सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ कोनाडा… भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
ती जशी प्रेमळ ,तशी त्रासदायकही होती.तिचं कुणी ऐकलं नाही की ती त्या गोष्टीचा इतका पिच्छा पुरवायची की शेवटी कंटाळून तिचं ऐकावच लागायचं.
एकदा आठवतंय् दिवस पावसाळ्याचे होते.
पण म्हणावा तसा पाऊस अजुन कोसळत नव्हता.त्या दिवशी तर चक्क उन पडलं होतं.
आभाळ अगदी मोकळं,निरभ्र होतं..तरीही घरातून निघताना जीजी म्हणाली,
“छत्री घे….”
काय तरी काय? इतक्या कडक उन्हात मी छत्री घेतली तर माझ्या मैत्रीणी मला हंसतील..आणि मी छत्री कुठेतरी विसरेनही..
पण गंमत झाली. संध्याकाळी वातावरण एकदम बदललं.. आकाश काळंकुट्ट झालं.
ढगांचा गडगडाट .विजांचा लखलखाट. वादळी वारा आणि मुसळधार पाऊस. ओली झालेली मी कशीबशी बसमधून टेंभी नाक्यावर उतरले. तर बस स्टाॅपवर जीजी डोक्यावर एक आणि हातात एक छत्री घेऊन उभी..!!
ते चित्र कायम माझ्या डोळ्यासमोर आहे.
त्या दिवसाची तिची ती काळजीभरली प्रेममय नजर मनात कोरली गेली आहे.
“अग!!तू कशाला आलीस इतक्या पावसात?”
“कार्टे तुला सकाळी छत्री घेउन जायला सांगितलं तर ऐकलं नाहीस. हट्टी द्वाड..
किती भिजली आहेस…न्युमोनिया झाला तर? परीक्षा जवळ आली आहे…””
रस्ताभर ती बोलत होती.
घरात शिरल्याबरोबर, स्वत:च्या पदरानेच तिनं माझं डोकं खसाखसा पुसलं.. गरम पाण्यात चमचाभर ब्रांडीही पाजली..
कितीतरी वेळ नुसती अस्वस्थ होती…
लहानपणी मला वरचेवर सर्दी, खोकला ताप यायचा.. डांग्या खोकल्याने मी दोन महिने आजारी होते. कितीतरी औषधे.. इंजेक्शने झाली.पण खोकला काही थांबायचा नाही. एक दिवस कंटाळून मी जीजीला म्हटलं,
“जीजी आता तूच मला बरं कर..तू दिलेलं
कितीही कडु औषध मी पीईन! पण हा खोकला थांबव.. नाहीतर मी मरुन जाईन..”
तिच्या अंत:करणातला मायेचा झरा, तिच्या डोळ्यातून ठिबकला. एरवी मला सतत ‘कार्टी भामटी’म्हणणारी.. तिनं मला पदरात वेढून घेतलं…
“असं बोलू नकोरे बाबा… संध्याकाळच्या वेळी कसलं हे अभद्र बोलणं..मी कशी मरु देईन तुला?”
अन् तिने माझे मटामट मुके घेतले…
मग ती सकाळीच घराबाहेर पडली.. कुठे गेली कोण जाणे! पण परत आली तेव्हां तिच्या हातात हिरवीगार अढुळशाची पानं होती..
तिनं ती स्वच्छ धुवून पाट्यावर वाटली. आणि त्याचा रस काढला.
आणि तो कडु रस, अच्च्युताय नम:, गोविंदाय नम: असं म्हणत माझ्या घशात उतरवला… लागोपाठ सात दिवस या धन्वंतरीची ट्रीटमेंट याच पद्धतीने घेतली..
आणि खरोखरच माझा तो जीवघेणा खोकला बरा झाला…
तिची श्रद्धा,तिची मेहनत आणि तिच्या ममतेपुढे तो रोग नमला. तिला इतकी आयुर्वेद उपचारपद्धती कशी माहित होती, ते गुपीतच होतं.. पण तिने केलेले लेप, गुट्या चाटणे, काढे यांच्यामुळे आमच्या व्याधी झटकन् बर्या व्हायच्या..
जीजी सार्यांसाठी झटायची. तिला आमच्यापैकी कुणाचंही काही करताना कधीही कंटाळा आला नाही.तिच्या मनात आमच्याबद्दल अत्यंत माया होती… ओलावा होता..
जीजीची तिसरी नात छुंदा..आमच्या सर्वांपेक्षा ती हुशार. अत्यंत अभ्यासु. जीजीला तिचा फार अभिमान.
“हा माझा अर्जुन हो!..” असं सगळ्यांना सांगायची.
पण जीजीची ही नात फार रडकी आणि खेंगट.. शाळेत जाताना रडायची.म्युनिसीपालिटीची बारा नंबरची शाळा तिला आवडायची नाही. पण घराजवळची शाळा म्हणून आमचे सर्वांचेच प्राथमिक शिक्षण तिथेच झालं. आम्ही कुणीच शाळेत जाताना त्रास दिला नाही. पण छुंदाने खूप त्रास दिला. जीजी रोज तिच्याबरोबर शाळेत जायची. शाळा सुटेपर्यंत पायरीवर बसून रहायची. ना भूक ना तहान… छुंदा वर्गातून बाहेर येउन खात्री करुन घ्यायची, जीजी पायरीवर असल्याची… छुंदा पाचवीत जाईपर्यंत ही जोडगोळी शाळेत जायची. छुंदा वर्गात अन् जीजी पायरीवर.
पुढेपुढे छुंदाच्या वर्गबाईंनाही जीजीची सवय झाली.ही एवढी म्हातारी बाई नातीसाठी ५—६ तास पायरीवर बसून राहते याचं त्यांनाही प्रचंड कुतुहल वाटायचं.. कधी कधी तर बाईंना काही काम असलं तर त्या जीजीलाच वर्ग सांभाळायला सांगायच्या..
वर्गातल्या सार्यांचीच ती आजी झाली होती…
पुढे छुंदा ऊच्च श्रेणीत केमीकल इंजीनीअर झाली. आजही ती म्हणते… “जीजी नसती तर मी शिकले असते का…??”
इंजीनीअरींगचं सर्टीफिकेट जीजीच्या हातात देत ती म्हणाली होती..
“खरं म्हणजे हे सर्टीफिकेट तुलाच दिलं पाहिजे….”
त्याक्षणी तिच्या चेहर्यावरचा आनंद, डोळ्यातलं पाणी अवर्णनीय होतं…
क्रमश:…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈