श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिलं- आता या ऑर्डर्स इतक्या वाढू लागल्या, की त्या त्या वेळी तिघी-चौघींना मदतनीस म्हणून तिला घ्यावं लागे. आता इथून पुढे )
एक दिवस मनोहर म्हणाला, `रतिलाल विचारत होते, तुमच्या मिसेस गाऊन शिवून देतील का? ‘ रतिलालचे तयार कपड्यांचे दुकान होते. शिवाय त्याचा होलसेलही होता. ती तत्परतेने हो म्हणाली. मनोहर कापड आणून द्यायचा. ती गाऊन शिवून द्यायची. मग एकदा ती म्हणाली, `त्यांना विचारा. मी लहान मुलांचे कपडे, सलवार, कुडते वगैरेही शिवून देईन. तेही काम तिला मिळालं. नुसतंच मिळालं नाही, तर बघता बघता वाढलं. आता तिला शिवणासाठीही मदतनिसांची गरज भासू लागली. ती मग त्यासाठी आपल्या क्लासमध्ये शिकलेल्या आपल्या विद्यार्थिनींनाच बोलवू लागली. ती फक्त कटिंग करून देई. तिच्या देखरेखीखाली मुली शिवत.
दुसरी मुलगी झाली, तेव्हा तिने कुटंब नियोजनाचे ऑपरेशन करून घेतले. तिने मुलीचे नाव ठेवले स्मिता. मुलं मोठी होत गेली, वाढत गेली, तसा तिचा कामाचा व्यापही वाढत गेला. सामान आणणं, तयार वस्तू पोचवणं, जरुरीप्रमाणे मुलांना शाळेत पोचवणं-आणणं, त्यांची देखभाल करणं, या गोष्टी मनोहर मनापासू नकरी. मालतीला नेहमीच वाटतं, लोक म्हणतात, तसं कर्तृत्व आपल्या एकटीचं नव्हेच. दोघांचं आहे. मनोहरला त्या काळात कामाची योग्य दिशा सापडली नव्हती, हेच खरे. ती नंतर मिळाली .
मुले हुशार निघाली. स्कॉलरशीपवर शिकली. मालती-मनोहर एस.एस.सी.सुद्धा नव्हते. मालतीला नेहमीच वाटायचे, इतर मुलांच्या तूलनेत आपली मुलं मागे नको पडायला. त्यांना शिकवण्या लावू या. पण मुलंच म्हणाली, `आम्हाला शिकवणीची गरज आहे, असं वाटेल, तेव्हा आम्ही तुला सांगू.’ दहावीपर्यंत त्यांनी कुठलेही क्लास वा शिकवण्या न लावता चांगले मार्क्स मिळवले. स्मिता बी. कॉम झाली आणि एम.बी.ए. व सेक्रेटरिअल प्रॅक्टिसचा कोर्स करून चांगल्या कंपनीत नोकरीला लागली. तिचं लग्नं तिनंच ठरवलं. मुलगा सी.ए. होता. मराठा जातीचा होता, एवढीच अडचण येईल, की काय, असं स्मिताला वाटत होतं. पण जातीचा कीस न पाडता मुलाचं कर्तृत्व बघून मनोहर-मालतीने लग्नाला संमती दिली आणि थाटात लग्न करून दिलं.
मालती देवाचे नेहमीच आभार मानते. दोन्ही मुले बुद्धिमान, कर्तृत्ववान निघाली आणि रुपाने बाबांसारखी झाली. सुहास उत्तम मार्काने दहावी उत्तीर्ण झाला. घरची परिस्थिती बघून त्याने प्रथम डिप्लोमा करायचे ठरवले. डिप्लोमाला तो केंद्रात पहिला आला. दहावीपासूनच त्याला विविध विषयातले, एकूण गुणवत्तेचे अनेक पुरस्कार मिळाले. शिवाय त्याला शैक्षणिक कर्जही मिळाले. दहावीनंतरच्या त्याच्या शिक्षणाची झळ आई-वडलांना बसली नाही. डिप्लोमा झाल्यावर त्याने डिग्रीला प्रवेश घेतला. त्याच वेळी डप्लोमाच्या मुलांच्या शिकवण्याही केल्या.
डिग्री मिळवता मिळवता त्याने कॉम्प्युटरचे काही कोर्सेसही केले. कॅंपस इंटरव्ह्यूच्या वेळी तो नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत सिलेक्ट झाला. मालतीला सुहास शेवटच्या वर्षाला असताना सारखं वाटायचं, परस्थिती बरी असती, तर मुलाला पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवलं असतं. आपल्या गरिबाच्या घरात जन्म झाल्याने त्याच्या हुशारीचं व्हावं तेवढं चीज झालं नाही. तसं ती बोलूनही दाखवायची. सुहास म्हणायचा, `तसं काही नाही माई! बुद्धी आणि कर्तृत्व असलं, की त्याचं चीज होतंच.’ त्याचं म्हणणंही खरंच होतं, याचा मालतीलाही प्रत्यय आला. चार-सहा महिन्यातच एका नव्या प्रोजेक्टसाठी कंपनीने त्याला सहा महिने अमेरिकेला पाठवलं. त्यानंतर ज्या ज्या देशात नवीन प्रोजेक्ट सुरू करायचे, त्या त्या देशात सुरुवातीला कंपनी त्यालाच पाठवे. प्रोजेक्टसाठी कोणती माणसं निवडायची, त्याचे स्वातंत्र्य कंपनीने त्याला दिले. जर्मनी, इंग्लंड, स्वित्झर्लंड, दुबई, कुवेत, मलेशिया अशा किती तरी ठिकाणी गेल्या चार पाच वर्षात तो हिंडून आला.
मनोहरचे आत्या आणि आत्तोबा एव्हाना देवाघरी गेले होते. त्यांच्या शेवटच्या दिवसात आप्पा आणि मार्इंनी त्यांची खूप सेवा-शुश्रुषा केली होती. आत्या तर दोन वर्षं हांतरुणाला खिळून होत्या. शी-शूपासून त्यांचं सगळं करावं लागे. मनोहर-मालतीने दिल्या जागेच्या उपकाराला जागून आणि एकूण कनवाळू स्वभाव म्हणूनही सगळं काही मनापासून केलं. मुलं नोकरीची. राहून राहून किती दिवस राहणार? मुलांनी आपापल्या नोकरीच्या जागी आपापल्या वास्तू उभ्या केल्या. मनोहर-मालती अजूनही आत्याच्याच वाड्यात राहत होते. सुहासने मग आत्यांच्या मुलांना सध्याच्या चालू किमतीत वाडा विकत मागितला. मुलांनी आनंदाने दिला. आपल्या आई-वडलांचं याच दोघांनी केलय, हे मुलंही विसरली नव्हती. वाडा ताब्यात होताच. रीतसर कागदपत्र झाल्यावर सुहास म्हणाला, वाडा पाडून बंगला बांधू या. पण मनोहर-मालतीच्या किती तरी आठवणी त्या वाड्याशी निगडित होत्या. ती दोघेही वाडा पाडायला नको म्हणाली. सुहासनेही त्यांच्या शब्दांचा मान ठेवत वाडा न पाडता त्याचे रिन्युएशन केले. वाड्यात जेवढ्या म्हणून सोयी-सुविधा करता येतील, तेवढ्या केल्या. वाडा साजिरा-शोभिवंत झाला. मनोहर-मालतीलाखूप आनंद झाला. आम्ही या वाड्याचे आश्रित होतो. तू मालक झालास. सुहासने मग घराचे नाव ठेवले, आनंदघर.
क्रमश:….
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈