श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ गटुळं – भाग-1 ☆ श्री आनंदहरी 

ग्रामीण एकांकिका :-   गटुळं

(भामा हातात खराटा घेऊन अंगण झाडायला बाहेर येते… अंगण झाडता झाडता छपराकडे नजर टाकते )

भामा :- आँ ss ! येवढ्या येरवाळचं म्हातारी कुनीकडं गेली म्हनायची ? .. कुनीकडं का जाईना..  घरात न्हाय आली म्हंजी बास.. (काहीशी विचारात पडून ) धाकलीनं तर न्हेली नसंल तिला ? छया  ss !  ती कसली न्हेतीया म्हातारीला ..  ब्येस म्हातारीला आमच्या गळ्यात बांदलिया आन ऱ्हात्यात दोगं राजा -रानीवानी.. आमचं ह्येच खुळं … सारकं..’ आय ss आय’ करीत आयच्या पदरामागं ऱ्हातंय.. मी हाय खमकी म्हनुन ..न्हायतर कुनीबी आमच्या ह्या खुळ्याला इस्लामपूरच्या बेस्तरवारच्या बाजारात इकून आलं असतं..  जाऊदेल… ( जरा वेळ अंगण झाडते ..तोवर तिला धुरपदा येत असल्याचे दिसतं ) आली वाटतं म्हातारी.. गावात गेलीवती वाटतं..चला आत जाऊया.. न्हायतर नस्ती ब्याद पुन्यांदा मागं लागायची… तशी, मी लय खमकी हाय म्हना.. ( आत जाते )

धुरपदा :- (दुसऱ्या बाजूने येते अंगणातून उजव्या बाजूला असणाऱ्या सपराकडे जाते. जराशी दमलेली हुश्शss! करीत खाली बसते दाराआडून भामा तिची चाहूल घेत असतेच..)

(स्वगत)  पोटाला दोन पोरं हायती पर योकबी ईचाराय आला न्हाय… आय ज्येवलीया का उपाशी हाय… ह्येचा इचार बी न्हाय … सुना दुसऱ्याच्या घरातनं आलेल्या असत्यात पर पोरं तरी आपलीच असत्यात न्हवं …पर त्यास्नीबी कायसुदीक वाटत न्हाय..कोन कुनाचा नस्तुय ह्येच खरं.. आन त्यात ही म्हातारपन.. म्हातारपन लय वंगाळ.. म्हातारं मानुस कुनालाबी नगंच आसतं ! जाऊंदेल,  उगा डोसक्याला तरास नगं.. वाईच च्या करून प्यावा ..  यशवदेनं भुगुनी आन थाटली दिली ती लय ब्येस झालं.. काय बाय शिजवाय तरी येतंय ..कालच्यान उपाशी हाय ह्ये बिन सांगताच वळीखलं तिनं..आन खाया दिलं…भामीचं बोलनं तिला ऐकाय जायाचं ऱ्हातंय वी.. आवो, माझ्या मागनं नांदाय आली ती .. सोयर न्हाय, सुतक न्हाय पर भनीवानी कंच्या बी वक्ताला आडीनडीला हुबी ऱ्हाती ..

(सागर … धोतर, सदरा, डोक्यावर टोपी असा किंवा तत्सम पुढाऱ्यासारखा पोशाख.. रुबाबदार चालत धुरपा म्हातारी जवळ येतो )

सागर :-  मावशे , काय ऊन खायला बसलीस व्हय ?

धुरपदा :- व्हय रं…  सपरात सावलीला ऊन खात बसलिया.. येतूस का ऊन खाया.?

सागर :-  मावशे, तुजं लय ब्येस काम हाय बग.. (हसत हसत ) व्हय ग मला  घे की दत्तक..

धुरपदा :- घेती की.. पर आनी कुणी दोनजन हायती का बग.. त्यासनी बी दत्तक घेती.. दोन हायती तर सपरात धाडलंय .. पाचजनं झालासा म्हंजी मसनात धाडशीला.. उगा दुसरं खांदकरीबी बगाय नगं…

सागर :-  (काहीच न समजून, उठून निघत ) ती बी खरंच हाय म्हणा.. बरं मावशे, लय कामं हायती, तालुक्याला जायाचं हाय..  तुज काय काम आसलं तर कवाबी हाळी मार.. (टिचकी मारत ) शून्य मिनटात करतो.. ( जातो )

धुरपदा :- खिशात न्हाय गिन्ना आन मला म्हणा अण्णा .. अशातली ह्येची गत..मुडदा फुडारी हुतुय..

बायकू जातीया भांगलाय दुसऱ्याच्या वावरात.. आन ह्ये बोंबलभिकं फिरतंय फुडारी हून..

येसवदा :- (आधाराला काठी टेकत चालत येते ) धुरपदा s ए धुरपदा ss !

धुरपदा :- कोन ? यशवदा व्हय ? ये बाई.

येसवदा  :-  व्हय यशवदाच ! आता माज्याकडं तू याचंस आन तुज्याकडं मी.. दुसऱ्या कुणाला येळ आस्तुय व्हय म्हाताऱ्या संगती बोलाय- बसाय ? टिकारण्या नुस्त्या.. कवा म्हाताऱ्या हुयाच्याच न्हाईती..आन आपली पोरंबी नुस्ती नंदीबैलच हायती..

धुरपदा :- असूनदेल बाई..चार दिस सुनंच अस्त्यात… बस वाईच दम खा..आगं च्या ठेवलाय ..  साखरंचा हाय..घे घोटभर..

येसवदा :- (आश्चर्याने …भामाला ऐकू जावे म्हणून तिच्या दाराकडे पहात..मुद्दाम मोठ्याने ) धुरपे, साखरंचा च्या  ?  ब्येस हाय बग आपलं सपरातच.. सुनां आल्या म्हंजी घोटभर च्या बी मिळायचा न्हाय कवा.. ही ब्येस हाय बग.. कवा च्या प्यावा वाटला तर पेता येतूय करून.

भामा :- ( यशवदाच्या आवाजाने बाहेर येत) काय ओ आत्ती ?

येसवदा :- काय न्हाय.. आलिया मैतरनीला भेटाय..  धुरपीने च्या केलाय… साकरंsचा

भामा :- ( आश्चर्यानं ) साकरंचा च्या ?

येसवदा :-  ( मुद्दामहून तिरक्या भाषेत ) व्हय.. , घेतीस का वाईच..?

भामा :- ( नजर दुसरीकडे  फिरवत) नगं . 

(स्वगत )  च्या ss ? आन साकरंचा ? आमी गुळाचा च्या पेतोय.. आन म्हातारीला भायेर काडल्याव, ती साकरंचा च्या पितीया … 

(म्हातारी यशवदाला काहीतरी हळू आवाजात सांगतेय हे ध्यानात येऊन भामा ने कान टवकारले.  तिने कान टवकारलेले यशवदानं हेरलं तसं ती मोठ्यानं म्हणाली )

येसवदा :-  अगं घे वाईच,..न्हाय मजी.. सुना हायसा.. तुमास्नी द्याला पायजेल.. मेल्याव रडाय पोटाला पोरी कुठं हायती ? तुमास्नीच रडायचं हाय..

(भामा ऐकून न ऐकल्यासारखं करते.. तोंडावर रागाचे भाव )

धुरपदा  :-  यशवदे, दुकानात इतिस का गं संगं?

येशवदा  :- का गं… दुकानात काय काडलंस ?

धुरपदा :- आगं, उद्याच्याला एकादस हाय.. तवा  साबु आनायचाय गं दुकानातनं ?

*येसवदा :- व्हय… आपल्याला जायाच पायजेल दुकानात.. पोटाला दोन दोन लेक हायती पर सुना असल्या घावल्याव….? धुरपे, ह्या जलमातलं ह्याच जलमात फेडायचं आस्तंय.. फेडतील तवा ध्यान हुईल त्यास्नी.. जाऊंदेल.. उगा त्वांड कशापायी वंगाळ करून घ्याचं.. ज्येची करनी त्येच्या संगं.  चल, जाऊया दुकानात.

धुरपदा  :-   थांब वाईच पैकं घ्येते ..

भामा :- ( आश्चर्याने ) आँ ss ! साकरंचा च्या ss, .. साबू ..?

(धुरपदाच्या वाक्क्यानं भामा तिकडं पाहू लागली.. म्हातारीनं हळूच गटूळयाची गाठ सोडली आणि कापडाच्या खाली हात खुपसून हळूच शंभराची नोट काढली.. त्याच वेळी सोन्याची बोरमाळ / माळ बाहेर आली… धुरपानं  ती झटकन आत ढकलली आणि  झटकन गटूळं करकचून गाठ आवळून बाजूला सारलं . भामा हे सारं पहात होतीच. )

भामा :- ( स्वगत ) आँ ss!  म्हातारी लईच आतल्या गाटीची हाय.. शंभराची नोट हाय..सोन्याची माळ हाय..  आनी काय काय हाय त्या गटूळ्यात तिलाच ठावं … तरीच.. तरीच म्हातारी माज गटूळं ..माज गटूळं.. करतीया. कुणालाबी गटूळ्याला हात सुदीक लावू देत न्हाय..  म्हातारीनं गटूळ्यातनं पैसं काडताना, गटूळ्यातला सोन्याचा डाग धाकलीनं बगीतला न्हाय ही ब्येस झालं.. न्हायतर म्हातारीला घरला न्हेली असती, आन समदं येकलीनचं गळपाटलं असतं..  ( भामा क्षणभर विचार करीत राहीली..)

कवासं येत्यात ही… त्यास्नी समदं सांगून म्हातारीला घरात आणाय पायजेल…

(भामा घरात गेली आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पहात धुरपदा हसली)

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments