सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
इंद्रधनुष्य
☆ चूको मत चौहान – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(आणि घौरी आपल्या उच्च आसनावर विराजमान झाला !) इथून पुढे —-
चंद बरदाईच्या निर्देशानुसार सात मोठ्या लोखंडी तव्यांना ठराविक दिशेने व अंतरावर ठेवण्यात आले होते…. पृथ्वीराजांचे डोळे काढून आंधळे करण्यात आले असल्याने त्यांना चंद बरदाई च्या साहाय्याने दरबारात आणले गेले. घौरीला “शब्दभेदि बाणाचे दृश्य” नीट पाहता यावे म्हणून त्याच्या उच्च स्थानासमोरील मोकळया जागेत पृथ्वीराजांच्या बसण्याची सोय करण्यात आली होती… ते स्थानापन्न झाल्यावर त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण देण्यात आले…
चंद बरदाई घौरीला म्हणाला,”खाविंद, माझ्या राजांचे साखळदंड आणि बेड्या काढण्यात याव्यात, जेणेकरून त्यांना आपल्या या अद्भुत कलेचे प्रदर्शन करता येईल”
घौरीला त्यात काहीच धोका वाटलं नाही कारण, एक तर पृथ्वीराज डोळ्याने ठार आंधळा… चंद बरदाई सोडला तर त्याचा कोणी सैनिक नाही… आणि माझे सारे सैन्य माझ्याजवळ दरबारात उपस्थित आहे! त्याने लगेच पृथ्वीराजांना मोकळे साकारण्याचे फर्मान सोडले.
चंद बरदाईने आपल्या परमप्रिय राजाला चरणस्पर्श करून सावध राहण्याची विनंती केली… त्याने आपल्या राजाचे गुणगान करणाऱ्या बिरुदावल्या म्हंटल्या… आणि त्याच बिरुदावलीच्या माध्यमातून चंद बरदाईनेआपल्या राजाला संकेत दिला…..
“चार बांस, चौबीस गज, अंगुल अष्ठ प्रमाण।
ता ऊपर सुल्तान है, चूको मत चौहान।“
अर्थात् चार बांस, चोवीस गज आणि आठ वित एव्हढ्या उंचीवर सुल्तान बसला आहे…. तेव्हा राजे चौहान… कोणतीही चूक न करता तू नेम साधून आपले लक्ष्य साध्य कर!
या सांकेतिक बिरुदावलीतून पृथ्वीराजांना मोहम्मद घौरीच्या बसण्याच्या अंतराचा अचूक अंदाज आला.
चंद बरदाईने घौरीला पुन्हा विनंती केली,” महाराज, माझे राजे हे आपले बंदी आहेत, त्यामुळे आपली आज्ञा झाल्याशिवाय ते शस्त्र चावणार नाहीत, तेव्हा आपण स्वतः त्यांना ऐकू जाईल एव्हढ्या उच्चरवाने माझ्या राजांना बाण चालवण्याची आज्ञा द्यावी”
घौरी या प्रशंसेने भारावून गेला आणि त्याने मोठ्याने उद्घोषणा केली, “चौहान चलावो बाण!… चौहान चलावो बाण!!…. चौहान चलावो बाण!!!”
घौरीचा आवाज ऐकल्या बरोबर पृथ्वीराज चौहान यांनी आपल्या धनुष्यावर चढवलेल्या बाणाची प्रत्यंचा ओढली आणि गौरीच्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला नि त्या बाणाने अचूकरित्या घौरीच्या छातीचा वेध घेतला!
काय होतंय हे कळायच्या आत, “या अल्लाह! दगा हो गया” अशी किँकाळी फोडत मोहम्मद घौरीचा देह सिंहासनावरून खाली कोसळला!
दरबारात एकाच गोंधळ उडाला…. सारे सरदार हादरून गेले… तीच संधी साधून चंद बरदाई धावत आपल्या प्राणप्रिय राजाच्या जवळ आला… त्याने घौरी मृत होऊन कोसळल्याची बातमी आपल्या राजाला सांगितली… आपल्या बहादूर राजाला वंदन केले… दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले… चंद बरदाई आणि पृथ्वीराजांना याची कल्पना होती कि, घौरी चा मृत्यू झाल्यावर त्याचे सैन्य आपल्याला छळ-छळ करून ठार मारणार… त्यामुळे आधीच ठरल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांवर वार करून वसंत पंचमीच्या शुभ दिवशी माता सरस्वतीला आपल्या प्राणांचे अर्घ्य दिले!
पृथ्वीराज चौहान आणि कवी चंद बरदाई यांची हि आत्मत्यागाची शौर्य गाथा आपल्या भारतीय मुलांना अभिमानाने कथन करणे, त्यांच्यापर्यंत पोचणे आवश्यक आहे, म्हणून आज आपल्यासमोर आणली आहे. आपण देखील ही शौर्यगाथा आपल्या मुलांसोबत शेअर कराल हीच अपेक्षा. धन्यवाद!
समाप्त
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈