सुश्री प्रभा सोनवणे
साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 119
☆ उर्मिला ☆
राजकन्या ती ही होती
जनकराजाचीच दुहिता
जाणली कोणी कधी ना
तिच्या जगण्याची संहिता
तारुण्यात एकाकी ती
शय्येवर तळमळ साही
पतीविना जीवन अधुरे
कोमेजे नवयौवन ही
सौमित्राची अर्धांगी
पूर्णत्वा ना गेली कधी
जाणिले तिच्या मना कुणी ?
ना मिळाली सौख्यसंधी
सौभाग्याचे दान मिळे
पण ब्रह्मचारिणीच असे
राजवैभव भोवताली
मनी तिच्या वनवास वसे
उपेक्षित ती सदैव ठरे
वैदेही , मैथिली नसे
तिज न उपाधी जनकाची
इथे तिथे उपरीच असे
युगेयुगे इथे जन्मल्या
मरून गेल्या कितीजणी
अशा उर्मिला मौन व्रती
त्यांच्या दुःखा ना गणती
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈