श्री सुजित कदम

☆ साहेब…! ☆ 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।)

त्या दिवशी ऑफिस मधलं सारं काम आटपून मी बाहेरच्या चहाच्या गाडीवर येऊन थांबलो महीना आखेर मुळे पाकीटातल्या कमी झालेल्या पैशाची गोळा बेरीज आणि घरी जाताना पुन्हा ट्रेन मध्ये तीच धक्काबुक्की तीच गर्दी डोक्यात प्रश्नांची सरमिसळ चालू असतानाच ,चहाचा एक एक घोट  ट्रेन च्या लढाईवर जाण्यासाठी मला सज्ज करत होता.

चहा संपवून मी चहाचा कप खाली ठेवणार  एवढ्यात ” साहेब ” ही करूण हाक माझ्या कानावर पडली. मी त्या दिशेने पहाताच माझ्या समोर त्या माऊलीने पसरलेला हात मागे घेतला. तिच्या सोबत असणारं तिच लहान लेकरू तिला घट्ट बिलगून उभ राहील होतं. मी तिच्या हातावर रूपाया देण्यासाठी खिशात हात घालणार , एवढ्यात त्या माऊलीने पुन्हा माझ्यासमोर हात पसरला आणि लेकरांबद्दलची सारी माया एकवटून तिनं, “साहेब  ‘पाच रू’ आहेत का ?” म्हणून  विचारलं. खरं सांगायचं तर कुणीही पैशाची मदत मागितल्यावर त्याला कशासाठी म्हणून विचारायचं नाही. जमत असेल तर हो म्हणायचं नाहीतर नाही म्हणायचं असा माझा स्वभाव.  पण मुळात नाही म्हणणं आपल्या स्वभावात बसत नाही. पण त्या दिवशी तिनं पाच रूपये आहेत का विचारताच माझ्या तोंडून कसाकाय तो अचानक  ‘कशासाठी’ हा शब्द बाहेर पडला कदाचित त्या माऊलीच्या चेह-यावर एकवटलेली  तिच्या लेकरांबद्दलची माया बघूनच डोक्यात चाललेल्या प्रश्नांच्या गुंत्यातून वाट काढत तो शब्द ओठांवर आला असावा. तिनेही मग लेकराच्या डोक्यावरून हात फिरवत काहीशा अस्वस्थतेनच उत्तर दिलं  “लेकरांला भूक लागलीय , साहेब ” .मनात विचार केला की पाच रुपयात ह्या लेकराच पोट खरंच भरेल का? आणि त्याचं पोट भरलं तरी त्या मायेच्या भुकेच काय ? तिला भूक लागली नसेल का..? मी काहीच बोलत नाही हे बघून ती दोघं पुढे निघून जात असतानाच मी त्यांना आवाज दिला माघारी  बोलवलं.

चहाच्या गाडीवर कामाला असणा-या गणप्याला सांगून त्या माय लेकराला पोट भर मिसळ पाव खायला द्यायला सांगितलं. त्या माऊलीन माझ्यासमोर हात जोडले अन् म्हटली साहेब एवढं नको फक्त पाच रूपये द्या मी तिला काही न बोलताच दोघांनाही बसायला खुर्ची दिली त्या माऊलीने पुन्हा नकारार्थी मान डोलवली आणि म्हटली इथं नको आम्ही तिथं खाली बसून खातो मी म्हटलं नाही इथेच बसून खायचंय तेव्हा गणप्यानं रागानच त्याच्या समोर मिसळची डीश आणून ठेवली तेव्हा मी ही गणप्याकडं रागाने बघताच गणप्या निघून गेला. दोघा माय लेकरांना खाताना पाहून डोळ्यात पाणी दाटून आलं तिनं लेकरांला करून दिलेल्या पावांच्या तुकड्यां समोर माझ्या मनातले, प्रश्नांचे तुकडे अगदीच शूल्लक वाटू लागले त्या दोघांनीही पोटभर खाऊन हात धूतल्यावर  ती माऊली  पुन्हा माझ्या समोर येऊन उभी राहिली अन् पुन्हा माझ्या समोर हात जोडले अन् म्हटली ” खूप उपकार झालं  , येळेला मदत केली साहेब .” त्या माऊलीने मला साहेब म्हणून हाक मारताच मी म्हटलं साहेब नका म्हणू… मी त्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवताच, ते दोघं निघून गेले .

पण मी मात्र त्यांना बराच वेळ पहात उभा राहिलो. साहेब शब्दात  अडकलेला मी  आज गरजवंताला देवता स्वरूप भासलो होतो. मी तसाच  उभा होतो. .  रोज रेल्वे स्टेशन वर गर्दी नसलेल्या ट्रेन ची वाट पहात उभा असतो तसाच……!!

 

© सुजित कदम, पुणे

मोबाइल 7276282626.
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Leena Kulkarni

खूप छान शब्दांची मांडणी. अप्रतिम लिहिले आहे