सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग – 6 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:)

रामनवमीच्या उत्सवासाठी वेणास्वामी चाफळला आल्या. आल्यानंतर दोन-चार दिवसातच त्यांना ताप भरला. थंडी तापाने गाठले. तशाच अवस्थेत नदीवर जाऊन, त्या स्नान  करून आल्या. त्यामुळे तब्येत आणखीच बिघडली. औषधे घेतली ,पण औषधांचा काहीही परिणाम होईनासा झाला. त्यांना आता काळजी लागली. रामाचा उत्सव कसा होणार! मनाची तळमळ सुरू झाली. काय करावे काही सुचत नव्हते. रामनवमीचा उत्सव होणार याची मात्र खात्री होती. तरीही काळजी लागून राहिली होती .शेवटी त्या खुरडत, खुरडत रामाच्या मंदिरात गेल्या. अशक्तपणामुळे उभे राहणेही कठीण जात होते. खांबाला धरून उभे राहायला येते का, ते पहात होत्या. पण तेही कठीण झाले. शेवटी स्वतःला त्यांनी आपल्याच लुगड्याच्या पदराने, खांबाला बांधून घेतले. अश्रू गळत होते. श्रीरामाची प्रार्थना करायला लागल्या .अंतकरण भरून आले. श्रीरामाच्या मूर्तीकडे पाहिले, आणि त्यांना दिसले की, श्रीरामाच्या डोळ्यातून पाणी यायला लागले आहे. माझ्या भक्तवत्सल रामाला माझ्यामुळे किती दुःख सोसावे लागले, असे म्हणून त्या दुःखी झाल्या .रामभक्त आणि राम यांचे नाते जुळले .अत्यंत हृदयस्पर्शी असे काव्य त्यांना सुचभले. पतित पावना जानकी जीवना। अरविंद नयना रामराया। ——- आता पुन्हा पुन्हा उत्सवाचे कसे होणार याची काळजी लागली .

रमाबाई नावाची एक बाई, “मला उत्सवाची कामे करण्यास,आक्कास्वामींनी पाठविले आहे”, असे सांगून वेणा स्वामींकडे आली. तिने वेणा स्वामींना औषधोपचार केले. तापही उतरला. त्यांच्या देखरेखीखाली रमाबाई सर्व कामे भराभर करू लागली. उत्सवाचा दिवस उजाडला .समर्थ, आक्का स्वामी आणि दूरदूरचे लोक उत्सवासाठी यायला लागले. वेणास्वामीनी अक्का स्वामी व समर्थांना, रमाबाईंनी केलेल्या कामाचा तपशील सांगितला. आक्का स्वामी म्हणाल्या, “मी तर कोणालाच पाठवले नव्हते”. रमाबाईंचा शोध घेतला. पण रमाबाई  गायब झाली होती. भक्तांच्या आनंदोत्सवाच्या निमित्ताने, श्री रामप्रभूनीच काम केले,अशी खात्री झाली.

आजारपण, उत्सवाची जबाबदारी, कामे यामुळे वेणा स्वामींना अशक्तपणा जाणवत होता .बरेच दिवसात त्या माहेरी कोल्हापूरला गेल्या नव्हत्या. समर्थांकडे तशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. पण समर्थांनी सांगितले की,” उद्या आपल्याला सज्जनगडावर जायचे आहे. तुमचा थकवा कमी झाला ,बरे वाटू लागले की ,मग बघू “.दुसरे दिवशी अक्कास्वामी आणि प्रभू रामचंद्राचा निरोप घेऊन सर्वजण सज्जनगडावर जायला निघाले.  अशक्तपणामुळे वेणास्वामींची पावले हळूहळू पडत होती. थांबून, थांबून चालावे लागत होते. वर पोहोचल्यानंतर कल्याण स्वामींनी आपल्या गुरु  भगिनीची औषध पाणी ,खाण्यापिण्याची खूप काळजी घेतली. आठ दहा दिवसात त्यांना बरेही वाटू लागले. समर्थांनी घोषणा केली .”चैत्र वद्य चतुर्दशीला, दुपारी चार वाजता वेणा स्वामींचे कीर्तन होईल. आणि मग त्या माहेरी जातील. स्वतः  वेणास्वामींना खूप आनंद झाला. त्याचबरोबर आजूबाजूचे लोकही आनंदित झाले .कारण बरेच दिवसात त्यांनी वेणा स्वामींचे कीर्तन ऐकले नव्हते. आज आपण आपल्या गुरुं समोर कीर्तन करणार ,त्याचा त्यांना अभिमान आणि धन्य धन्य वाटत होते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments