कविराज विजय यशवंत सातपुते
साप्ताहिक स्तम्भ # 113 – विजय साहित्य
☆ भावगंध…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
पांडुरंग सदाशिव
साने कुलोत्पन्न मूर्ती
साहित्याने जोपासली
देशभक्ती आणि स्फूर्ती……!
जन्म दिनी आज वाहे
आठवांची शब्द माला
देण्या विचार साधना
जन्म गुरूजींच्या झाला….!
कर्मभूमी खान्देशची
संस्था आंतर भारती
अभिजात साहित्याचे
साने गुरुजी सारथी……!
बाल मनावर केली
संस्कारांची रूजवात
आई श्यामची नांदते
प्रत्येकाच्या अंतरात….!
जातीभेद, अस्पृश्यता
घणाघाती केले वार
भूमिगत होऊनीया
केला स्वातंत्र्य प्रचार…..!
गोष्टी अमोल लिहिल्या
पत्रे श्यामची गाजली
मुले धडपडणारी
हाक कर्तव्याची भली…..!
सोन्या मारुती,आस्तिक
क्रांती, इस्लामी संस्कृती
सती,संध्या त्रिवेणीने
केली विश्वात जागृती…..!
स्वप्न आणि सत्य कथा
शेला रामाचा विणला
मानवांचा इतिहास
अंतरंगी त्या भिनला….!
केले चरीत्र लेखन
हिमालय विचारांचे
स्वर्गातील माळ शब्दी
दिले ज्ञान गीतांचे…….!
गोष्टीरूप विनोबाजी
सोनसाखळीचे रंग
तत्त्वज्ञानी हळवेला
वास्तवाचा भावगंध…..!
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈