? जीवनरंग ❤️

☆ रूप्या…भाग 3 ☆ मेहबूब जमादार ☆

हे ऐकुन तात्या म्हणाला,

“मला माझ्या रूप्याला ईकायचं नव्हतं वो आण्णा”

रामरावआण्णांनी चार गोष्टी तात्याला समजावून सांगितल्या. त्याचा परिणाम असा झाला की तात्या त्या दिवशी जेवला. नेहमी परमानं तात्या गोट्यात जात हूता. पण रूप्या सोडून गोटा हे गणितचं तात्याच्या डोक्यात बसत नव्हतं.

आज तात्यानं सारं आवरलं. तो न जेवताच रामोसवाडीवर गेला. त्याला हे माहित होतं कि कापायला न्यायची बैलं जगू रामोशी खरेदी करायचा. आठ-दहा बैलं झालीं की तो ट्रकातनं बाहेर पाटवायचा. तात्या रामोसवाडीत शिरला. थोडं आत जाताच त्येला बैलांची दावण दिसली.

तात्याला पहाताच रूप्या ऊटून हंबराय लागला. तात्या रूप्याजवळ गेला. त्याला रडू आवरेना. त्यानं पाहिलं,रूप्यानं टाकलेल्या गवताच्या काडीला हात लावला नव्हता. तात्यानं रूप्याच्या तोंडावरंन हात फिरवला. तात्यानं शेजारी ठेवलेल्या ब्यरलमधलं पाणी पाजलं. तीन चार कळशा तो पाणी प्याला.

तोवर घेणारा मालक जगू तिथं आला. त्यानं ओळखलं. त्यानं लांबूनच रामराम केला. तात्यानं रामराम केला.

“काय राव आणल्यापस्न बैलानं वैरणीला तोंड लावलं नाय की त्यो पाणीसुध्दा प्याला नाय”

“आवं त्याची मायाचं हाय माझ्यावर तशी”

“ह्ये बघा आता बैलांच् वय झालंय. तुंम्ही सांभाळून तरी काय करणार?”

“हे तुमचं झालं. भावाला मी सांगितलवतं बैल दावणीला मरू दे. पण ईकू नका. आवं त्यो मी टाकल्याशिवाय वैरण खाणार नाय की पाणी पिणार नाय हे मला माहीती हूतं”

अशीच कांहीशी बोलाचाली झाली. शेवटी जातानां तात्यानं रूप्याला पाणी पाजलं. थोडी वैरण टाकली. तो भरल्या डोळ्यानीं वाडीत आला.

दोन दिवस कसंतरीं गेलं. तात्याला रूप्याशिवाय करमत नव्हतं. परत तिस-या दिवशी रूप्याला बघायला तात्या रामोशी वाडीवर गेला. दावण तशीच होती. तात्याला पाहताच रूप्यानं हंबरायला चालू केलं. कान टवकारलं. तात्यानं मायेनं तोंडावर अन अंगावर रूप्याच्या हात फिरवला. तात्यानं पाणी पाजलं. वैरण टाकली. रूप्या वैरण खायला लागला. तात्या तिथं थोडावेळ थांबला. मग शेजारच्या रानांतील आंब्याच्या झाडाखाली जावून बसला. असाच थोडावेळ गेला. कांहीवेळात जगू दावणीकडं आला. त्याला रूप्या वैरण खातूय म्हणल्यावर आश्चर्य‌ वाटलं. गेले तीन चार दिवस तो वैरण टाकत हूता. पण रूप्यानं तोंड लावलं नव्हतं. उलट रागानं तो त्याच्याकडं पहायचा.

त्यानं पाहिलं. तात्या आंब्याखाली तंबाखू मळत बसलावता. तो तडक झाडाखाली आला. त्यानं तात्याच्या डोळ्यांतलं पाणी पाहिलं. आज त्याच्याही काळजात कालवाकालव  झाली. त्यानं ह्यो पहिलाच मालक पाहीलावता जो आपला बैल ईकल्यावर बैलांकडं येत हूता,वैरण टाकत हूता,पाणी पाजत हूता.

सांजचा वकूत झाला तरी तात्या झाडाखालनं हालला नव्हता. ते पाहून शेवटी जगू म्हणाला,

“तात्या तूझी माया अजब हाय बाबा!असा मालक अन असा बैल मी माझ्या धंद्यात कवा बघितला नाय बघ. “

जगू ऊटला. त्यो दावणीकडं गेला. त्यानं रूप्याचं दावं सोडलं. रूप्या तात्याकडं जावून थांबला. तात्यानं परत रूप्याच्या तोंडावर अन अंगावर हात फिरवला.

जगूनं खाली पडल्यालं दांवं तात्याच्या हातात दिलं अन तो म्हणाला,

“तात्या घेवून जा त्येला”

“दादा ईकल्याला बैल मी परत कसा नेवू. बरं नेला असता त्यात आमचा कारभारी बसलाय पैका घेवून. मला काय पैसं लवकर माघारी देता येणार नायत”

त्यावर जगू म्हणाला,

“तात्या तूझा बैल घेवून जा बाबा! ऊगा शाप नको माझ्या ऊरावर. अन हे बघ, तूला जमलं तसं पैसं दे. अन नायचं जमलं तर दिवू नक. पण तूझा बैल तेवढा घेवून जा”

हे ऐकताच तात्यानं जगूच्या गळ्याला मिठी मारली. तो हमसाहमसी रडू लागला. त्यानं तात्याचं डोळं पुसलं. बैलाचं दोन्ही दावं परत त्याच्या हातात दिलं.

“जा बिनघोरी जा! कारभारी काय बोललां तर सांग,बैल तूझ्या मायेपोटी परत पाटवलाय म्हणांव”

तात्यानं जगूला हात जोडून रामराम केला. अन तो निघाला. रूप्या तात्याच्या पुढं चालत हूता. ही अजब माया जगू डोळ्यात साठवत हूता. तात्या नजरंआड होईपातूर तो त्यांच्याकडं एकटक पहात उभा हूता……बराचवेळ…..!

समाप्त

  – मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments