श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ ग्रामीण एकांकिका – गटुळं – भाग-2 ☆ श्री आनंदहरी 

(रंगाच्या घराचा सोपा… सोप्यात फर्निचर असे काही नाही.. भिंतीवर देवाचे कॅलेंडर / चित्र..  भिंतीकडेला घोंघडं अंथरलंय..  तिथं भामा  काहीतरी भाजी निवडत किंवा तत्सम काहीतरी घरातील काम करीत बसलीय…)

भामा  :-  (दाराकडे पहात चाहूल घेत स्वतःशीच ) आजून कसं आलं न्हायती..( क्षणभराने ) आलं वाटतं…( खाली मान घालून मुसमुसायला सुरवात करते .. मध्येच डोळ्याला पदर लावते )

रंगा :- ( हातातलं खुरपं कोपऱ्यात ठेवून.. खांद्यावरचा टॉवेल काढून तोंड पुसत )

 भामे, वाईच पानी आण ग..

(भामाचं एक नाही न दोन नाही .. तिचं मुसमुसणं चालूच … ते लक्षात न येऊन ..खाली बसत )

ए s भामे, ऐकाय आलं न्हाय का काय ? आगं वाईच पानी आण जा की…

(भामाकडे बघतो.. ती रडतीय हे ध्यानात येताच आश्चर्य वाटून ..)

(स्वगत ) ऑ SS ! वागिनींच्या डोळ्यांत पानी ? …  वागीन बी कवातरी रडती ह्ये ठावं न्हवतं ? जाऊंदेल… ईचारपुस कराय पायजेल… न्हायतर माजं काय खरं न्हाय बाबा… इचारतोच काय झालंय ती..

(भामा जवळ जाऊन बसत काळजीच्या स्वरात ) 

भामा.. ए ss भामा,  आगं काय झालं गं…?

(नवऱ्याला जवळ येऊन विचारताना पाहून भामाचं मुसमूसणे जास्तच मोठयाने सुरू होतं..) 

आगं, रडू नगं..गप .…आता काय झालंय  ती तरी सांगशील का मला ? उगं उगं… रडू नगं… तू सांगीतल्याबिगर मला तरी कसे उमगंल गं ? काय झालंया  ? सांग बगू ..

भामा :- ( रडत रडत ) तुमची आय..

रंगा :- माझी आय…? ( रडायचे नाटक करत ) आयं गss  असं कसं गं झालं …. आगं मी येस्तवर  वाट का न्हाय ग बगीतलीस…अशी कशी गेलीस आमास्नी सोडून.. आता आमी कसं ग जगायचं…भामीचा तरी ईचार करायचा हुतास की गं ss!  तुज्याबिगर आता ती कशी ग ऱ्हाईल..?

(भामाच्या जवळ सरकून / गळ्यात पडून रडण्याचं नाटक करीत ) आय गं ss !..असं कसं ग झालं माज्या आयचं..?

भामा :- ( क्षणभर त्याच्याकडे पहात रडणं विसरून नेहमीच्या आवाजात ) ओ ss गप बसा वाईच .. काय बी झाल्यालं न्हाय म्हातारीला…

रंगा :-  (रडण्याचं सोंग चालूच ठेवत ) काय बी झाल्यालं न्हाय म्हंजी … ? उगा माजी समजूत काडु नगंस… तुजी आयवरली माया ठावं न्हाय व्हय मला.? आगं,  तू रडतीयास म्हंजी… माजी आयच… आये.. आये गं….!

भामा :- (चिडून) गप बस्तायसा का वाईच..? लागलं लगीच ‘ आय  ss आय गं ‘ कराय.. काय हुतंय म्हातारीला ? ब्येस ठणठणीत हाय ती..

रंगा :- (रडण्याचं नाटक थांबवत ) आँ ss !  खरंच सांगतीयास ? मग तू कशापायी रडीत हुतीस गं ?

भामा :- (स्वगत) हेंच्या रडण्यात इसरूनच गेले हुते .. बरं झालं ध्येनात आणलं ह्येनी त्ये…

(डोळ्याला पदर लावत मुसमुसत रडायला लागते )

रंगा :- (स्वगत)  द्येव जवा बायकासनी काळीज वाटीत हुता, डोळ्यात टचकन दाटणारं पाणी वाटीत हुता तवा ही बया न्हवतीच ततं … द्येव आपला काळजीत पडला ..येक काळीज आन डोळ्यांतलं पाणी शिलकीत ऱ्हायलं कसं…. ? कोन ऱ्हायलं बिनकाळजाचं म्हणीत द्येव आपला हिकडं बघतुय.. तकडं बघतुय …तर ही आपली लांब दुसरीकडं … लांडग्यासनी काळीज वाटीत हुतं त्या लायनीत..  हिला बायकांचं काळीज द्याला द्येव पळत पळत ततंवर जातूय तर  काय ? अवो, लांडग्यांचं काळीज हिला आगुदरच बसवून बी झाल्यालं…

(भामाकडं जात..  न रडता काळजीनं ) आगं, मग तुला झालंय तरी काय रडाय ? आतातरी  सांगशील का ?

भामा :- (रडत – मुसमुसत ) तुमची आय मला न्हाय न्हायती बोल्ली ?

रंगा :- ( आश्चर्याने ) क्काsय ? माजी आय ? आन तुला बोलली.. (स्वगत )… गाईनं कवा वागीणीला खाल्ल्यालं म्या तरी  ऐकलं न्हवतं…

(भामाकडं बगत) गप गं गप.. सांजंच रडू नगं.. गरीब-बिचारी माझी माय ती ?

भामा :- (रडणं विसरून एकदम चिडून) काय म्हणलासा ?

रंगा :-  काय म्हनलो ?

भामा :- (चिडून) मगाधरनं तुमची आय न्हाय न्हाय ती बोलली म्हणून मला रडू येतंया.. जीवाला लागलं माज्या.. मी आपली दुपारधरनं रडत बसलीया.. पाण्याचा योक  घोटसुदीक पोटात गेल्याला न्हाय माज्या… आन तुमी… ‘ गरीब ती माजी माय ‘ म्हंतायसा व्हय ? तुमची माज्यावं काय मायाच न्हाय ऱ्हायल्याली बगा ..

रंगा :- (साळसूद पणाचा आव आणत) मी  माय म्हनलो ? (स्वगत) कवातरी चुकून खरं याचंच म्हणा  तोंडांत …(भामाला) न्हाय गं भामे, न्हाय ! आगं मी तर ‘ गरीब ती माजी गाय ‘ आसं म्हनलो …लय रडलीस त्येनं तुला गायचं माय ऐकू आलं असंल… आसं हुतं कवा कवा….

भामा :- (चिडूनच)  न्हाय .. तुमी ‘ माय ‘ म्हनलासा..

रंगा :- न्हाय गं.. मी गाय च म्हंलो… तू माय ऐकलंस..इस्वास नसंल तर कुनालाबी ईचार. (स्वगत )  हिला एक माजं कवा पटतच न्हाय..  मी माय म्हनलो आन आमच्या या भामीनं ‘ माय ‘ ऐकलं .. आता ह्येला ऐकनं म्हनायचं का काय ? (  भामाकडे पहात )   बरं ती जाऊंदेल.. तू गप हो बगू आता.. आपुन त्या म्हातारीचं घर उनात बांदु… (स्वगत) तसं.. माज्या गरीब बिचाऱ्या मायचं घर हिनं कवाच उनात बादलं आसंल म्हणा.. आसल्या कामात लईच उरक हाय तिला..( भामाकडॆ पहात ) भामे,गप रडू नगं..बरं, तुज्यासाठनं च्या आणू का करून ?

भामा :- नगं, मी आनते च्या .. तुमी, दमून आलायसा ..

रंगा :- व्हय.. पर तू बी दमली अश्शील ..( स्वगत ) रडून रडून

भामा :-  आंत्ये मी च्या करून..( आत जाते. जाताना  ‘ कसे मी गुंडाळलं ‘ अशा अर्थाने विजयी मुद्रेने प्रेक्षकांकडे पहात आत जाते )

रंगा :- (स्वगत) ही आसं हाय … आय कायबी बोल्ली नसंल हिला , ही ठावं हाय मला.. अवो, गरीब गाईवानी हाय ती.. आता लईच तरास दिल्याव.. गाय कवातरी शिंगं उगारायचीच..जाऊंदेल .. दोन दिसांनी भामी वाईच निवाळल्याव आणावं आयला..तरी बरं पल्याड धाकला येसवंता हाय.. दोन रोज त्यो तरी बगील आयचं..पर एकांद्या माऊलीला योकच ल्योक आसंल… आन आसली सून पदरात आसल.. त्या माऊलींचं काय खरं न्हाय बगा..  हीच खोडील हाय; ती काय ठावं न्हाय वी मला ?..पर सांगायचं कुनाला ? अवो, पदरात निखारा बांदल्याला हाय ..पर चटकं बसत्यात म्हणाय बी येत न्हाय ..आन टाकून बी द्येता येत न्हाय… उगा आपलं,  ब्येस गार गार लागतंय म्हनायचं .. दुसरं काय..

भामा :- (चहा घेऊन येत ) काय म्हनलासा.. चटकं ? कसलं चटकं बसाय लागल्यात तुमास्नी ?

रंगा :-  (स्वगत ) ही आसं हाय… नगं ती,  लगीच ऐकाय जातंय…आनं आपल्यास्नी आकायचं ती आयकाय येऊनबी न आकल्यागत कराय लागतंय.. ( भामाकडे वळून )  आगं,  डोळ्यांत पानी हाय .. तुला लय दुक बी झाल्यालं हाय.. आन डोसक्यात काय-बाय ईचार असणार.. तवा म्हणलं,  च्या येवस्तीत आन.. गरम आस्तुय .. चटकं बसतीली.. (रंगा चहा घेतो.)

भामा :-  (चहा घेता घेता परत डोळ्यात पाणी आणत)  ह्ये बगा, म्या काय तुमच्या आय ला घरात न्हाय घ्याची .. आधीच सांगून ठेवत्ये…

रंगा :-  हं . म्या कवा तुज्याम्होरं बोलतो काय गं  ? आगं, माजं नशीब म्हनून तुज्यावानी बायकू मला मिळालीया… तू काय म्हंशील तसं…  भामे, लै भुका लागल्यात वाईच जेवनाचं बगतीस काय ..?

भामा :-  व्हय .. पर तुमी सपरात जायाचं न्हाय.. माज्यासंगती चला बगू आत… ( भामा आत जाते ) (आतूनच )

आलासा का न्हाय ? या लगुलग..

रंगा :-  आलो न्हवका.. ( प्रेक्षकांकडे बघून – थोडसं वाकून – दोन्ही हात डोक्यावर शिंगासारखे धरत..नंदीबैलासारखी मान हलवत ” गुबुगुबु ss गुबगुबु ” असा तोंडाने आवाज करत रंगमंचावर दोन तीन फेऱ्या मारून  म्हणतो..)

आमच्या भामीला नवरा न्हवं.. ,ह्यो असला  गुबुगुबु पायजेल…चला गुबुगुबुराव…गुबु गुबु.. गुबु गुबु..( आणखी एक फेरी मारून गुबु गुबु करत आत जात असतानाच प्रकाश कमी होत होत अंधार होतो )

अंधार

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments