सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? आत्मसंवाद – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ?

(सिडनीमध्ये परदेशी स्त्रीकडून भारतीय पुरुषांची नक्कल)

“आणखी कुठच्या क्षेत्रात मुशाफिरी करायला मिळाली?”

“एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून ‘आकाशवाणी’ मुंबई, इथे प्रवासावरील दोन लेख लिहून पाठविले. काही दिवसांनी त्यांचे रेकॉर्डिंगसाठी बोलावणे आले तो एक वेगळाच अनुभव होता.”

” फक्त प्रवास वर्णनांचे  प्रसारण झाले की….”

‘ऑल इंडिया रिटायर्ड पर्सन्स असोसिएशन’ यांच्यातर्फे आनंदी वार्धक्य या कार्यक्रमात भाग घेता आला. तसेच आम्ही मैत्रिणींनी एकदा गाणी गोष्टी वेगळेअनुभव यांचा एक सुंदर गजरा आकाशवाणीवरून सादर केला. त्याचे लेखनही मीच केले होते.”

“याला श्रोत्यांचा प्रतिसाद मिळत होता का?”

“माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त! प्रथम मला वाटायचे की, या टीव्हीच्या जमान्यात रेडिओ कोण ऐकतो? पण तसं नाहीये . रेडिओचे कार्यक्रम नियमित ऐकणारे श्रोते महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. माझे प्रवास लेख आवडल्याचे अनेकांनी आकाशवाणीवर कळविले. त्यामुळे मला अशा प्रकारचे दहा कार्यक्रम प्रसारित करायची संधी मिळाली.”

“मला आठवतं की तुझ्या “अन्नब्रह्म” या कार्यक्रमाला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला होता. काय सांगितलं होतंस तेंव्हा?

“जे जे देश बघितले तिथल्या हवामानानुसार ,पिकानुसार तिथे बनवले जाणारे विविध पदार्थ यात सांगितले होते. व्हिएतनाममध्ये तळ्यात उगवणाऱ्या गुलाबी कमळाच्या देठापासून फुलापर्यंत प्रत्येक भाग विविध पदार्थांमध्ये वापरला जातो तर कंबोडियामध्ये अननस, आंबा, फणस यांच्याबरोबरच खेकडे, कोळी यांचे वेफर्ससुद्धा मिळतात. तसंच आपल्या आदिवासींमध्ये लाल डोंगळ्यांची चटणी करून खाण्याची पद्धत आहे असा माहितीपूर्ण आणि मजेशीर विषय होता.”

” खरं आहे. अन्नब्रम्हाचा मार्ग ब्रह्मांडं व्यापणारा आहे. मला वाटतं एकदा  टीव्हीवर सुद्धा कार्यक्रम झाला”.

“हो ऑल इंडिया रिटायर्ड पर्सन्स’ असोसिएशनतर्फे मी व डॉक्टर आचरेकर यांच्याबरोबर ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न व त्यावरील उपाय यांची चर्चा झाली. तोही एक एक वेगळा अनुभव. तसंच  रविराज गंधे यांनी एकदा ‘अमृतवेल’ या त्यांच्या टीव्हीवरील कार्यक्रमात  माझ्या ‘देशोदेशींचे नभांगण’ या पुस्तकाचा परिचय करून दिला .”

“मला आठवतं की तू वेगवेगळ्या मंडळांमध्ये व्याख्यानासाठीसुद्धा जात होतीस”.

“हो. दादरपासून डहाणूपर्यंतच्या अनेक वनिता मंडळात व ज्येष्ठ नागरिक संघात वेगवेगळ्या विषयांवर भाषण करण्याची संधी मिळाली.”

“यात फक्त प्रवासातील अनुभव सांगितलेस की…..”

“प्रवासातील अनुभव  व इतर गमतीजमती तर सांगितल्याच.  एकदा दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर पालकांच्या भूमिकेतून बोलायला मिळाले. मातृदिनानिमित्त झाशीची राणी, जिजाबाईंपासून आधुनिक  स्त्रीपर्यंत विचार मांडले. रोटरी इंटरनॅशनल क्लबमध्ये ‘जर्नी ऑफ लाइफ’ यावर भाषण केले. स्त्री दिनानिमित्त ‘स्त्री ही सबलाच आहे’ या विषयावर बोलले. “

“अशा भाषणांसाठी वेगळा अभ्यास करावा लागला असेल ना?

“अशी माहिती जमवताना आपल्या ज्ञानात भर पडते. मुख्य प्रश्न असतो तो अभिव्यक्तीचा! समोरच्या श्रोत्यांना आपल्याला पहिल्या तीन-चार मिनिटातच आपल्या विषयाकडे आकर्षित करून घ्यावं लागतं आणि मग त्या विषयाचा विस्तार सहजपणे होतो.”

” म्हणून तर वक्तृत्व कला चौसष्ट कलांमध्ये समाविष्ट आहे”.

“कार्यक्रमांचे निवेदन करतानाही असाच अभ्यास करावा लागतो. गीतरामायण, पावसाळी गीते अशा काही कार्यक्रमांचे निवेदन केले. “

“निवेदनालाही भाषणासारखी तयारी करावी लागते का?”

“निवेदकाला प्रामुख्याने हे लक्षात ठेवावे लागते की निवेदकाचे काम हे फुलांच्या गजऱ्यामधल्या  दोऱ्यासारखे आहे. योग्य शब्दात  आधीच्या व पुढच्या गाण्याची जोड कुशलतेने करून द्यावी लागते.  कधी एखादी त्या गाण्यासंबंधी आठवण किंवा प्रसंग थोडक्यात सांगावा लागतो. “

“म्हणजे हा गाण्यांचा कार्यक्रम आहे.निवेदनाचा नाही हे लक्षात ठेवायचं.”

“बरोबर. अनेक वेळा महिला मंडळं, गणेश उत्सव यांच्यातर्फे घेतलेल्या स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा यासाठी परीक्षकाचे काम केले.” 

“म्हणजे तेंव्हा अगदी व्यस्त दिनक्रम होता म्हणायचा”.

“व्यस्त पण आवडीचा”. याच सुमारास “मराठी प्रवास वर्णन लेखक वाचक मंच” यांच्यातर्फे महिला दिनाला सन्मानपत्र मिळाले.”

“म्हणजे तुझ्या अनेक प्रांतातल्या मुशाफिरीची दखल घेतली गेली म्हणायची.”

 आत्मसंवाद भाग – ३ समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments