श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ गटुळं – भाग-4 ☆ श्री आनंदहरी ☆
ग्रामीण एकांकिका :- गटुळं
(यशवंतांचे घर.. सोपा रंगाच्या सोप्यासारखाच.. देवाच्या चित्राऐवजी कॅलेंडर असा किरकोळ बदल.. जेन /घोंगडं / चटई अंथरलेली.. नेपथ्यात काही किरकोळ बदल करण शक्य असेल तर तेवढाच )
(यशवंता विचारात अस्वस्थपणे फेऱ्या मारत आहे.. आतून सारजा -यशवंतांची बायको चहा घेऊन येते..)
सारजा :- च्या घ्या..
यशवंता :- (चहा घेत ) सारजे, दोन दिस झाले, आय सपरातच दिस्तीया.. काय झालंया कुनास ठावं ?… तिला च्या प्याला हाळी मारतीयास काय ?
सारजा :- व्हयss! मारते की हाळी… तुमास्नी कवाबी, कुणाचाबी लई पुळका येत आस्तुय..
यशवंता :- ( काहीशा रागानं ) कुनाचाबी ? काय बोलतीयास काय ?.. आगं, आय हाय ती माजी.. ततं तुजी आय आसती तरीबी अशीच म्हनली आस्तिस व्हय गं ?
सारजा :- माज्या आयचं नाव काडायचं काम न्हाय हां… आगुदरच सांगत्ये तुमास्नी.
यशवंता :- का गं ? तुजी आय येगळी आन माजी येगळी हाय व्हय ?.. आग, आय ती आयच असती.. उद्या तुलाबी पोरं हुतीली ,सुना येतीली .. त्या बी तुज्यासंगती आसंच वागल्यावं..
सारजा :- सारजा नाव हाय माजं.. माज्यासंगती आसं वागाय वागाचं काळीज पायजेल, वागाचं !.. आन, माज्यासंगंती आसं वागायचा कुनी ईचार जरी क्येला तर सळळी सोडीन व्हय मी त्यास्नी? आन, सुना माज्या संगती अशा वागल्याव माजी पोरं त्यास्नी नांदीवतीली व्हय वो ?
यशवंता :- व्हय ! ही ध्येनातच आलं न्हाय बग… ( स्वगत ) जवर येळ येत न्हाय तवर समदी वागच असत्यात…
सारजा :- काय म्हनलासा ?
यशवंता :- कोन मी ? छया ss छया ! मी कशाला काय बोलींन ?… पर सारजे.. वाघ बी कवातरी म्हातारा हुईत आसंलच की..नकं झडल्याला, दात पडल्याला…
सारजा :- म्हंजीss, तुमास्नी काय म्हनायचं हाय ?
यशवंता :- मला ? मला काय म्हणायचं आस्तंय…? आगं ,लगीन झाल्याधरनं मी कवा काय म्हंतोय व्हय ? येकडाव का गड्याचं लगीन झालं की.. तोंडाचं काम कमी हुतं.. आन, मानंचं – कानाचं काम वाढतं म्हंत्यात समदीजनं… ती बी काय खोटं नसतंय म्हना..
सारजा :- अवो, म्या काय म्हंतीया .. तुमी काय बोलतायसा.. मला तुमचं कायबी उमगना झालंय बगा..
यशवंता :- काय बी असूनदेल.. पर सारजे, तू मातूर येकदम फायना बोलतीस हां… माजं तसं न्हाय गं… आता तुज्यावानी बोलन्याचा सराव न्हाय न्हवं ऱ्हायल्याला…
सारजा :- अवो, काय बोलतायसा? वाईच, समजंल- उमगलं आसं बोला की..
यशवंता :- ( स्वगत ) बायकुला समजंल – उमजंल आसं बोलाय जमल्याला योक तरी गडी हाय वी ह्या दुनियेत ? (सारजाला )… व्हय गं, म्या काय म्हनतो.. आयला आनूया का घरात ?.. बिचारी सपरात हाय.. वयनीचं काय बिनासलंया कुणाला ठावं..?
सारजा :- अवो, तुमी गप बसा.. तुमास्नी काय बी कळत न्हाय..
यशवंता :- व्हय.. ती बी खरंच हाय तुजं.. तुज्यासंगं लगीन क्येलं तवाच उमागलं बग मला ती..
सारजा :- ( रागानं ) म्हंजी? काय म्हनायचं हाय तुमास्नी..?
यशवंता :- आगं, तुला चिडाय काय झालं ? तुला तर खुश हुया पायजेल… आगं, म्या म्हंलो, आगुदर मला कायच उमगत न्हवतं… तू आलीस आन वाईच वाईच कळाय लागलंय बग… काय कराय पायजे हुतं ? काय कराय नगं हुतं ? ह्ये आत्ता उमगाय लागलंय बग.. आन ती समदं तुज्यामुळं… पर ती जाऊदेल. सारजे, चिडल्याव तू काय फायना दिस्तीस गं.. आक्षी आरशावानी… आगं, साळंत जात हुतो तवा गुरुजी आंतरगोल – बहिर्गोल आरश्याचं शिकवीत हुतं.. त्येचंच ध्यान झालं बग… ( स्वगत ) साळा शिकलो असतो तर ह्यो आरसा कशाला पदरात पडला असता.. पर.. जाऊंदेल..
सारजा :- काय म्हंलासा..? मला समदं आयकाय येतंय म्हनलं..
यशवंता :- क्काय ss ? तुला आयकाय येतंय वी..? लगीन झाल्याधरनं कवा दिसलंच न्हाय बग.. मला तर वाटलं, तुला निस्तं बोलाय येतंय..
सारजा :- म्हंजी ?
यशवंता :- म्हंजी..? आईकलंस न्हवका तू ? आगं, म्या म्हनलो साळा शिकलो असतो तर ह्यो आरसा कसा पदरात पडला असता.. साळा शिकलो न्हाय तीच ब्येस झालं.. येवडी फायना दिस्तीयास तू ..कसं सांगू तुला ? एss चल की वाईच..
सारजा :- गप बसा !.. उगा आगाऊपणा करू नगासा ?
यशवंता :- ( लाडात आल्यासारखा ) ए ss ! ए सारजे ss! आगं, मी काय म्हंतुय ती ऐकतीयास न्हवं ?
सारजा :- ( खोट्या रागात..) कायतरीच तुमचं.? गपा !.. काळ न्हाय न येळ न्हाय..
यशवंता :- आगं.. ! आयला घरात आणाय काळ न येळ कशापाय बगाय लागतुय गं ?
सारजा :- ती म्हनतायसा व्हय ?
यशवंता :- मग तुला काय वाटलं गं..?
सारजा :- कायबी न्हाय..! अवो, तुमास्नी काय बी कळत न्हाय बगा.. अवो, त्या थोरलीनं म्हातारीचा पैका-आडका , डाग- बिग समदं घेतलं आसंतीली काडून ..आन दिली म्हातारीला हाकलून.. लय च्यापटर हायती दोगंबी..
यशवंता :- आगं, आयकडं कुटनं आलाय डाग आन पैका-आडका..?
सारजा :- व्हय.. तुमास्नी समदंच ठावं आसतंय न्हवका ?.. अवो, बाई म्हनली का गाटीला गाट मारीत अस्तीच.. तुमास्नी न्हाय उमगायचं त्ये…
(आपण चुकून नको ते तर बोललो नाही ना ? असे वाटून जीभ चावते )
माज्यावानी एकांदीच आस्तिया बगा.. म्या हातचं काय बी ठेवीत न्हाय.. पर माज्यावानी दुसरी नस्त्यात… ह्ये बगा, त्येंच्याकडं बगील त्येंचा लाडका ल्योक आन लाडकी सून.. उगा तुमी नगा काय बाय ईचार करूसा..
तुमी डबा घ्याचा आन नाकाम्होरं बगीत गप कामाव जायाचं.. ध्येनात ठ्येवायचं.. इसरायचं न्हाय.. चला आत .. डबा द्येतें..
(सारजा आत जाते )
यशवंता :- ( सारजाची नक्कल करीत ) नाकाम्होरं बगीत गप कामाव जायाचं.. ध्येनात ठेवायचं.. पार झापडं लावलेल्या टांग्याचा घोडाच केलाय माजा ह्या सारजीनं..
(घोड्याला झापडं बांधतात तसं दोन्ही हात काना पासून डोळ्यांकडे दोन्ही बाजूला झापडासारखे धरतो आणि ‘तगडक ss तगडक ss ‘करीत दोन फेऱ्या मारून आत जातो. )
(प्रकाश हळूहळू कमी होत अंधार होतो )
अंधार
क्रमशः…
© श्री आनंदहरी
अद्वैत, मंत्रीनगर, इस्लामपूर जि. सांगली
8275178099 / 9422373433
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈