श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ भाकरी ☆
तिनं शिकून घेतलंय
भाकरी करण्याचं तंत्र
पीठ, पाण्याचं प्रमाण
दोघांना खेळवणारी
परात आहे तिच्या घरात
कणीक ओळखू शकते
बोटांची हालचाल
बोटांनाही कळतात
कणकीच्या भावना
बाळाला थोपटावं
तसंच थोपटते
आकार देते
इथवर सगळं ठीक आहे
तापलेल्या तव्यावर
भाकरी फिरवताना
कसरत करावी लागते
भाकर थोडी तापली की
पाठीवरून पाण्याचा
प्रेमानं हात फिरवावा लागतो
बाळाला शेक देताना
जपतात तशी
जपून शेकावी लागते भाकरी
तेव्हाच होते ती खमंग खरपुस
थोडी जर बिघडली तर
आहेच
जीभ नाक मुरडायला मोकळी…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈