श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ रानमेवा ☆
पंख मनाला फुटावे मला जाता यावे गावा
माझी प्रार्थना येवढी स्वीकारावी माझ्या देवा
माझं माहेर हे खेडं त्याचं मनाला ह्या वेड
माझ्या सोबत वाढलं सोनचाफ्याचं ते झाड
किती दूर गेलं तरी मनी गंध आठवावा
काट्यातली पाय वाट होती नागिनी सारखी
काटे टोचती पायाला तरी होते त्यात सुखी
त्याच धुळीच्या वाटेचा मला वाटतोय हेवा
थाटमाट शहराचा माया ममतेला तोटा
लेप चेहऱ्यावरती आत मुखवटा खोटा
अशा खोट्या सौंदर्याचा मला मोह कसा व्हावा
किती दिसाचे ते अन्न सांगा असेल का ताजे ?
रोज खातात मिठाई शहरातले हे राजे
रोज दिवाळी साजरी त्यात नाही रानमेवा
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈