प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर
कवितेचा उत्सव
☆ मुकी होऊन जगतात माणसं….! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
हल्ली बोटानेच अशी सारी बोलतात माणसं
टच् स्क्रीनशीच हितगुज साधतात माणसं.
अक्षरांच्या गोतावळ्यात मुकेच शब्द सारे
मुक्यानेच भावनांना व्यक्त करतात माणसं.
समोरुन जरी आला कुणी शब्द उसने घेऊन
फोनवर नंतर बोलू म्हणून टाळतात माणसं.
हल्ली म्हणे संवाद कमी झालेत एकमेकांशी
अभासी दुनियेलाच आपलसं करतात माणसं.
चेहरा फक्त स्वतःच्याच सेल्फी पुरता हसरा
स्टिकर्स-इमोजीनेच भाव दाखवतात माणसं.
सुख दुःखाना असं मोबाईल मध्ये सजवुन
बंदिस्त चौकटीत स्वतःलाच कोंडतात माणसं.
बोटांची भाषा बोटांनीच केलेले बोटांचेच नखरे
आपल्यासारखीच मुकी होऊन जगतात माणसं.
© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर
बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
मो ९४२११२५३५७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈