विविधा
☆ अमर लता ☆ श्री विकास जोशी ☆
अमर लता
‘लता’ या अफाट कर्तृत्वाच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अस्तित्व ही आपली श्रीमंती होती, अभिमान होता. रसिकांच्या हृदयात स्थान हे केवळ लिहिण्याची गोष्ट नाही तर प्रत्येकासाठीचं आनंददायी वास्तव होत.
लता म्हणजे सच्चा सुरांचा सश्रद्ध साधक. कोमलतेसह आवाजातील ऋतुजा जपणारी, गाण्याला भावमाधुर्यानं सजवणारी, नाद सौंदर्यानं आरासणारी, प्रभाव-परिणामकतेनं नटवणारी, स्वयंभू शैलीची गायिका!शब्दांना स्वरार्थ देणारी, चालीला भावार्थ देणारी, गाण्याला परिपूर्णता देणारी. ऐकता ऐकता सहजतेनं काही शिकणं घडावं असा संवादी रसाविष्कार रसिकांच्या अभिरुचीला उन्नत करणारा. गाण्यात सर्व इमान ओतण्याचा ध्यास घेतलेलं, संघर्षात संयम राखणारं, प्रसिद्धीत विनय सांभाळणारं, वैभवात औदार्य जपणारं, प्रतिष्ठेला आदराचं वलय लाभलेलं प्रसन्न व्यक्तिमत्त्व.
जणू साक्षात सरस्वतीनच धारण केलेली चैतन्याकृती. पहिल्या गाण्यापासून तीस हजाराचा गाण्यापर्यंत अभिजाततेशी बांधिलकी मानणारी. दिगंत कीर्ती मिळूनही देव, देश, धर्मापायी निष्ठा वाहणारी एकमेवाद्वितीय लता.
‘अमर लता’
© श्री विकास जोशी
गाणगापूर
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈