श्री सुजित कदम
साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #98
☆ आई माझी मी आईचा…. ☆
(वृत्त- समुदितमदना वृत्त = ८ ८ ८ ३)
कधी वाटते लिहीन कविता आईवरती खरी
शब्द धावुनी येतील सारे काळजातल्या घरी
सुख दुःखाचे तुझे कवडसे शोधत राहू किती
कसे वर्णू मी आई तुजला आठवणींच्या सरी
आई माझी सुरेल गाणे ऐकत जातो कधी
राग लोभ ते जीवन सरगम सुखदुःखाच्या मधी
कोरा कागद लेक तुझा हा टिपून घेतो तुला
आई माझी मी आईचा हा सौख्याचा निधी
आई माझी वसंत उत्सव चैत्र पालवी मनीं
झेलत राही झळा उन्हाच्या हासत जाते क्षणी
क्षण मायेचा बोल तिचा मी शब्द फुलांचा तुरा
घडवत जाते आई मजला यशमार्गाचा धनी
आई आहे अखंड कविता माया ममता जशी
शब्द सरीता वाहत जाते ओढ नदीला तशी
ओली होते पुन्हा पापणी वाहत येतो झरा
सुंदर कविता आईसाठी लिहू कळेना कशी
© सुजित कदम
संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈