सौ कुंदा कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ ब्रह्मवादिनी सुलभा ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : ब्रह्मवादिनी सुलभा
वदिक काळात स्त्रियांना खूप मान होता. मुलांच्या बरोबरीने आवश्यक असे शिक्षण पण त्यांना मिळत असे. त्यांचे उपनयन सुद्धा होत असे. ब्रह्मवादिनी स्त्रिया आजन्म ब्रह्मचर्य पाळत. विद्येचा आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास करत. सुलभा कुमारी संन्यासिनी होती. ती अत्यंत चतुर विद्वान आणि बुद्धिमान होती. प्रधान नावाच्या राजाची ती कन्या. तिने आजन्म ब्रह्मचारी राहून वेद विद्येचा आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास व स्वतंत्र लेखनही केलं. ब्रम्हा यज्ञाच्या वेळी केल्या जाणाऱ्या तर्प णात गार्गी ,मैत्रेयी, वाचक्नवी यांच्याबरोबरच सुलभा चे नाव घेतले जाते. ती आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, तपअर्जिता, ओजस्वी आणि तेजस्वी स्त्री होती. तिने स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनेक स्वतंत्र आश्रम उभे केले. परकायाप्रवेश याचे ज्ञान तिने मिळवले होते. त्याआधारे ती राजा जनकाच्या शरीरात प्रवेश करून विद्वानांच्या बरोबर शास्त्रशुद्ध चर्चा करत असे. ती सतत प्रवास करून धर्माचा उपदेश आणि प्रसार करत असे. तिला तिच्या योग्यतेचा वर मिळाला नाही म्हणून तिने लग्न केले नाही.
महाभारताच्या शांतिपर्वामध्ये जनक राजा आणि सुलभा यांचा संवाद विस्तारपूर्वक वाचायला मिळतो. तिने आपल्या वाणीचे आठ गुण आणि आठ दोष यावर विशेष अभ्यास केलेला आहे.
तिला एकदा कळले की राजा जनक अहंकारी झाला आहे. तिने त्याला भेट देण्याचे ठरवले. त्याला भेटण्यासाठी तिने आपल्या योगाच्या बळावर मूळ शरीर टाकून देऊन सुंदर रूप धारण केले. आणि मिथिला नगरीत आली. भिक्षा मागण्याचा बहाणा करून राजा जनकाच्या समोर आली. राजा जनक तिच्या सौंदर्याने आश्चर्यचकित झाला त्याने तिचे स्वागत केले. पाय धुवून यथोचित पूजा करून उत्तम जेवण दिले. जनक राजाने विचारले.,”तू ब्राम्हणी संन्यासिनी आहेस का?”सुलभ उत्तरली” मी क्षत्रिय कन्या .योग्य पती न मिळाल्यामुळे मी लग्न केले नाही. व्रतस्थ राहते”. राजाने विचारले
“खरे शहाणे कोण?” सुलभा उत्तरली “ज्ञानी माणूस कधीही स्वतःची स्तुती करत नाही तो कमी बोलतो आणि मौनात राहतो.मग तो राजा असो ,ग्रहस्थ असो अथवा संन्यासी असो.” जनक राजाला आपली चूक समजली. तो म्हणाला ,,”सुलभा ,तू माझे डोळे उघडलेस. तू खरी ज्ञानी आहेस. मी तुझे बोलणे लक्षात ठेवून यापुढे वाणीवर संयम ठेवीन.”
अशाप्रकारे महाज्ञानी जनकराजाला वठणीवर आणणारी ब्रह्मवादिनी सुलभा. तिला कोटी कोटी प्रणाम.
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈