श्री रविंद्र सोनवणे
अल्प परिचय
नाव : रवींद्र प. सोनावणी
कार्यक्षेत्र: राष्ट्रीय संगीत, नाट्य केंद्र, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१
ध्वनी मुद्रण +प्रोजेक्शन शाखेत १९७७-२०१३ कार्यरत
छंद : वाचन- थोरांची आत्मचरित्र – कविता कै. पु. ल. देशपांडे + कै. अशोक रानडे (या दिग्गजांचा सहवास)
१० फेब्रुवारी – २०१३ निवृत्त
को. म. सा. प पाली बल्लाळेश्वर काव्यस्पर्धेत प्रथम क्रमांक ( २०१२)अनेक कवि संमेलनात सहभाग.
कवितेचा उत्सव
☆ देवा गणेश देवा…. ☆ श्री रविंद्र सोनवणे ☆
देवा गणेश देवा तू सृष्टीचा नियंता
आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता
श्वासात तूच आहे
हृदयी तुझाच वास
चोचीत पाखरांच्या
तू भरवितोस घास
स्वामी चराचराचा आदर्श तू विधाता
आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता
दे शक्ती बुद्धी विद्या
दे ध्यास सद्गुणांचा
वरदान दे प्रभू रे
व्हावी विनम्र वाचा
देतोस मुक्तहस्ते तू एकमेव दाता
आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता
पुष्पातला सुवास
मकरंद तु पराग
झुळझुळ वाहणारा
तू रंग अन तरंग
देहात जागणारा चैतन्यदायी आत्मा
आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता
माता पित्यास आम्ही,
तुझिया रूपात पाहू,
श्रम शक्तीच्या पूजेला
सारे आयुष्य वाहू
अस्तित्व जाणवावे तव गीत गात असता
आम्ही मुले तुझीही नमितो तुला अनंता
© श्री रविंद्र सोनवणे
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
भ्रमणध्वनी : ९२२२०५३४३५/८८५०४६२९९३
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈