श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ फिदा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
चुकेन मी,चुकशील तू,माहित होते तुला मला जर
तक्रारीची कशास भाषा,चालून येता इतुके अंतर
उणे अधिक जे घडून गेले,तुलाही ठावे,मलाही ठावे
नकळत सारे घडून गेले,मनात नव्हते कुठले कावे
क्षमायाचना नकोच , नकोच आता व्यक्तही दिलगीर
खेळ कशाला शब्दांचा हा असेच होते घडायचे जर
मुले,माणसे,नाती-गोती,मित्रांचा हा परिवार असे
रमून गेलो त्यातच आपण,थांबायाला सवड नसे
शंख शिंपले आठवणींचे किना-यावरी झाले गोळा
जपून सारे ठेवायाचे , हीच असे ती आली वेळा
लाटेवरती लाटा झेलत तू ही आलीस, मी ही आलो
जरी सरकली वाळू तरीही कधीच नाही वाहत गेलो
असेच राहू चालत आणिक अशीच ठेवू साथ सदा
अताजराशी ओळख झाली चल परस्परांवर होऊ फिदा
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈