सुश्री प्रभा सोनवणे

? आत्मकथन ?

☆ लेखांक# 10 – मी प्रभा… सहेलियोंकी बाडी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

माझा जन्म पुणे जिल्ह्य़ातील एका छोट्याशा गावातल्या बागायतदार कुटुंबातला, भरपूर शेतीवाडी,घरात सुबत्ता होती, माझी आयुष्यातील पहिली मैत्रीण त्या गावातील कमल बडदे! ती माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठी होती. आम्ही गावातल्या इतर मुलींबरोबर खेळायचो नाही.दोघीच काहीतरी खेळत असायचो. मी माॅन्टेसरीत असतानाच पुण्यात रहायला गेले पण सुट्टीत गावाकडे गेल्यावर मी आणि कमल भेटत असू.

पुण्यात भांडारकर रोडवर रहात असताना मालती पांडे ही मैत्रीण मिळाली तीही माझ्यापेक्षा एक वर्षाने  मोठी होती, आम्ही एकमेकींच्या घरी येत जात असू. आम्ही पुणं सोडून गावाकडे आलो, पुण्यातील जागा रिकामी करण्यासाठी आईवडील गेले तेव्हा मालू भेटायला आली होती,आणि मी भेटले नाही आणि पुण्यात परत येणार नाही,म्हणून ती खूप रडली होती असं आईनी सांगितलं होतं.

आम्ही गावाकडे गेल्यावर, कमल भेटली,तिचे वडील मिलिट्रीत होते,ते माझ्या वडिलांचे चांगले  मित्र होते ! तिची आई मुलांच्या शिक्षणासाठी घोडनदी-शिरूरला रहात होती.कमल नी आम्हाला शिरूरला चलण्याविषयी  सुचविले होते हे मला आजही आठवतंय. शिरूर आमच्या गावापासून जवळ असल्यामुळे सोयीचं म्हणून वडिलांनी शिरूर मध्येच बि-हाड केलं!

पण शिरूरमधे गेल्यावर कमलची आणि माझी मैत्री टिकली नाही. तिथे मला राणी गायकवाड, सरस बोरा,उज्वल धारिवाल, निर्मल गुंदेचा, संजीवनी कळसकर या मैत्रीणी मिळाल्या! राणी गायकवाड शी माझे पूर्वजन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असावेत असं मला नेहेमीच वाटतं.तिची मैत्री म्हणजे एक सुंदर कविताच होती….त्या मैत्रीची फार मोठी किंमत मला मोजावी लागली  आहे. दहावी नंतर अकरावीला मी हिंगण्याच्या (कर्वेनगर ) महिलाश्रम हायस्कूल मधे हॉस्टेल वर राहू लागले तिथे जयश्री जमनारेची ओळख झाली . त्या हॉस्टेलवर मी महिनाभरही राहिले नाही, तिथे अजिबातच करमेना मग शिरूरचं मोडलेलं बि-हाड परत उभारलं ,राणी गायकवाड आणि जयश्री लोहकपूरे या खूप जिवलग मैत्रीणी पण त्या तरुण वयातच या जगातून निघून गेल्या!पण माझ्या आयुष्यात त्या दोघींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या शाळेतील मैत्रीणी, काॅलेज मधे गेल्यावर  नवीन मैत्रीण मिळाली सिंधू  शेटे! तिची मैत्री अनेक वर्षे टिकली,पण दोन वर्षांपूर्वी तीही आजारपणाने गेली.

लग्न होऊन पुण्यात आले तेव्हा पहिली मैत्री यशवंत दत्त ची बायको वैजयंती महाडिकशी झाली. त्यानंतर काही वर्षांनी शिरूर च्या शाळेतली हुशार मुलगी माधुरी तिळवणकर ही भेटली, तिच्याशी मैत्री झाली ती तिच्या मिस्टरांमुळे, ते पूर्वी सोमवार पेठेत रहात होते, माधुरीचे पति अशोक कामत हे ह्यांचे मित्र बनले.माझ्या मुलाची आणि तिच्या मुलाचीही मैत्री झाली,एकमेकींच्या घरी जाणं हिंडणं फिरणं हे माधुरी बरोबर खूप झालं, फिरकी दिवाळी अंकाच्या संपादिका शोभा ठाकूर यांची ओळख माधुरीच्या मिस्टरांनी करून दिली, मी फिरकीची सहसंपादक झाले, असा साहित्य क्षेत्रात माझा शिरकाव झाला आणि शोभा ठाकूर ही मुंबई ची मैत्रीण मिळाली.त्याचकाळात लेखिका नंदा सुर्वे यांच्याशी खूप घनिष्ठ मैत्री झाली,नंदाताईंचं घर हे मला खूप शाश्वत, हक्काचं ठिकाण वाटतं!

पुढे “काव्यशिल्प”  या कवींच्या संस्थेत मीरा शिंदेंशी पहिल्यांदा मैत्री झाली.मीराताई मैत्रीण वाटण्यापेक्षा मोठी बहिण जास्त  वाटतात, त्यांच्यामैत्रीत एकप्रकारचं वेगळेपण आहे.

त्या नंतर मीनल बाठे, स्वाती सामक, स्नेहसुधा कुलकर्णी,ज्योत्स्ना चांदगुडे यांच्याशी खूप जवळची मैत्री झाली. आम्ही पाचजणींनी “मैत्रपंचमी” हे आत्मकथनपर पुस्तकही प्रकाशित केलं…..आयुष्याच्या जडणघडणीत आम्हा पाचजणींना एकमेकींची साथ खूप मोलाची ठरली आहे.

आयुष्यात खूप मैत्रीणी येऊन गेल्या ज्यांच्यामुळे आयुष्य सुखकर झालं अभिनेत्री ज्योती चांदेकर ही सुद्धा खूप जवळची मैत्रीण, तिच्यामुळे ओळख झालेली मीना जावडेकरही खूप प्रेमळ आणि काळजीवाहू मैत्रीण,आम्ही तिघी एकमेकींना खूप छान ऐकून घेतो आणि ऐकवतोही.या पाच सहा वर्षांत खूप जवळीक निर्माण झालेलं हे मैत्र !

खरंतर एक एक मैत्रीण ही एक एक कादंबरीच होईल! वर्षा कुलकर्णी ही सुद्धा खूप जवळची वृत्तबद्ध कवितेचा अभ्यास असलेली,माझ्यावर उदंड प्रेम करणारी मैत्रीण!

प्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे,अंजली कुलकर्णी, आश्लेषा महाजन, मृणालिनी कानिटकर या मैत्रीणी असल्याचा सार्थ अभिमान!

सामाजिक कार्यकर्ती सरोज फडके, स्नेहलता धूत ही स्वाध्याय महाविद्यालयात  एम.ए. करताना मिळालेली हुशार मैत्रीण ! शीला शेळके,भक्ती पंडित, मेघना कुलकर्णी,लाजवंती साळुंकेआणि कवयित्री वैशाली मोहिते ही नावं घेतल्याशिवाय ही “सहेलियोंकी बाडी” पूर्ण होऊच शकत नाही. “सहेलियोंकी बाडी” राजस्थानातलं राजकन्येला तिच्या मैत्रीणींबरोबर खेळण्यासाठी राजानी बनवलेलं एक उद्यान आहे. माझ्यासाठी माझी प्रत्येक मैत्रीण  राजकुमारी आणि तिची मैत्री हे एक  सुंदर  उद्यानच आहे !        

अजून बरीच नावं नाही लिहिली गेली, विस्मरणात गेली, ज्ञात अज्ञात सर्व मैत्रीणींना हा लेख समर्पित!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_print
2 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments