सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ जीवनामृत ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
थेंब थेंब हा पाण्याचा
हिऱ्या मोत्याच्या तोलाचा
जपू त्याला जीवापाड
खरा आधार जीवाचा ||
पाण्यासाठी डोळा पाणी
पाण्याविना होई ऱ्हास
पाणी रक्षी जीवनास
रक्षू आपण पाण्यास ||
पाणी हवे जगण्याला
कोंब उगे जळापोटी
पाणी अडवूनी भरू
माय धरणीची ओटी ||
पावसाच्या धारांतुनी
करी जीवन संवाद
चराचरा व्यापितसे
माय धरेचा आनंद ||
ध्यानीमनी जपू एक
मंत्र खास प्रगतीचा
पाणी अडवू जिरवू
मार्ग राष्ट्र विकासाचा ||
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈