सुश्री अरूणा मुल्हेरकर
सूर संगत
☆ संगीताचा विकास – भाग-२ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
३) मध्ययुगीन काल~ इ.स. ८०० ते १८००.
या कालखंडांत रागसंगीताचा उगम व प्रसार झाला.साधारण १५०० ते २००० वर्षापूर्वीचा हा काळ.जयदेवाचे गीतगोविंद याच कालखंडांतील असून त्यांतील अष्टपदींवर मालवी, वराटी,वसंत,बिभास, भैरव अशी रागांची नावे आढळतात.विलक्षण कल्पनाशक्तीचे व बुद्धीचातूर्याचे लक्षण असणारी ही रागपद्धती नेमकी केव्हा,कोणी,कशी आणली या संबंधीचा कोणताही पुरावा अस्तित्त्वांत नाही. परंतु परकीय स्वार्या, राज्यांची उलथापालथ ह्यामुळे समाजजीवन फार अस्थिर स्वरूपाचे होते.अशावेळी अनेक संगीत जाणकारांनी आपल्या बुद्धीचातूर्याने लोकसंगीतांतून रागपद्धतीस जन्म दिला आणि पुढे शेकडो वर्षांच्या कालखंडांत सतत नवनव्या रागांची भर पडत गेली.मुसलमान व इंग्रज यांनी दीर्घकाळ एकछत्री साम्राज्य चालविले,भारतीय मनावर परकीयांचे अनेक संस्कार झाले,मात्र भारतीय रागसंगीत हे पूर्णपणे भारतीयच राहीले.जातिगायन पूर्णपणे लुप्त झाले आणि धृपद गायकी अस्तित्वात आली.अकबराच्या दरबारांतील नवरत्नांपैकी मिया तानसेन(रामतनू)हा धृपदिया म्हणून प्रसिद्ध होता.मियाकी तोडी,मिया मल्हार वगैरे आजचे लोकप्रिय राग हे तानसेनाने निर्माण केले आहेत.ह्या संबंथी अशी कथा सांगतात की,तानसेनाने दीपक राग गावून दीप प्रज्वलन केले पण हा राग गात असताना त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला तेव्हा तानसेनाच्या बायकोने व मुलीने मल्हार गाऊन होणारा दाह शांत केला.
मुघल साम्राज्यांत त्यांनी आणलेल्या पर्शियन संगीताने भारतीय संगीतावर थोडा परिणाम केला.तेराव्या शतकांत अमीर खुश्रो या संगीतकाराने भारतीय संगीतावर पर्शियन संगीताची कलमे केली आणि त्यातून एक नवीन गायनशैली अस्तित्त्वांत येऊ लागली.हीच ती आजची लोकप्रिय ख्याल गायन पद्धति. ठुमरी,गझल,कव्वाली हे गायनप्रकारही यावनी कालखंडांतच प्रसार पावले.परिणामी धृपद गायकी मागे पडून ख्याल गायकीने पूर्णपणे मैफीली व्यापून टाकल्या.आजही भारतीय संगीताची मैफल ख्याल गायकीनेच व्याप्त आहे.
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈