सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ मारुती – भाग पाचवा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(कथासूत्र : ‘तुमच्या पापामुळे होणारा माझ्या अंगाचा दाह असह्य झाला, तर मी निघून जाईन,’ हा मारुतीचा निरोप भावड्याने लोकांना सांगितला ……)
आता प्रत्येकजण एक दुसऱ्याकडे बघायला लागला. पापाची खाण म्हणजे सावकार. त्याने लोकांना खूपच लुबाडलं होतं. पण त्याने विचार केला, ‘तसं लोकांना फसवून मी बक्कळ पैसा कमावला. पण खरं पाप तर जगन्याने केलंय. शेजाऱ्याच्या बायकोशी चोरटे संबंध ठेवलेयत आणि राजरोस मिरवतोय सभ्य म्हणून.’ जगन्याच्या मते ‘माझीतर एकाच बाईबरोबर भानगड आहे, पण पाटील तर…. किती बाया आल्या आणि किती गेल्या..’ पाटलाला वाटतंय……
“ऐका ss,”पुन्हा एकदा भावड्याने आरोळी मारली,”देव थकलाय आता.त्याला विश्रांती घ्यायचीय. रात्रही झालीय. तेव्हा आता सगळ्यांनी आपापल्या घरी जा. उद्या सकाळी दहाला पूजा होईल. त्यानंतर दर्शनाला या.”
म्हातारीने दगड्यापुढे दंडवत घातला, “द्येवा, माफ कर मला. माझ्या या गुणी पोराच्या अंगावर मी वसवस करत राह्यले. त्याचं पुण्य दिसलंच नाही बघ माझ्या डोळ्याला.”
दादल्या आणि चिमीनेही नमस्कार करुन माफी मागितली.
“वैनी, मारुतीरायाचं ताट वाढ. मी भरवतो देवाला.”
कोणाच्याही नकळत भावड्याने जेवणात औषध मिसळलं आणि तो दगड्याला प्रेमाने भरवू लागला. डाळभाताचं ते मिळमिळीत जेवण दगड्याच्या घशाखाली उतरेना.
“हे बघ, दगड्या, देवाने काय सांगितलं, ते ऐकलंस ना? तू पुण्यवान आहेस, म्हणून मारुती तुझ्या अंगात आला. आता, मारुतीने पुढे काय सांगितलं, ते मी सगळ्यांसमोर बोललो नाही. म्हटलं, लोक गेले की तुला सांगूया.”
“काय म्हणाला मारुती?”सगळ्यांचेच कान टवकारले.
“मारुती म्हणाला, ‘दगडू पित होता, ते त्याच्याकडून अजाणतेपणे घडलं. पण यापुढे त्याने जर ती चूक केली, तो एक घोट जरी दारू प्याला, तरी माझ्या गदेने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा करुन टाकीन.’ हे मरेपर्यंत लक्षात ठेव, दगड्या. यापुढे दारूला स्पर्शही करू नकोस. नाहीतर तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरेल. कळलं?”
दगड्या घाबरला. खरोखरच घाबरला. खूप खूप घाबरला. त्याने स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली, “मारुतीराया, तुझी शपथ घेऊन सांगतो, यापुढे दारूला हातही लावणार नाही.”
दुसऱ्या दिवशी दहानंतर गर्दी जमायला लागली. तेव्हा भावड्याने जाहीर केलं – ” काल मध्यरात्री मारुतीरायाने मला पुन्हा दृष्टांत दिला. मी त्याला विनंती केली,’देवा, मारुतीराया, तुझ्या दर्शनासाठी येणाऱ्या बऱ्याच जणांच्या हातून पाप घडलंय. त्याचा तुला त्रास होतोय, हे मला ठाऊक आहे. पण तू अचानक असा आमच्याकडे पाठ फिरवून जाऊ नकोस. आणखी एक-दोन दिवसतरी थांब. कोणी आतापर्यंत येऊ शकले नसतील,उद्या-परवा येतील, त्यांना दर्शन दे.मग हळूहळू अंतर्धान पाव.’ तो राजी झाला. म्हणा – जय हनुमान.”
सगळ्यांनी त्याच्या पाठोपाठ ‘जय हनुमान’चा घोष केला.
तिसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चेहऱ्यावरची सूज अर्धीअधिक कमी झाली होती.
चौथ्या दिवशी दगड्या उठला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची मारुतीसूज पूर्णपणे उतरली होती.
नंतर भावड्या मुंबईला परतला आणि दवाखान्यात कंपाउंडरच्या कामावर रुजू झाला.
दगड्याने दारू सोडली व तो व्यवस्थित कामाला लागला.
पण अजूनही त्या गावांत दगड्याच्या अंगात आलेल्या मारुतीरायाच्या कथा भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक सांगितल्या-ऐकल्या जातात.
समाप्त
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈