श्री उदय गोपीनाथ पोवळे
मनमंजुषेतून
☆ मी, माझी मैत्रीण आणि…. साठीची ताकद – भाग 1 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
(मागील भागात आपण पहिले – . ” मनात मी खुश झालो होतो पण साठीच्या ताकदीने मनातली ख़ुशी काही मी चेहऱ्यावर न आणता चंदाला “भेटू ८.३० वाजता” असे बोलून बाय केले. इथून पुढे )
ठीक ८.३० वाजता मी एकदम टकाटक होऊन, अंगावर परफ्युम मारून चंदाच्या रूमच्या बाहेर उभा ठाकलो. तोंडात माऊथ फ्रेशनर मारला. आज साठीची ताकद जाणवत होती. जुन्या मैत्रिणीला हॉटेलमधल्या एका रूममध्ये भेटायचं आणि ते पण बायकोच्या परमिशनने. एकदम भारी वाटत होते. सरिताचा माझ्यावरचा विश्वासच आज माझी आणि चंदाची भेट करून देत होता. चंदाच्या रूमची बेल मारली आणि चंदाने लगेच दरवाजाही उघडला. आत गेलो तर जरा हिरमुसला झालो. मला वाटले होते चंदा एकटी असेल पण रूममध्ये तो पण होता. तो…पवन राठी. टकल्या… पवन राठी. मी आत मध्ये गेलो तसा तो उठला आणि बाहेर जायला निघाला. चंदाने त्याला थांबवायचा खोटा आग्रह केला पण त्यानेही त्याची कोणीतरी वाट बघतंय असे सांगितले आणि तो बाहेर पडला. चंदाने आमच्या ड्रिंक्सची मस्त तयारी करून ठेवली होती. तिनेच सराईतासारखे दोन ग्लास भरले आणि आम्ही चिअर्स केले. नंतर जवळ जवळ अर्धा तास आमच्या शाळेतल्या आठवणी काढत गप्पा रंगल्या होत्या. गप्पांच्या आणि शाळेतल्या मित्र मैत्रिणींच्या आठवणी काढत चंदाने भरलेला दुसरा पेग मी कधी संपवला मलाही कळले नाही. चंदा आणि मी मुक्तपणे, हसत खिदळत जुन्या आठवणींना उजाळा देत होतो. ‘ हम तुम एक कमरेमे बंद हो, और चाबी खो जाये ‘ हे गाणे आम्ही खूप वर्षांनी परत एकदा गायलो. एक तासाने म्हणजे ९.३० ला चंदाने मला सांगितले, ” चल…. आता आपण तुझ्या रुमवर जाऊया. सरिता बिचारी एकटी असेल तिलाही आपल्या गप्पांमध्ये सामील करूया.” चंदाचा असा यु टर्न मला अनपेक्षित होता. “अग सरिता आता झोपली असेल. तिला लवकर झोपायची सवय आहे. नको उगाच तिला आता उठवायला” असे मी बोलत असतानाच अजून मला काही बोलायची संधी न देता माझा हात धरून ती मला तिच्या रूमच्या बाहेर घेऊन आली. पुढच्या दुसऱ्या मिनिटाला आम्ही माझ्या आणि सरिताच्या रूमच्या बाहेर उभे होतो. अजूनही मी चंदाला समजावत होतो ” अग नको उठवूया तिला. झोपेतून उठवलेले तिला नाही आवडत.” मी बोलेपर्यंत माझ्या शर्टच्या खिशातले डोअर कार्ड काढून तिने आमच्या रूमचा दरवाजा उघडला आम्ही आत मध्ये गेलो आणि ……
आणि मी बघतच राहिलो. तो ….. तो चंदाचा मित्र पवन …टकल्या पवन राठी. तो आणि सरिता हसत खिदळत गप्पा मारत होते. त्यांचेही ग्लास भरलेले होती. हे काय चालले आहे ते मला काही कळत नव्हतं. आता त्यांच्यात चंदाही सामील होऊन ते तिघे जोर जोरात हसत होते आणि मी नुसता वेड्यासारखा त्यांच्याकडे बघत होतो.
सरिता, चंदा आणि पवन हे तिघेही एकाच कॉलेजचे. पवन आणि सरिता हे एकाच बॅचचे. पवन गुप्ते आणि चंदा ह्यांचे लव्ह मॅरेज झाले. गेल्या महिन्यात त्यांच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींचे रियुनिअन होऊन जेंव्हा ते तिघे एकमेकांना भेटले तेव्हा चंदा आणि सरिताच्या बोलण्यातून सरिताला समजले की मी माझी चंदा, शाळेतल्या मैत्रिणीचा जो उल्लेख करतो ती हिच चंदा आहे आणि तिघांनी मिळून ही आजच्या भेटीची आखणी केली आणि माझा पोपट केला. हे सगळे समजल्यावर मलाच माझे हसू आले आणि माझ्या संयमी स्वभावानेच आज माझी साठीची ताकद शाबूत ठेवली ह्याची जाणीव झाली.
हो आणि एक खरं सांगू का….. शाळेत असताना चंदाने मला तिचा बेस्ट फ्रेंड म्हणून निवडले असले तरी माझी बेस्ट फ्रेंड ती पल्लू … पल्लवी कामत होती…. तिचा काही तपास लागतो का बघायला पाहिजे.
चला आता परत एक ग्लास भरून चिअर्स करून माझ्या बायकोच्या त्या टकल्या मित्र आणि जाड्या मैत्रिणी बरोबर डिनरला जायला लागेल.
समाप्त
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
मो. नं. ९८९२९५७००५.
ठाणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈