सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ संस्कार ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

राधाबाई गोपाळराव गद्रे हे त्यांचे नाव! गोपाळराव म्हणजेच आप्पा! राधाबाई हे त्यांचे नाव कधी वापरात आलेच नसावे. त्यांच्या लग्नानंतर सुरुवातीला त्या धाकट्या वहिनी होत्या. पण दिरांची जसजशी लग्ने होत गेली,तशी त्या धाकट्या वहिनी पण राहिल्या नाहीत आणि कालांतराने त्यांचे आप्पा वहिनी,आप्पा मामी, आप्पा काकू, किंवा सुनंदा नाहीतर दिलीपची आई ,अथवा वृंदाच्या सासुबाई असे नामाभिधान झाले.

तर हे त्या आप्पा वहिनींचे मी रेखाटलेले चित्र…… अतिशय कमी, कामापुरतेच बोलणाऱ्या… हो-नाही मानेनेच म्हणणाऱ्या , आप्पा वहिनी!… “तिचा शब्द म्हणजे अगदी शंभर रुपये तोळा.”असं कधीतरी मी सासुबाईंकडून ऐकलं होतं.

त्यांना खळखळून हसताना…. जोरजोरात गप्पाटप्पा करताना…. कडाडून भांडताना… दंगा करणाऱ्या आपल्या मुलांवर संतापून ओरडताना…. किंवा सुनेबरोबर आवाज चढवून तू तू मैं में करताना… एकूणच वातावरण कधी कर्कश्य तर कधी नादमय करताना…. बहुतेक कुणी पाहिलं किंवा ऐकलं ही नसेल. चेहऱ्यावर कायम एक हलकसं स्मित हास्य… बस तेवढंच! त्यामुळे त्या एक शांत, संयमी व्यक्तिमत्वाचा धनी वाटायच्या.

माझ्या लग्नाला चार-सहा महिनेच झाले होते. मी दिल्लीहून माझी बँकेतली नोकरी सोडायला सांगलीला आले होते. त्यांनी मला एकदा जेवायला बोलावले होते.’ ‘जावेला मदत करून इम्प्रेशन मारूया,’ असा विचार करून मी जरा लवकरच त्यांच्या घरी पोहोचले. स्मितहास्याने  माझे स्वागत झाले. पण बघते तो काय इतर सगळे स्वयंपाकाचे काम संपून स्वयंपाक- काकू पुऱ्या तळत होत्याआणि आम्हा दोघींना करण्यासारखे कोणतेच काम शिल्लक नव्हते. मग कॉफी पिता पिता मी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की मी एकटीच बडबडतेय… आमच्यात संवाद होतच नाहीय. कारण समोरची व्यक्ती फक्त ‘ गुड लिसनर’  आहे. हे बघून मूड खराब झाल्याने मी गप्पच बसले….मला जांभया येऊ लागल्या.तेवढ्यात एक मासिक आणून त्यांनी माझ्या हातात ठेवले.”बस वाचत, जेवायच्या वेळेपर्यंत” असं म्हणून त्या तेथून निघूनही गेल्या. जेवताना त्या सहजच बोलून गेल्या कि त्यांना रहस्यकथा,हेर कथा वाचायला खूप आवडतात. तेव्हापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात खूप गुढ, गहन, गंभीर काहीतरी आहे, असं मला सारखं वाटत आलंय.

त्या अशा अबोलीचं फुल होऊन कशा राहू शकतात?.. हा विचार करताना मला असं वाटायला लागलं की भगवद् गीतेतत स्थितप्रज्ञाची जी लक्षणे आहेत, ती त्यांच्यावर बरोबर फिट् बसतात. ‘न उल्हासे न संतापे ‘.. किंवा ‘सुख-दुःख समे कृत्वा लाभा लाभौ जयाजयौ’.. इत्यादी, इत्यादी…..

खरंच, त्या एका स्थितप्रज्ञाचंच आयुष्य जगल्या. संसाराच्या रहाट-गाडग्यात अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सर्वांसारखंच त्यांनाही तोंड द्यावं लागलं. पण नेहमीच्या चिरपरिचित हास्यानंच त्या त्यांना सामोऱ्या गेल्या. कधी त्याबद्दल कोणाकडे तक्रारही केली नाही.

वृद्धावस्था आली. पंच्याहत्तरीपर्यंत व्यवस्थितच होत्या. हळूहळू विस्मरण होऊ लागलं. पण वयाचा विचार करतात ते नॉर्मल होतं. खरी दैव लीला पुढंच आहे. तो वरती बसलेला क्रीडाशिक्षक, नाटककार माणसाला काय काय खेळ  खेळायला, नाटकं करायला भाग पडतो ते सगळं अतर्क्यच असतं.

जन्मभर मौन व्रत धारण करायला लावणाऱ्या त्या मातेला देवानं नंतर अखंड बडबड करण्याचं व्रत करायला भाग पाडलं. या खेळाची वेगळीच इनिंग चालू झाली. स्वतः लहान मुलगी असल्यासारखं बडबडणं, मुलाला बाबा बाबा म्हणून भरवायचा हट्ट करणं, अशी नाटकंही सुरू झाली. त्यामुळं त्या एका वेगळ्याच विश्वात वावरत आहेत असं सगळ्यांना जाणवू लागलं. दिवसेंदिवस याची तीव्रता वाढतच गेली.  जाग्या असेपर्यंत अखंड, अविश्रांत बडबड,… प्रथम वाक्यं होती,…नंतर शब्द थोडे तरी कळणारे!… त्यानंतर असंबद्ध बडबड,…. ओरडणे, दूरपर्यंत ऐकू जाईल असे…. आणि थकून गेल्या की झोपी जाणे!…. जवळजवळ अडीच वर्षं या बडबडव्रताचे पालन चालू होतं.

मला सांगायची संस्कार ही गोष्ट या पुढंच आहे.साधारण दोन वर्षांपूर्वीची गोष्ट..संक्रांतीचा दिवस…. वडीलधाऱ्यांना त्यांच्याकडे जाऊन तिळगुळ देऊन नमस्कार करायची माझी पद्धत. त्या प्रमाणे त्यांच्या खोलीत गेले…. बसलेल्या होत्या.. थोडासा तिळगुळ त्यांना भरवला आणि नमस्कार करायला वाकले,…. क्षणार्धात एक आशिर्वाद देणाऱ्या हाताने माझ्या डोक्याला स्पर्श केला. चमकून मी वर बघितलं .तर एक नेहमीपेक्षा वेगळेच प्रसन्न हास्य चेहऱ्यावर धारण केलेली ती महिला मला मुकेपणाने खूप चांगलं काहीतरी सांगून गेली होती. जिला शब्दातून भावना व्यक्त करता येत नव्हत्या, तिची देहबोली खूप काही सांगून गेली होती.

हे सगळं माझ्या मनाला इतकं स्पर्शून गेलं आणि जो एक अवर्णनीय आनंद मला झाला त्याला तोड नाही. विचार करणारी बुद्धी आणि भावना व्यक्त करणारं मन ज्या मेंदूत( हृदयात नाही.) असतं, त्या मेंदूनं प्रतिक्रया द्यायलाही त्यांना समर्थन केलं होतं. आणि  त्यांना एका वेगळ्या विश्वात नेऊन ठेवलं होतं. त्या मेंदूला हुलकावणी देत आणि वाकुल्या दाखवत त्यांनी मी केलेल्या नमस्काराचं डोक्यात हात ठेवून दिलेले उत्तर, मला वेगळाच संदेश देऊन गेलं.याला विज्ञानाच्या भाषेत प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणत असतील ही, पण मला वाटलं की हा एक संस्कार होता. त्यांच्या शरीरावर लहानपणापासून झालेला संस्कार! कितीतरी वेळा असे आशीर्वाद त्यांना मिळाले असतील आणि त्यांनी दिले ही असतील. आणि  सगळं काही विसरून बसलेल्या त्या… पण त्यांच्या शरीरानं त्यांच्या हाता कडून मेंदूला आणि अप्रत्यक्षपणे त्या परमेश्वराला पण हूलकावत आशीर्वाद देण्याचा संस्काराची जणू पूर्तीच केली होती. हे संस्कार कधी शिकून, वाचून, प्रयत्न करून येत नाही तर जीवनानं शरीराला त्याच्या नकळत दिलेली ही एक देणगी असते.

आता आप्पावहिन या जगात नाहीत. पण गेल्या दोन वर्षापासून जेव्हा कधी मला त्यांची आठवण येते तेव्हा तो आशीर्वादाचा हात आणि त्यांची त्यावेळची अतिप्रसन्न मुद्राच माझ्या डोळ्यासमोरून तरळून जाते…. आणि पुढेही जाईल.

* समाप्त *

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments