सौ राधिका भांडारकर
देवळातील घंटा… सौ राधिका भांडारकर ☆
फुलोरा कलेचे माहेर घर
१२/०१/२०२१
? देवळातली घंटा ?
गंमत आठवते.
लहानपणी आम्ही कोपीनेश्वरच्या देवळात देवदर्शनाला जात असू.ठाण्यातलं हे प्रसिदध मंदीर. भव्य, रम्य परिसर..समोर सुरेख तलाव..
देवळातला ऐसपैस चौक..देखणा नंदी आणि गाभार्यातली ती ऊंच शंकाराची पिंड..
देवळात शिरताशिरताच,प्रथम घंटा वाजवायची.
तेव्हां माझा हात घंटे पर्यंत पुरायचा नाही. मग आजीच्या कडेवर बसुन छान दणदण घंटा वाजवायची…मग नंदीचेआणि पिंडीचे दर्शन..
देवळातून परततानाही मला घंटा वाजवावीशी वाटे. पण आजी सांगायची ,”परतताना घंटा नसते वाजवायची…”
तेव्हां मनात हे प्रश्न कधी आलेच नाहीत. देव दर्शनाआधीच घंटा का वाजवायची.परतताना का वाजवायची नाही…
पण नंतर माझ्या थोड्याशा खेळकर, मिस्कील स्वभावानुसार मी काही संदर्भ लावले.
म्हणजे शाळेत असताना वर्गात शिरताना, नोकरी विषयक मुलाखतीच्या वेळी ,नंतर बाॅसच्या केबीन मधे जाताना ,”मे आय कम ईन सर..!!”अशी परवानगी घेउनच जायचे असते.
किंवा कुणाच्या खोलीत शिरताना दार ठोठावायचे.. दारावरची बेल वाजवायची.. हे सारे शिष्टाचार पाळताना देवळातल्या घंटेचा अर्थच उलगडला…दर्शनापूर्वी देवाचीही परवानगी घ्यावी लागते..किंवा घंटा वाजवून भक्ताने देवाला सांगायचे असते!”देवा मी तुझ्या दर्शनासाठी आलोय बरं का…
“घंटेच्या माध्यामातून देवाशी केलेला हा संवादच असतो.
अशा पद्धतीने देवाची अपाॅईंटमेंट घ्यावी लागते, किंवा असे तर नाही ना, घंटा बडवून, देवाला आपल्यासाठी जागे करायचे, म्हणायचे, “परमेश्वरा ,आता तरी डोळे उघड. तुझी कृपा दृष्टी आम्हावर सदैव राहू दे,…!!!
मात्र गंमतीचा भाग सोडला तर… घंटानाद म्हणजे ब्रह्मनाद असतो. त्या नादातून जी कंपनं निर्माण होतात त्यामुळे वातावरण मंगलमय, शुद्ध होते.
सर्व नकारात्मकता नष्ट होते.आपल्या मनात विचारांचा कल्लोळ असतो.मन अशांत असते.
घंटानादामुळे चित्त शांत, एकाग्र होते. आणि देवरुपाशी एक प्रकारचे तादात्म्य अनुभवास येते.
थोडक्यात, जेथे वाजते घंटा तेथे सरतो तंटा.
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈