श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ महिनाअखेरचे पान – 2☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
महिनाअखेरचे पान
पौषाचे काही दिवस आणि माघाचे काही दिवस घेऊन येतो फेब्रुवारी महिना. इंग्रजी कालगणनेतील वर्षाचा दुसरा महिना. बारा महिन्यांतील आकाराने सर्वात छोटा महिना. छोटा असला तरी एक मोठ काम त्याच्याकडे दिलं आहे. ते म्हणजे कालगणनेत सुसूत्रता आणण्याचे. दर तीन वर्षांनी येणारे ‘लीप इयर’ या महिन्यामुळेच साजरे होऊ शकते .
तीस आणि एकतीस तारीख बघण्याचे भाग्य फेब्रुवारीला लाभत नाही पण दर तीन वर्षांनी एकोणतीस तारीख या महिन्याला दर्शन देते आणि या दिवशी जन्मलेल्याना आपला खराखुरा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य लाभते.
अशा या फेब्रुवारी महिन्यात अनेक थोर व्यक्तींचा जन्म दिवस हा जयंती म्हणून साजरा केला जातो. याच महिन्यात असते गणेश जयंती. हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवरायांची जयंती याच महिन्यात असते. तसेच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, संत रोहिदास, संत गाडगेबाबा, शेगावचे संत गजानन महाराज या सर्वांच्या जयंती समारोहांमुळे त्यांचे विचार, शिकवण यांचा विचार केला जातो. काही चांगले उपक्रम राबवले जातात. संत वाड्मयाचे वाचन होते.
माघ कृष्ण नवमी या दिवशी समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. हा दिवस दास नवमीचा. याच महिन्यात असते स्वा. सावरकर आणि वासुदेव बळवंत फडके या दोन क्रांतीकारकांची पुण्यतिथी. इतिहासातील क्रांतीकारक घटनांचे त्यानिमीत्ताने स्मरण होते. संतांची शिकवण आणि क्रांतिकारकांचे विचार आपल्या पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरतात.
माघ शुद्ध सप्तमी हा दिवस रथसप्तमीचा. भारतीय परंपरेप्रमाणे हा दिवस सूर्याचा जन्मदिवस मानला जातो. सूर्यनमस्काराचे महत्व लक्षात घेऊन जागतिक सूर्यनमस्कार दिन याच दिवशी साजरा होतो. या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. पारंपारिक उत्सवांबरोबर अशा उपक्रमांमुळे आधुनिक, विज्ञानवादी विचारांना चालना मिळते.
माघ शुक्ल पंचमी म्हणजे वसंत पंचमी. वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. सृष्टीत वसंताचे वैभव फुलू लागलेले असते. या वसंताचे स्वागत करण्यासाठी वसंत पंचमी किंवा ऋषी पंचमी साजरी होते. या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे.
मराठीतील ज्येष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन सत्तावीस फेब्रुवारीला असतो. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या चळवळीला अधिक बळ प्राप्त होते.
जोहान्स गटेनबर्ग या जर्मन लोहव्यावसायिकाने जगाला आधुनिक मुद्रण कलेची देणगी दिली. चोवीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस. त्यामुळे हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणूनसाजरा केला जातो.
थोर भारतीय भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरामन् यांनी 28/02/1928 ला लावलेला शोध ‘रामन इफेक्ट’ या नावाने प्रसिद्ध आहे. समाजात विज्ञानरूची वाढावी व विज्ञानजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
असा हा फेब्रुवारी महिना. धार्मिक, सामाजिक, वैज्ञानिक अशा सर्वच घटनांनी गजबजलेला महिना खूप लवकर संपला असं वाटतं. काळ मात्र पुढे ‘मार्च’करत असतो. येणा-या मार्च महिन्याच्या दिशेने !
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈