श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ जगणे आपुल्याच हाती..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

मानवीजीवन आजच्या तुलनेत पूर्वीचं चांगलं होतं का? आणि उद्याचं कसं असेल? चांगलं की वाईट? यावर चर्चा होत असताना ‘जुनं ते सोनं’ असं सर्रास ठासून सांगितलं जातं. हे खरं तर मला खूप एकांगी वाटतं.चांगलं म्हणजे काय? जे मनाला भावते, आनंद, समाधान देते ते. मन प्रसन्न करते ते.

इच्छा-आकांक्षा मनाशी बाळगून स्वप्नं पहातच प्रत्येक जण जगत असतो. इच्छापूर्ती मनाला समाधान देते. इच्छा पूर्ण नाही झाली तर अर्थातच मन उदास होते.स्वप्नांचंही तसंच. एखादं स्वप्न मनाशी बाळगून त्या दिशेने वाटचाल सुरू केली की माणूस जिवापाड प्रयत्न, कष्ट करीत रहातो.ध्येयपूर्ती स्वप्न सत्यात उतरल्याचं समाधान देते. प्रयत्न प्रामाणिक नसतील, परिस्थिती अनुकूल नसेल, तर या वाटचालीत येणाऱ्या अपयशामुळं स्वप्नभंगाचे दुःख मनात घर करुन रहाते.

जगण्याचे कांही कालातीत नियम आहेत.पेरल्याशिवाय उगवत नाही आणि जे पेरु तेचं उगवतं हा भूत, वर्तमान, भविष्य या त्रिकाळातील जगण्याला सारखाच लागू पडणारा एक महत्त्वाचा नियम.

मानवी जीवन म्हणजे सुखदुःख, यशापयश, अनुकूलता आणि प्रतिकूलता या साऱ्यांचा पाठशिवणीचा खेळच असतो. आणि इतर खेळांसारखाच हा खेळही खिलाडूवृत्तीने खेळणेच अपेक्षित असते. तरच या खेळातील हार किंवा जीत सारखाच आनंद देते.

काळ भूत, वर्तमान,भविष्य कोणताही असो या जीवन प्रवासाचे नियम सारखेच असतात. त्यामुळे मानवी जीवन भूतकाळात कसं होतं?चांगलं की वाईट याचं उत्तर हे किंवा ते इतकं सरळ साधं असूच शकत नाही. शिवाय मानवी जीवन चांगलं कि वाईट हे आपण आपल्या वर्तमानाच्या तुलनेतच ठरवणार असतो. त्यामुळे आजच्या तुलनेत तेव्हा काय चांगलं होतं किंवा वाईट होतं याचा विचार करणे हे ओघानंच आलं.आणि असं झालं तर त्यातून मिळणारं उत्तर फसवंच असणार.कारण भूतकाळातला ‘मी’ आणि वर्तमानकाळातला ‘मी’ दोन्ही एकच व्यक्ती असूनही परस्पर भिन्न व्यक्तिमत्त्वे वाटावीत इतका जमीन-अस्मानाचा फरक आपल्यात पडलेला असतो. काळानुरूप होत गेलेले, स्वीकारले गेलेले जीवनशैलीतील बदल आता अंगवळणी पडलेले असतात. त्यामुळे घराचं घरपण, नात्यांची घट्ट वीण, आपले प्राधान्यक्रम, खानपानाच्या सवयी, या सगळ्यातच आमूलाग्र बदल झालेला असूनही जर आज मी आनंदात असेन आणि आजच्या सुखसोयी,स्वास्थ्य, आर्थिक सुबत्ता, वैचारिक स्वातंत्र्य, हे सगळं इतक्या मुबलक प्रमाणात तेव्हा नसतानाही तेव्हासुध्दा जर मी आनंदात असेन तर तो आनंद नेमका कशामुळे निर्माण होत होता याचा मूलभूत विचारच आपल्यापुढील प्रश्नाचे नेमके उत्तर शोधायला मदत करू शकेल.

काळ कोणताही असो आपण जगतो कसे यावरच आपल्या जीवनाची गुणवत्ता अवलंबून असते. म्हणूनच मानवी जीवन चांगलं किंवा वाईट हे नेहमीच व्यक्तिसापेक्ष असतं. तरीसुद्धा सर्वांसाठीच आनंदापेक्षाही कृतार्थता जास्त मोलाची असते. आयुष्याच्या संध्याकाळी, मागे वळून पाहताना आपल्या जगण्याचा लेखाजोखा मनोमन मांडत असता जर मनाला कृतार्थ समाधान मिळालं तरच आपलं भूतकाळातलं जीवन चांगलं होतं असं म्हणता येईल.ती कृतार्थता नसेल तर मात्र ते चांगलं असू शकणार नाही.

आपण कसं जगायचं हे आपल्याच हाती असतं. अनुकूल परिस्थिती असूनही जे नाही त्याबद्दल दुःख करत बसणारी माणसं जशी असतात तशीच प्रतिकूल परिस्थितीतही संकटांशी हिमतीने दोन हात करीत जगताना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद शोधत, सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करताना त्यांच्याही आयुष्यात आनंद पेरीत समाधानानं जगणारी माणसेही असतात. या दोन परस्पर विरुद्ध प्रवृत्ती म्हणता येतील. या प्रवृत्तींनुसार जीवन चांगलं किंवा वाईट असणार हे ओघानंच आलंच. आणि याच दोन्ही प्रवृत्ती भूत, वर्तमान, आणि भविष्यकाळातही असणारच आहेत.

कृतार्थतेचा आनंद मिळवण्यासाठी आयुष्यभर कालातीत महत्त्व असणारी जीवनमूल्ये असोशीने सांभाळणे अगत्याचे आहे. हे जर घडलं तरच आजच्या बालपिढीचं भविष्यकाळातील मानवी जीवन नक्कीच सुखकर, चांगलं असेल. पण त्या जीवनमूल्यांचे संस्कार करण्याची जबाबदारी मात्र आपल्यासारख्या अनुभवाने ‘शहाण्या’ झालेल्या पिढीचीच आहे हे विसरून चालणार नाही. 

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments