मनमंजुषेतून
☆ मोडेन, पण वाकणार नाही. ☆ सौ. राधिका माजगांवकर पंडित ☆
आमचे काका ती. स्व. दामोदर सखाराम माजगांवकर देहू रोड येथे मिलीट्रीत होते. आर्मीतल्या, ब्रिटीश राजवटीत हुतात्मा झालेल्या शूरवीरांची कथा सांगण्यांत त्यांचा हातखंडा होता. ऐकतांना प्रसंग डोळ्यांसमोर उभा रहायचा. लहानपणी मनावर ठसलेली, कोरलेली अंगावर शहारे आणणारी ही कथा आहे – श्री.कर्णिकांची.
पुण्यातल्या श्री जोगेश्वरीवरून बुधवार चौकाकडे जाणाऱा सरळ रस्ता – थोडक्यात म्हणजे हल्लीचं श्रीदगडूशेट गणपती मंदिर, श्री गणेश वास्तव्य आहे ना, तोच तो रस्ता. त्याच्या डावीकडे फरासखाना पोलीस चौकी आहे. तिथेच एक दीपस्तंभ अजूनही कित्येक वर्षांचा, जुना झाला तरी भक्कमपणे उभा आहे आणि त्यावर नाव कोरलंय – “भास्करदा कर्णिक”.
कर्णिकांनी आपल्या देशासाठी फार मोठ्ठं बलिदान केलं आहे. पण आज पुणेकर त्यांना विसरले आहेत. हा स्तंभ म्हणजे कसलं प्रतिक आहे? कुणाच्या नावाची ही निशाणी आहे? त्याबद्दल कसलीच, काहीच माहिती नसलेली अशी ही वास्तु सध्या उपेक्षित ठरलीय. कारण श्री. कर्णिकांच्या बरोबरच त्यांची निशाणी, काळाच्या पडद्याआड गेलीय. पण त्यांचा आदर्श, त्यांचं बलिदान, त्यांचं नाव आपण मनात जागवूया.
श्री.भास्करदा कर्णिक ऑर्डिनन्स फॅक्टरित नोकरीला होते. हुषार आणि अत्यंत धाडसी होते. त्या काळचे १९४०-४२ सालचे उच्चपदवी विभूषित असे असलेले हे धडाडीचे तरुण! देशासाठी काहीतरी करण्याची त्यांच्या मनात विलक्षण उर्मी होती. ऑर्डिनन्स फॅक्टरीतच नोकरीला असल्याने तेथील सामग्री जमवून धाडसाने यांनी हातबॉम्ब तयार केले. थोडे थोडके नाही, तर अर्धा ट्रकभरून बॉम्बची सज्जता झाली आणि हा बॉम्बहल्ला करण्यासाठी कर्णिकांना देशप्रेमी साथीदारही मिळाले. त्यांची नांवे सांगायलाही अभिमान वाटतो, श्री. गोरे, श्री दीक्षित, श्री काळे, श्री जोगेश्वरी मंदिरातील’ व्यवस्थापक गुरव श्री भाऊ बेंद्रेही त्यांना सामील होते. इतकंच काय, देवीच्या मंदिरातच हे बॉम्ब लपवले होते. अखेर धाडसी खलबत होऊन निर्णय ठरला. आणि कॅपिटॉलवर बॉम्ब टाकण्यांत ते यशस्वी झाले. पण हाय रे देवा! कसा कोण जाणे दुर्दैवाने ब्रिटीशांना सुगावा लागला आणि साथीदारांसह श्री. कर्णिक पकडले गेले.
फरासखान्यात ह्या देशप्रेमींना आणण्यांत आलं. आजचा सध्याचा मजूर अड्डा आहे ना?तीच ती जागा. पुराव्याअभावी बाकीचे साथीदार सुटले. पण श्री.कर्णिक मुख्य आरोपी म्हणून, डाव फसल्यामुळे अडकले. पण ते डगमगले नाहीत. परिस्थितीचं भान त्यांना आलं. लघुशंकेसाठी परवानगी मागून ते बाजूला गेले. क्षणार्धात खिशातली विषारी पुडी त्यांनी गिळून घेतली. चार पावलं चालल्यावर फरासखान्याच्या पहिल्या पायरीवरच ते कोसळले आणि तिथेच त्या क्षणीच त्यांनी देशासाठी देहत्याग केला.
तर मंडळी असा आहे त्या पायरीचा इतिहास. मोडेन पण वाकणार नाही, हे ब्रीदवाक्य स्मरुन तो देशप्रेमी हुतात्मा झाला. त्यांची आठवण स्मृतिचिन्ह म्हणून उभा केलेला स्तंभ आता जुना झालाय. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय. मध्यंतरी बराच काळ गेला. भास्करदा कर्णिक ही अक्षरेही आता पुसट झालीत. आणि आता ह्या हुतात्म्याचाही दुर्दैवाने पुणेकरांना विसर पडलाय.
संपली श्री भास्कर दा. कर्णिक ह्यांची कथा. ज्यांना ही कथा माहित आहे, ते दगडूशेट गणपती मंदिरातून बाहेर पडतात, डावीकडे वळून स्तंभापुढे उभे रहातात, क्षणभर विसावतात आणि नतमस्तक होतात.
तर मंडळी आपणही या थोर हुतात्म्याला मनोभावे श्रध्दांजली देऊयात. ??
भारतमाताकी जय!
मित्र मैत्रिणींनो, एक गोष्ट नमूद करून, आवर्जून सांगाविशी वाटते. माझे ती.स्व.काका मिलिट्रीत असल्यामुळे त्या हुताम्याचं हौतात्म्य ते जाणत होते. अजूनही इतिहासकालीन दोन दीपमाळा श्रीजोगेश्वरीसमोर भक्कमपणे उभ्या आहेत. तिथे आम्ही रहात होतो. फरासखाना तिथून आम्हाला अगदी जवळच होता. काका थकले होते. काठी टेकत टेकत मला सोबत घेऊन “श्री.कर्णिक स्तंभा”जवळ जाऊन नतमस्तक होऊन मानाची सलामी, मानवन्दना हुतात्मा श्री. कर्णिकांना ते द्यायचे.
धन्य ते हुतात्मा – श्री. कर्णिक आणि धन्य ते माझे देशप्रेमी काका. त्या दोघांना आपण कडक सॅल्यूट करूया. तर अशी होती ही श्री. कर्णिकांची गौरवपूर्ण धाडसी गाथा.
तेथे कर माझे जुळती. ??
© सौ राधिका माजगावकर पंडित,
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈