जो गोंधळ निर्माण होतो त्यामुळे चित्रपट खूप मनोवेधक बनला आहे. ह्यात अमिताभ आपल्या मुलासाठी वृद्धाश्रमाचा शोध घेत असतो.

असाच काहीसा एक वेगळा अनुभव मला ‘ स्नेहसावलीत ‘ आला —– 

एक ७५ वर्षांचे आजोबा चौकशीकरता संस्थेत आले. त्यांना माझ्याशीच बोलायचे होते. किरकोळ देहयष्टी, शरीरावर जाणवणारा मानसिक थकवा, जाड भिंगाचा चष्मा, हातात काठी असे हे आजोबा अत्यंत चिंतातूर स्वरात विचारात होते,– “ डॉक्टर इथे अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाईल ना हो? ‘  मी म्हणालो, “ आजोबा अजिबात काळजी करू नका. इथे तुमची उत्तमरीत्या काळजी घेतली जाईल.” त्यावर ते म्हणाले, ” नाही नाही डॉक्टर, मला माझ्यासाठी नाही, तर माझ्या आईला इथे ठेवायचे आहे जिचे वय आता ९८ वर्षे आहे. आम्ही घरी दोघेच असतो.  १० वर्षांपूर्वी माझी बायको कर्करोगाने गेली. माझा मुलगा परदेशात असतो. मी आणि आई दोघेच घरी असतो. आई अगदी ठणठणीत आहे.  कुठलाही आजार नाही तिला.  फक्त आताशा कमी ऐकायला येते.” 

मी आश्चर्यचकित होऊन विचारले,” अहो मग आत्ताच तुम्हाला त्यांना इथे का ठेवावे वाटत आहे? ”  “ त्याचे काय आहे डॉक्टर, मला मागच्या वर्षीपासून हार्टचा त्रास होत आहे, दमही लागतो आहे. मला जर काही झाले तर तिच्याकडे कोण पाहणार? माझ्या जन्मापासून आज ७५ वर्षे आम्ही एकत्र राहत आहोत. मला आईची खूप काळजी वाटते. आजकाल माझ्याच्याने तिची सेवा करणेही होत नाही.”  

त्यांचा हा अनुभव ऐकून मी खूपच  आश्यर्यचकित  झालो. मी सहज आजोबांना म्हणालो–”  मग तुम्ही आणि आई एकत्रच इथे स्नेहसावलीत का नाही राहत?”  त्यावर त्यांचं उत्तर खूपच मनाला भिडणारं होतं – “अहो माझ्या आईला जी माझी सतत सोबत असण्याची सवय आहे ती मोडायची आहे. उद्या मला काही झाले तर ह्या वयात ती हे दुःख सहन करू शकणार नाही. ती जशी आज ठणठणीत आहे, तशीच शेवटपर्यंत असावी अशी माझी इच्छा आहे. मलाही तिला इथे सोडताना खूप दुःख होणार आहे. पण तिला माझ्याशिवाय राहण्याची पण सवय झाली पाहिजे.”  हे ऐकून मी अगदी सुन्न झालो. मुलांकडून आईवडिलांकडे दुर्लक्ष  केल्या जात असणाऱ्या ह्या काळात एक ७५ वर्षाचा मुलगा ९८ वर्षाच्या आईच्या मनाची एवढी काळजी घेताना बघून मानवी नात्यातील घट्ट वीण आणि ती धरून ठेवताना स्वतःला विसरून, प्रसंगी त्रास सहन करूनदेखील दुसऱ्यांचे मन जपण्याचा अट्टाहास करणारे लोक पाहिले की चांगुलपणाच्या पराकोटीत्वाची जाणीव होते…!!

लेखक : – “स्नेहसावली“ या संस्थेतील एक समाजसेवक 

संग्राहक : – श्री अनंत केळकर 

≈ संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments