सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ क्षण ☆ सौ राधिका भांडारकर ☆
दिवस कितीआनंदाचे
दिवस किती मजेचे
मुठीत जपले मस्त सारे
सोनसळी क्षण अपार सुखाचे…
घर कसे भरुन गेले
कमळापरी फुलून गेले
हळुवार तिचे गोड बोलणे
घरभर तिचे मुक्त बागडणे…
बागेतली फुले पाने मोहरली
गच्चीतला झोपाळा झुलला
निशीगंधाचा सुवास घमघमला
कोपरा कोपरा चैतन्यमय झाला…
रिकामे कपाट कसे ओथंबले
तिचे कपडे खेळ पुस्तके
चादरी चुरगळल्या वस्तुंनी जागा सोडल्या
तिच्या अस्तीत्वाने घर भरले इतके…
पुन्हा एकदा शैशव रंगले
दारे खिडक्या भींती बोलल्या
मनातले वारे मोकळे झाले
सुखावले स्पर्शाने गंधभरल्या….
मात्र निरोपाचा हात अटळ
ओठावर हंसु गच्च भरले डोळे
परतली ती तिच्या विश्वात
मी मात्र जपून आहे पोकळीतले
आनंद खुळे….
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈