सुश्री मंजुषा सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ आदर घरातील लक्ष्मीचा… सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
काल आणि आजही जगात सगळीकडेच महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन, मेजवान्या, कौतुकाचा वर्षाव, सुभाषिते, कविता, सुंदर लेख, भाषणे, नृत्य-गायन व लघुनाटीकांचे आयोजन होत आहे. सजून सवरून महिला ही या सर्वांचा आनंद लुटत आनंदी होत आहेत. पण हा उत्सव फक्त या एक दोन दिवसांचा नसावा. तर त्यांचे महत्व सदोदित जाणून तसे त्यांचेशी वर्तन असावे व त्यांनीही आपला मुळ प्रेमळ काळजीवाहू स्वभाव टिकवून ठेवत कौतुकास्पद होऊन रहावे.
अशाच एक कर्तबगार महिला, सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे या समुपदेशक असून त्यांना महिलांशी संबंधित व नातेसंबंधातील इतरही प्रश्न हाताळत असतांना निरनिराळे अनुभव व स्वभावछटा जाणवत असतात. विविध वृत्तपत्रांत त्यांचे मार्गदर्शक लेख ही येत असतात. या आधिही त्यांचे लेख सामायिक केलेले आहेतच. आलेल्या अनुभवांवरून त्यांनी लिहिलेला एक लेख आज सामायिक करीत आहे. वाचा व विचार करा.
– मेघःशाम सोनवणे
– 🌼 –
महिला दिनाचा संकल्प करूयात,
घरातील लक्ष्मी चा आदर ठेउयात !!!!
आठ मार्च, जागतिक महिला दिन !!! विविध स्वरूपात कार्य, कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना अनेक ठिकाणच्या सोहळ्यांना बोलवलं जाईल, त्यांचा आदर, सत्कार, सन्मान केला जाईल. कुटुंबातील महिलांना देखील शुभेच्छा, भेट वस्तू देऊन तिच्यातील स्त्री शक्तीचा जागर केला जाईल. महिलांविषयक अनेक प्रेरक, सकारात्मक भाषणं केली जातील. स्त्री ला देवी चे रुप मानून ती किती पूजनीय आहे यावर लेख, बातम्या प्रसिद्ध होतील. आदर्श माता, आदर्श भगिनी, आदर्श पत्नी मानून विविध उपाध्या, विविध उपमा स्त्री ला बहाल करुन तिच्या शिवाय सृष्टी, आयुष्य कसं अपूर्ण आहे यावर प्रत्येकाच्या उत्कंठ भावना दाटून येतील यात शंकाच नाही !
महिला देखील प्रत्येक ठिकाणी आवर्जून स्वतःचे कौतुक करुन घेईल, तिला स्वतःबद्दल आत्मविश्वास, अभिमान वाटू लागेल आणि ती अधिक उत्साहाने, अधिक जोमाने पुढील कामाला लागेल यात शंकाच नाही.
पण खरंच प्रत्येक महिलेला, जिला समाजात नावाजलं जातं, तिच्या कार्य क्षेत्रात तिला विशेष मानलं जात, समाजातून गौरवलं जातं, जिच्या कार्याची, कामाची दखल कुटुंबाबाहेर घेतली जाते, जिच्या साठी कार्यक्रमांचे, सत्काराचे, पुरस्कारांचे सोहळे आयोजित केले जातात तिला तिच्या कुटुंबात तितक्याच प्रामाणिक पणे आदर, मान, सन्मान, प्रेम दिलं जातं का? हा देखील जागतिक पातळीवरील प्रश्न आहे. बहुतांश ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर “नाही !!!!” असंच येईल, आणि येते आहे.
समुपदेशनाला आलेल्या असंख्य प्रकरणातून हेच समोर येते आहे की आजही स्त्रीला कुटुंबात कोणतेही आदराचे, मानाचे, आत्मसन्मान अबाधीत राहील असे स्थान नाहीये.
आपल्याला अध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक विचारसरणी नुसार स्त्री ही घरची लक्ष्मी आहे !! घरातील माता, पत्नी, सून ही साक्षात लक्ष्मी आहे आणि तिला दुखावणं, तिचा अपमान करणं, तिचा अनादर करणं, तिच्या डोळ्यात कोणत्याही कारणास्तव पाणी येणं, हे पातक आहे !!
घरातील लक्ष्मी आनंदी हवी, हसतमुख हवी, सुखी, समाधानी हवी ! असं असलं की संपूर्ण घर कसं तेजोमय असतं हे आपण पूर्वांपार ऐकत आलो आहोत. अश्या घरात कशाची कमतरता नसते, भरभराटीचे दिवस असतात, त्या घराला देवतांचे आशीर्वाद लाभतात, हिच आपल्याला पूर्वजांची शिकवण आहे.
आजमितीला तर घरोघरी लक्ष्मी रडताना, जीव जाळताना, मन मारतांना, अपमानाचे घोट पीत, अपशब्दांचा भडीमार सहन करत तळतळताना दिसते आहे, तिचा आत्मा सातत्याने दुखावलेला दिसत आहे.
समुपदेशन मधील कित्येक प्रकरणातून हेच निदर्शनास येते की पत्नी आणि सून म्हणून वावरताना, जगताना स्त्री कमालीची त्रस्त झालेली आहे. प्रेमाचे, मायेचे, आपुलकीचे दोन शब्द तर सोडाच, पण ती घरातीलच सदस्यांकडून सातत्याने शिव्या, शाप, बदनामी, अर्वाच्य भाषा, हीन दर्जाची वागणूक, मारहाण, टोमणे, आरोप सातत्याने सहन करुन करुन प्रचंड दुखावली गेलेली आहे, मानसिक दृष्टीने उध्वस्त झालेली आहे, मनातून मोडून पडलेली आहे आणि तिच्या या दुभंगलेल्या मनस्थिती शी कोणालाही काहीही कर्तव्य नाहीये, घेणं देणं नाहीये !
तिचे विचार, तिची मतं, तिच्या अपेक्षा, तिची दुःखं, तिचा त्रास, तिची तगमग, तिचा त्याग, तिने केलेली तडजोड, तिचे गुण, तिच्या कला, तिच्या जाणिवा सर्व फाट्यावर मारणारे परके कोणीही नसून तिच्याच कुटुंबातील सदस्य आहेत.
हिच घरा घरातील लक्ष्मी आयुष्यभर विचार करत राहाते की मी कुठे चुकले, माझं काय चुकले, मी कुठे कमी पडले? माझे आईबाबा कुठे चुकले? माझ्याच नशिबात इतका त्रास का? मी काय वाईट केलं? मी कोणाशी वाईट वागले? मी च का सगळं भोगते आहे? कधी जाणीव होईल माझ्या चांगुलपणाची माझ्या सासरच्यांना??? कधी महत्व कळेल यांना माझं?
अश्या असंख्य प्रश्नांनी ही लक्ष्मी सतत स्वतःलाच कोसत राहाते, उत्तर शोधत राहाते, स्वतःलाच अपराधी मानत राहाते आणि स्वतःच्याच मनाची समजूत घालून परत परत उभी राहाते.
समुपदेशनला आलेल्या अनेक महिला, ज्या कोणाच्या पत्नी आहेत, सुना आहेत, माता आहेत, त्या ढसाढसा रडतात, आत्महत्या करण्याचे विचार करतात, दीर्घकालीन नैराश्यात असतात, स्वतःच्या जीवनाला कंटाळून गेलेल्या असतात, स्वतःला ताण तणाव, दररोज चे वाद विवाद, वैचारिक कलह, मतभेद, हेवेदावे यामुळे अनेक आजारांनी अतिशय कमी वयात ग्रस्त झालेल्या असतात. अशी असावी का घरातील लक्ष्मी??? अशी दुभंगलेली, तुटलेली, मोडलेली लक्ष्मी आपल्याला अपेक्षित आहे काय?? हे सर्व प्रकारचे अन्याय, अत्याचार निमूटपणे सहन करणारी स्त्री म्हणजे गृह लक्ष्मी का?? ही आपली पौराणिक, अध्यात्मिक शिकवण नक्कीच नाही…… आणि कधीही नव्हती !!
सातत्याने स्वतःचे दुःख लपवून, अपमानाचे घोट गिळत जगासमोर नटून थटून, भरजरी साडया नेसून, नट्टा पट्टा करुन, दाग दागिने घालून सुहास्य वदनाने मिरवते ती मनातून देखील तेवढीच प्रफुल्लित, प्रसन्न, शांत, समाधानी, सुखी आहे काय?? यावर विचार होणे आवश्यक आहे.
या महिला दिनाला प्रत्येकाने या बाबींचा खोलवर विचार करावा असे वाटते. प्रत्येक कुटुंबातील स्त्री भुकेली आहे फक्त प्रेमाची, तिला अपेक्षा आहे फक्त आदराची, तिला हवा आहे फक्त सन्मान, ती वाट बघते आहे फक्त कोणीतरी समजावून घ्यावं ऐकून घ्यावं म्हणून!!!
या महिला दिनाला एकच करूयात. इथून पुढे घरातील लक्ष्मी चा आदर ठेउयात… जी आपल्या घरात लग्न लावून आली, तिला शेवटच्या श्वासापर्यंत न्याय देऊयात !!! तिला समजूयात, तिला सामावून घेऊयात, तिला स्वीकारुयात आणि तिला नाही तर तिच्या अंतःकरणाला हसताना, तिच्या मनाला मोहरताना पाहुयात. ज्याला हे जमलं त्यानं जग जिंकलं… ज्यानं हे केल त्यानं सर्व काही कमावलं!
©️ सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे
काउन्सीलर. 9766863443
(हा लघुलेख आवडल्यास शेअर करतांना लेखात कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती. -मेघःशाम सोनवणे. दररोज अशा सकारात्मक कथा व लेखांसाठी 9325927222 या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधा.)
स्वतः लेखिका सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे यांच्या सौजन्याने.
संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२