सौ. पुष्पा चिंतामण जोशी
आत्मसंवाद – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी
(मैत्रिणीने माझ्यावर लेखनाची जबाबदारी टाकली.)
“पार पाडलीस का ही जबाबदारी?”
“हो तर! तिच्या फोननंतर डोक्यात विचारचक्र सुरू झालं. मनातलं कागदावर उमटू लागलं. लेखन, पुनर्लेखन असं करता करता तो लेख विविध उदाहरणांनी सजवून झाला.”
“मला आठवतं की त्या लेखात तू अमृता प्रीतम यांच्या ‘चौथा कमरा’ या पुस्तकाचा उल्लेख केला होतास”.
“हो. ‘अमृता प्रीतम’ यांचा ‘चौथा कमरा’ डोळ्यापुढे ठेवून त्यादृष्टीने लेखाचा शेवट केला की प्रत्येक स्त्रीला तिची स्वतःची आवड जपण्याची संधी मिळाली पाहिजे. मग ती आवड कसलीही असो. गायन, वादन ,भजन, पत्ते खेळणे, नाटक सिनेमा पाहणे जे आवडत असेल त्या आनंदासाठी तिने स्वतःच स्वतःचा ‘चौथा कमरा’ निर्माण करणं आणि तो जपणं खूप गरजेचे आहे .”
“आवडला ना तो लेख संपादकांना?”
“हो.लेख प्रसिद्ध झाला आणि फोनचा पाऊस पडला. फक्त मनस्वीनीच नाही तर माझे इतर अनेक सुहृद,मित्र- मैत्रिणी आणि अनोळखी वाचक यांनी लेख आवडल्याचे फोनवरून, पत्रांतून कळवलं. मला लेखनातला, प्रसिद्धीतला आनंद कळला आणि त्याची गोडी लागली.”
“लेखक ‘स्वान्त सुखाय’ लिहितो असं म्हणतात….. “
“असं कितीही म्हटलं तरी लेखकाला वाचकांच्या पसंतीची पावती लागतेच.
वाचकांच्या उत्साही प्रतिसादामुळे अनेक ललित लेख लिहून झाले .आजूबाजूला घडणाऱ्या लहान मोठ्या गोष्टी टिपून त्यावर तरंगणाऱ्या विचारलहरी आणि अनेक अनुभव सजगतेने टिपताना मनात उमटणार्या प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी ललित लेखनातून मिळाली.या ललित लेखनाला वर्तमानपत्रे मासिके आकाशवाणी यांच्यामुळे चांगली प्रसिद्धीही मिळाली.”
“लेखन सुरू होऊन साधारण किती वर्ष झाली असतील?”
“माझ्या लेखनाची डेक्कन क्वीन सुरू झाली त्याला आता १७ वर्षं झाली.”” “प्रवास वर्णनं लिहिण्याकडे जास्त कल आहे का?”
“हो. प्रवासाची आवड आम्हा दोघांनाही आहे. नोकरी करीत असताना भारत दर्शन केले. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर परदेश प्रवासाचा आनंद घेतला.”
” एखाद्या नावाजलेल्या टूरिस्ट कंपनीत पैसे भरायचे आणि प्रवासाला जायचे असा प्रवासाचा सोपा मार्ग स्वीकारला की……..”
“सुरवातीला प्रवासी कंपनीबरोबर जाणारे आम्ही, नंतर प्रवासी कंपनीकडून फक्त बुकिंग करून घेऊन जाऊ लागलो. आमचा मित्र मैत्रिणींचा प्रवासाचा ग्रुप खूप छान आहे. सर्वांच्या उत्साहाने सहकार्याने अनेक देश बघण्याचे भाग्य लाभले.”
“मला आठवतं की जपानला तुम्ही एका स्नेह्याच्या घरी आठ दिवस राहून जपानमध्ये भरपूर फिरलात.”
“हो. ती एक चांगली संधी आम्हाला मिळाली. नाही तर जपान प्रवासी म्हणून फिरायला खूपच महाग आहे.परदेशात राहणाऱ्या मित्र-मैत्रिणी नातेवाईक यांचा आधार घेऊन काही देश बघितले. तर त्यानंतर इंटरनेटवरून युथ हॉस्टेलचे बुकिंग करून प्रवास करण्याचा यशस्वी प्रयोग केला.”
“अशा पद्धतीच्या प्रवासाची मजा वेगळीच! नाही का?
“नक्कीच! थोडीफार खटपट करावी लागली तरी असा प्रवास स्वस्त आणि मनासारखा होतो. वेगवेगळ्या अनुभवांनी आयुष्य समृद्ध बनतं.”
“खटपट म्हणजे—–“
” प्रवास सुरू करण्यापूर्वी ज्या देशाला भेट द्यायचे ठरविले आहे त्या देशाबद्दल सहा- सहा महिने आधी आमची चौकशी चालू होते. जगाच्या नकाशावरील त्या देशाचे भौगोलिक स्थान, हवामान, प्रेक्षणीय स्थळे, खर्चाचा अंदाज घेणे चालू असते. आम्हा सर्वांना स्थलदर्शनामध्ये विशेष रस आहे. अनेक टुरिस्ट कंपन्यांकडून माहितीपत्रके मागवून, खर्च व स्थलदर्शन यांचा योग्य समन्वय साधून मग आम्ही एका कंपनीकडून बुकिंग करून घेतो.”
“वा! छान आहे ही पद्धत .”
“आज इंटरनेटमुळे फारच चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आहेत.शिवाय ज्या देशाला जायचे आहे त्या देशामध्ये आपल्या माहितीतले कुणी जाऊन आले आहे का याची चौकशी करून त्यांचे नाव, संपर्क नंबर मिळवून आम्ही त्यांच्याशी बोलतो. त्यामुळे त्यांचे अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी कळतात. अशा संपर्कांचा खूप फायदा होतो .”
“प्रवासाहून आल्यानंतर त्या त्या देशावर लेख लिहीत होतीस का?”
“हो. प्रवास करताना आपले कान, नाक, डोळे उघडे ठेवले की तिथल्या इतिहास-भूगोलाबरोबरच तिथली माणसे वाचण्याची सवय लागते. ते अनुभव लेखात उतरले की तो लेख जिवंत वाटतो.”
“त्या लेखांना प्रसिद्धी मिळाली ना?”
“अगदी चांगली प्रसिद्धी मिळाली. लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ, श्री दीपलक्ष्मी, विवेक, भटकंती, माहेर ,अथश्री, ब्रह्मवार्ता, चारचौघी अशा अनेक ठिकाणी ललितलेख व प्रवास वर्णने प्रसिद्ध झाली.”
“छान. मला वाटतं अनेक दिवाळी अंकातही…..”
“हो. मानिनी, अनुराधा, उत्तम कथा ,हेमांगी, गार्गी, विश्व भ्रमंती, मुशाफिरी अशा अनेक दिवाळी अंकात लेख प्रसिद्ध झाले”.
“लेख सहजपणे लिहून होतात की…..”
“माझ्या प्रत्येक लेखासाठी मी व्यवस्थित मेहनत घेते. लेख मनासारखा होईपर्यंत मी त्याचे पुनर्लेखन करते. लेख माहितीपूर्ण असतोच शिवाय त्याला इतिहास- भूगोल याबरोबरच वर्तमानाचे संदर्भही असतात.”
“खरं आहे. म्हणून तर एवढे वाचक आणि त्यांच्या लेख आवडल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या. तुला एक विचारायचं होतं की,प्रवासाची इच्छा असली तरी तेवढंच पुरेसं आहे का?”
“नाही रे बाबा! घरातील सर्वांनी संपूर्ण सहकार्य केल्यामुळे प्रवासासाठी मानसिक बळ मिळालं. प्रवासाची इच्छा असली तरी आर्थिक पाठबळ महत्वाचं. आम्हा दोघांनाही हे बळ आपापल्या नोकऱ्यांमधून मिळालं. एकदा प्रवासाची चटक लागली की मग इतर अनेक लहान- मोठ्या, अनावश्यक गरजांना मागे सारून प्रवास केला जातो. प्रकृतीची साथही तितकीच महत्त्वाची.”
“अगदी बरोबर”. या प्रवास लेखांना पुस्तक स्वरूप देता आलं का?”
“भारतातील व परदेशातील प्रवासाचे तीस-पस्तीस लेख प्रसिद्ध झाले तरी त्यांचे पुस्तक करण्याचा विचार केला नव्हता. माझ्या मैत्रिणीच्या- शोभाच्या पाठपुराव्यामुळे तीन-चार प्रकाशकांना फोन केला. त्यांनी सांगितलेला खर्चाचा आकडा ऐकून गप्पच बसले.”
“बापरे. मग पुस्तक प्रसिद्ध कसं झालं?”
“विजय खाडिलकर या आमच्या सुहृदांच्या सांगण्यावरून ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’कडे माझे परदेश प्रवासावरील लेख ‘देशोदेशींचे नभांगण’ हे नाव देऊन पाठविले. एका वर्षानंतर पुस्तक स्वीकृत झाले पुण्याच्या ‘गमभन प्रकाशन’ यांनी ते अतिशय दर्जेदार स्वरूपात प्रसिद्ध केले. या पुस्तकाला माननीय यशवंतराव चव्हाण पारितोषिक मिळाले.”
“शाब्बास! आणि भारतातील प्रवासाचे लेख…….”
“ते लेख मी पुण्याच्या ‘उत्कर्ष प्रकाशन’ यांच्याकडे पाठवले. त्यांना आवडले . त्यांनी ते प्रवास लेख ‘चला आसाम पासून अंदमान पर्यंत’ या नावाने प्रसिद्ध केले.
“एवढ्या प्रवासामध्ये अनेक अनुभव आले असतील ना?”
“भरपूर अनुभवांचं गाठोडं जमलं आहे”.
“त्यातला एखादा मजेशीर अनुभव सांगतेस का?”
“ऑस्ट्रेलियाच्या प्रवासासाठी आम्ही इंटरनेटवरून मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन अशा तीन ठिकाणी युथ होस्टेलमध्ये राहण्यासाठी बुकिंग केलं होतं. सिडनीचं युथ होस्टेल खूप मोठं होतं. तिथे जगभराच्या प्रवाशांची सतत ये-जा चालली होती. “
“युथ होस्टेलमध्ये सर्वांना राहता येतं का? तिथे सोयी वगैरे कशा असतात?”
“युथ हॉस्टेल ही परदेशामध्ये राहण्याची एक अतिशय स्वस्त आणि सुंदर सोय आहे. युथ होस्टेलच्या मेंबरशिपला वयाची अट नसते. सिडनीला आम्ही दोघा- दोघांच्या रुम्स घेतल्या होत्या. छोट्याशा स्वच्छ खोलीत, एकावर एक दोन बंकर बेड (टू टायर थ्रू ट्रेनमध्ये असतात तसे), आणि सामान ठेवायला थोडी जागा होती.”
“आणि टॉयलेट वगैरे?”
“बाथरूमस् आणि टॉयलेटस् कॉमन पण अतिशय स्वच्छ! स्त्रीयांसाठी , पुरुषांसाठी वेगळी. २४ तास गरम पाणी. कधीही कसली खोटी झाली नाही.”
“खान-पान सेवेसाठी रेस्टॉरंट होतं का?”
“छे.छे.सर्वांना मिळून एक मोठं कॉमन किचन दुसऱ्या मजल्यावर होतं.त्या स्वयंपाकघरात वेगवेगळ्या ठिकाणी पंधरा-वीस ओटे होते. त्यावर गॅसच्या शेगड्या. कपाटातील ड्रॉवरमध्ये छोट्या चमच्यांपासून ग्लास, कपबशा, प्लेटस् , झारे,, कालथे ,चाकू,सुऱ्या सारे होते. मिक्सर टोस्टर मायक्रो होते. पुरुषभर उंचीचे फ्रिज भरपूर होते. आपण मार्केटमधून आणलेले दूध, लोणी वगैरे फ्रिजमध्ये आपल्या नावाचे लेबल लावून ठेवण्याची सोय होती.”
“म्हणजे अगदी सुसज्ज स्वयंपाकघर म्हण ना! तिथे आपण जेवण बनवायचे का?”
“हो. आणि त्यासाठीआपण वापरलेली सारी भांडी तिथेच ठेवलेल्या लिक्विडने घासून पुसून परत जागेवर ठेवायची. स्वयंपाकघराला जोडून बाहेर मोठा हॉल होता. तिथे टेबल-खुर्च्या ,सोफासेट, टीव्ही होता. आपण तयार केलेले पदार्थ प्लेटमध्ये घेऊन हॉलमध्ये बसून खायचे अशी पद्धत होती.”
“छानच सोय आहे ही! एक वेगळा अनुभव.”
“नक्कीच! सारेच प्रवासी असल्याने झटपट जेवण म्हणजे ब्रेड- आम्लेट, चहा- कॉफी, तयार पाकिटातील सूप, भाज्या, भात असा मेनू असायचा. त्या होस्टेलमधला आमचा तो तिसरा म्हणजे शेवटचा दिवस होता. आम्ही मैत्रीणी मिळून त्या दिवशीचा आमचा झटपट स्वयंपाक बनवित होतो. तेवढ्यात तिथे एक उंच- निंच धिप्पाड, गोरीपान बाई आली.आम्ही नेहमीप्रमाणे तिला हाय-हॅलो केले.”
“म्हणजे ती ओळखीची होती की…….”
“छे रे. ती आमची एक सवय आहे. ओळखी करून घ्यायच्या. त्यांची माहिती आपल्याला मिळते आणि आपण त्यांना आपल्याविषयी काही सांगू शकतो .”
“चांगली आहे सवय. घडीभरच्या भेटीत आपुलकी व्यक्त करणारी.”
“तिच्या बोलण्यावरून कळलं की ती एकटीच स्वीडनहून जगप्रवासाला निघाली होती. तिने आम्हाला विचारलं,’ तुम्ही इंडियनस् ना’?’. आम्ही ‘हो’ म्हटलं. आम्हाला वाटलं नेहमीप्रमाणे आमच्या कुंकवाच्या टिकल्यांवरून, पंजाबी ड्रेसवरून ओळखलं असावं. तेवढ्यात ती पुढे म्हणाली ‘I know, I know. All ladies are working and gents are sitting like this.’ असं म्हणून, सिटींगवर जोर देऊन, तिने बाहेर हॉलमध्ये आरामात गप्पा मारत बसलेल्या आमच्या पुरुष वर्गाची अशी झकास नक्कल केली की आम्ही आऽवासून पाहतच राहिलो. म्हणजे भारतीय पुरुषांची कीर्ती इतकी सर्वदूर पसरली आहे याची आम्हाला कल्पना नव्हती.”
“?? अगदी मर्मावर बोट ठेवले तिने!
” हो ना!तयार केलेले जेवण प्लेटमध्ये घेऊन आम्ही हॉलमध्ये आलो. हसत-हसत पुरुष वर्गाला तिची नक्कल करून दाखविली. पुरुषवर्ग गुळमुळीतपणे म्हणालाच की, ‘आम्ही तुमच्या पर्सेस सांभाळण्याचे महत्त्वाचे काम करीत होतो असे सांगायचे तिला!’. पण तात्पुरता परिणाम मात्र झाला. जेवणानंतर सगळ्यांच्या डिश वगैरे पुरुषवर्गाने धुवून, पुसून ठेवल्या.
आत्मसंवाद भाग – २ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈