श्री अरविंद लिमये
विविधा
☆ भरताचे नाट्यशास्त्र ☆ श्री अरविंद लिमये ☆
भरतमुनीनी लिहिलेला ‘नाट्यशास्र’ हा सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो.आज माघी पौर्णिमा.भरतमुनी जयंती ! या निमित्ताने त्यांच्या या ग्रंथाची ओझरती ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न.जेणेकरुन जिज्ञासू रसिकांना या ग्रंथांवर अनेक अभ्यासकांनी लिहिलेल्या संशोधनात्मक ग्रंथसंपदेच्या माध्यमातून हा ग्रंथ समजून घेण्याबाबत उत्सुकता वाटावी.
या ग्रंथाचे लेखन भरतमुनींनी नेमके कधी केले हे ज्ञात नसले तरी त्यांचा कार्यकाल ख्रिस्तपूर्व चौथ्या किंवा पाचव्या शतकातला मानला जातो. याचाच अर्थ इसवीसनपूर्व काळापासून भारतवर्षात नाट्य,नृत्य,गायनादी कला प्रगतिशील स्तरावर पोचलेल्या होत्या हेच सिद्ध होते.
‘भरताचे नाट्यशास्त्र’ या ग्रंथात नाट्य,अभिनय याशिवाय नृत्य,गायन आदी पूरक कलांचे रंगमंचावरील सादरीकरणाचे शास्त्र व व्याकरणही सविस्तर समजून सांगितलेले आहे.या ग्रंथाची प्रत्यक्ष नाट्यप्रयोगासाठीची उपयोगिता तसेच या ग्रंथाची व्याप्तीही समजावी या हेतूने प्रातिनिधिक स्वरूपात त्यातील ‘अभिनय’ या अंगाचा इथे सविस्तर उहापोह करीत आहे.
या ग्रंथामधे ३६ अध्याय असून त्यातील आठव्या अध्यायात भरताने अभिनयाच्या चार प्रकारांची वैशिष्ट्ये विशद केलेली आहेत.हे चार प्रकार खालीलप्रमाणे-
१) आंगिक २) वाचिक ३)आहार्य व ४) सात्त्विक अभिनय.
आंगिक अभिनय – हा शरीराच्या माध्यमातून केलेला अभिनय. भरताने या ग्रंथात नाट्यधर्मीशैलीचा विचार करताना विविध अंग-उपांगांच्या हालचाली व मुद्रायुक्त रितीबद्ध हावभाव यांची सविस्तर ओळख करून दिलेली आहे.नाट्यधर्मीशैलीनुसार हात,पाय,कंबर,छाती, मस्तक यासारख्या मुख्य अंगांच्या आणि बोटे,डोळे,नाक,गाल यासारख्या उपांगांच्या काही निश्चित आणि प्रतीकात्मक रितीबध्द चेष्टांची एक विशिष्ठ भाषाच तयार केली होती व गद्यपद्यात्मक संवादातील व पात्रांच्या कृतीतील नेमका आशय याच मर्यादित चेष्टांद्वारेच व्यक्त केला जायचा.
आंगिक अभिनयाचे मुखज,शरीर व चेष्टाकृत हे तीन प्रकार. यातील ‘मुखज’ म्हणजे चेहऱ्यावरील भुवया,पापण्या, डोळे, नाक, गाल, ओठ इत्यादी विविध उपांगांद्वारे केलेला अभिनय. ‘शरीर’ अभिनय म्हणजे खांदे,मान, हात, पाय यासारख्या मुख्यअंगाद्वारे केलेला अभिनय. आणि ‘चेष्टाकृत’ म्हणजे शरीर अवयवांच्या विविध हालचालींद्वारे केलेला अभिनय.
याशिवाय कोणती भूमिका साकारताना नटाने कसे चालावे, उठावे, बसावे इत्यादीबाबतचे नियमही नाट्यशास्त्रात सांगितले आहेत.उदा.- वृद्ध पात्र, तरुण पात्र, मध्यमवयीन,अपंग, दमून आलेले, दुःखी, आनंदाने भारलेले, अशा विविध पात्रांच्या मनोवस्था आणि स्थितीनुसार त्यांचे चालणे, उठणे, बसणे, यातील नेमके आणि सूक्ष्म फरक अभिनयाद्वारे दाखवणे अपेक्षित असते. तसेच वेड्या माणसाचा अभिनय करताना त्याचे अस्ताव्यस्त केस, कपडे याबरोबरच त्याचे डोळे, भुवया इत्यादीद्वारे होणारा मुखज अभिनय किंवा भरभर चालता चालता मधेच थबकणे,धपकन् बसणे, संतापणे, मधेच हसणे, यासारखे शरीर व चेष्टाकृत अभिनय याद्वारे त्याचे वेगळेपण अधोरेखित होणे अपेक्षित आहे.
आंगिक अभिनयाचं नेमकं सार भरतमुनींच्याच शब्दात सांगायचे झाले तर ते असे सांगता येईल.-‘ निरनिराळ्या वासाची फुले एकत्र करून माळी जशी फुलांची एक माळ तयार करतो त्याचप्रमाणे नटाने भिन्न भिन्न भावदर्शक अंगोपांगांची रचना करून त्याची सरस, सुंदर, सहज, स्वाभाविक आणि मनोहर दिसेल अशी भावमाला गुंफावी आणि ती प्रेक्षकांना प्रदान करुन आनंदित करावे.’
वाचिक अभिनय-नाटकातील गद्य पद्यात्मक संवाद, गद्य व संगीताद्वारे वाचेचा उपयोग करून प्रस्तुत करणे यास भरताने ‘वाचिक अभिनय’ असे संबोधले आहे. लेखकाच्या प्रत्येक शब्दातील व शब्दांमागील अर्थ जाणीवपूर्वक जपला पाहिजे यासाठी भरतमुनींनी शब्दांच्या खालील चार शक्ती सांगितलेल्या आहेत.
१) अभिदा शक्ती- शब्दांचा साहित्यिक अर्थ स्पष्ट करणारी शक्ती.
२) लक्षणा शक्ती- शब्दात लपलेला अर्थ प्रकट करणारी.
३) व्यंजना शक्ती- शब्दांमधील सांकेतिक अर्थ प्रकट करणारी. ४)तात्पर्य शक्ती- शब्दाचा हेतू प्रकट करणारी.
नटाच्या वाचिक अभिनयातून म्हणजेच संवादांमधील शब्दोच्चारातून या चार शक्तींचा प्रत्यय येणे आवश्यक आहे.
अशा या वाचिक अभिनयाच्या पायावरच आंगिक, आहार्य आणि सात्त्विक अभिनय तोललेले आहेत. याचाच अर्थ अभिनयाच्या या इतर सर्व प्रकारांचा डोलारा वाचिक अभिनयाच्या पायावरच उभा असतो. आहार्य अभिनय नाटकातील पात्रे रंगमंचावर सादर करणाऱ्या नटांना पात्रांचे रूप देणे व अभिनयासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणे हे काम रंगतंत्राचे असते. तसेच दृश्यबंध
व अन्य मंचवस्तू नाटकातील अभिनयासाठी योग्य वातावरण निर्माण करतात. प्रकाश व ध्वनी संयोजनाद्वारे त्या वातावरणाला पूर्ण रूप प्राप्त होते. वेशभूषा व रंगभूषा नटाला पात्ररुप देतात. तथापि या कृत्रिम साधनांनी निर्माण केलेले वातावरण कृत्रिम नसून अस्सलच आहे असा आभास अभिनयाद्वारे निर्माण करणे ही नटाची जबाबदारी असते. अभिनयाच्या या अंगास ‘आहार्य अभिनय ‘ असे म्हटले जाते.
सात्विक अभिनय पात्राच्या सत्त्वाशी संबंधित असलेल्या मानसिक प्रक्रिया आंगिक व वाचिक व आहार्य अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त करणे यास भरताने ‘सात्त्विक अभिनय’ ही संज्ञा दिली आहे.उदा.- कंठ दाटून येणे,डोळ्यात अश्रू येणे,स्तंभित होणे,रोमांचित होणे,शरीराला कंप सुटणे,इत्यादी.या सर्व प्रतिक्रिया नटाच्या अंतर्मनातून निर्माण होत असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या अभिनयास ‘सात्त्विक अभिनय’ असे म्हटले जाते.
भरताच्या नाट्यशास्त्रातील अभिनय या संकल्पनेचा हा ओझरता परिचय !
नाट्यशास्त्र या ग्रंथात भरतमुनीनी नाट्यास पूरक अशा नृत्यसंगितादी कलांचे शास्रही विदित केलेले आहे. दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये उगम झालेली ‘भरतनाट्यम्’ नृत्यशैली भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावरच आधारित आहे. भरतनाट्यम् नृत्याचे सादरीकरण कर्नाटकी संगीताच्या साथीने होते. या नृत्य पद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे. तंजावर बंधू म्हणून मान्यता पावलेल्या संगीतकारांनी या नृत्याचा ‘मार्गम्’ रचला आणि त्याच क्रमाने आजही या नृत्याची प्रस्तुती करण्याची प्रथा आहे.
नाट्यनृत्यकलांचा भक्कम पाया असलेल्या ‘भरतमुनींचे नाट्यशास्त्र’ या ग्रंथाचे मोल म्हणूनच अमूल्य आहे.
भरतमुनी जयंती निमित्त त्यांचे हे लेखनरुपी स्मरण हीच त्यांना वाहिलेली माझी आदरांजली !???
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈