श्रीमती अनुराधा फाटक
कवितेचा उत्सव
☆ संक्रांत ….अशीही ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
संक्रांत ….अशीही
पुन्हा आली संक्रांत….
बेफिकीर वागणाऱ्यांच्यावर
घरातील सात्त्विक जेवण सोडून
हॉटेलमध्ये जाऊन
जिभेचे चोचले पुरवणाऱ्याच्यावर !
पुन्हा आली संक्रांत
श्रीमंतीचे प्रदर्शन
करणाऱ्यांच्यावर
कधीतरी मरायचेच आहे
असा विचार करत
बेमुर्वत जगणाऱ्यांच्यावर !
पुन्हा आली संक्रांत
आपण कुणाचे देणे लागत नाही असे समजून
समाजभान विसरून
स्वतःसाठीच जगणाऱ्यांच्यावर!
© श्रीमती अनुराधा फाटक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈