सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ कोनाडा… भाग 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही महिनाभर ग्रँटरोडला आजोबांकडे रहायला जायचो. जीजी आणि पपा फक्त घरी. पपा तर दिवसभर बाहेरच असायचे. म्हणजे जीजी एकटी घरात. कधीकधी पपाही आमच्याबरोबर असायचे. म्हणजे जीजी अगदी एकटीच. रात्री आमच्या नात्यातला एक काका तिच्या सोबत असायचा.

पण ती आम्ही परत घरी यायची वाट बघायची. ती आमच्यासाठी माळ्यावर आंब्याच्या अढ्या घालून ठेवायची.  त्यावेळी ठाण्याजवळ जंगलात रहाणार्‍या कातकरी आदीवासी बायका आमच्या घरी आंबे घेऊन यायच्या. प्रत्येक आंबेवालीशी हुज्जत घालून’ निवडून ती आंबे विकत घ्यायची. त्यांनाही सांगायची,

“आता माझ्या नाती येतील. त्यांना आंबे लागतील. त्या येईपर्यंत पिकलेल्या आंब्यांची अढी तयार होईल. . . “

तिचं सारं विश्वच आमच्यात सामावलेलं होतं. . .

आम्ही परत आलो की, माळ्यावर ढीगभर पसरलेले आंबे पाहून आनंदून  जायचो. .

तसे आजोबांकडेही आम्ही आंबे खात असू. पण आजोबांकडे सगळं शिस्तीत , नियमात, वेळेत. . . जीजीच्या सहवासात आंबे खाण्याचा आनंद मुक्त असायचा. . भरपूर , केव्हांही. . कधीही. . .

आणि आमच्या डोळयात माखलेला आनंद पाहणे हा तिचा आनंद होता. . .

आता वाटतं, आम्ही तिला एकटीला टाकून जायचो. . . कशी राहत असेल ती एकटी. .

आमच्याशिवाय किती सुनी सुनी झाली असेल ती. . . .

कधी सांगायची, “अग!त्या दिवशी वेणु आली होती. . . या एवढ्या मोठ्या करपाल्या कोलंब्या घेऊन. . पाठीसच पडली. “घेच गं म्हातारे!तुला द्यायच्या म्हणून कुणालाच दिल्या नाहीत. . . “

“पण कुणासाठी घेऊ बाई?माझी नात नाही खायला. ती आली की आण पुन्हा नक्की. . आता दे त्या चित्रेबाईला. . . “

पण बिंबाला किती आवडतात या तळलेल्या कोलंब्या. . म्हणून तिचा जीव हळहळायचा. .

रविवार असला की,  पाट्यावर नारळ वाटून ती त्याचं दूध काढायची. आणि नहाण्यापूर्वी ती केसांना छान लावून द्यायची. त्यावेळी मिक्सर नव्हते. केसांना शांपू लावणे अथवा बाजारात मिळणारे केसांचे साबण लावणे तिला अजिबात मान्य नसायचे. . .

सगळ्या नातींचे केस दाट आणि काळेभोर.

आता या सगळ्याची पावती जीजीलाच देते. पण त्यावेळी तिचा रागच यायचा. तिची ही साग्रसंगीत औषधं लावण्याचा आम्हाला कंटाळा यायचा. म्हणून आम्ही तिच्याशी वाद घालायचो. . भांडायचेही. . पण ती ऐकून घ्यायची आणि तिला जे करायचे तेच करायची. .

कधी चिडून दांतओठ खायचीही, .

म्हणायची,  “कार्टीला अक्कल नाही. . चांगलं कळत नाही. . दळभद्री कुठली. , . . “

तिची गंमत वाटायची.  एव्हढं आयुष्य तिनं उन्हात काढलं.  सोळाव्या वर्षी विधवा झाली . पदरात चार महिन्याचं मुल. त्यावेळचा सामाजिक काळही चांगला नव्हता. विधवा बाईला खूप पीडा. तिला तिच्या सासरच्या माणसांनीही खूप त्रास दिला. कधी ती सांगायची. . .

“मला जीवनाचा कंटाळा आला होता. मी जनाला घरीच पाळण्यात ठेवले आणि तळं गांठलं. आता जीवच द्यायचा . . . तळ्या जवळच्या शंकराच्या देवळात घंटा वाजत होत्या. पाण्यात खूप कमळं फुलली होती. का कोण जाणे!मला एकदम वाटलं, पाळण्याच्या दांड्यात माझ्या बाळाचा पाय अडकलाय. माझं बाळ रडतंय् . . त्याच्याजवळ कुणीच नाही. आणि मी झपाट्याने घरी धावत आले बाळ पाळण्यात शांत झोपला होता.

गुटगुटीत. गोरागोमटा. भव्य कपाळ. काळंभोर जावळ.  मी त्याला छातीशी कवटाळलं. आणि ठरवलं . . याला मी वाढवेन मोठा करेन. चणे दाणे खाईन. . खूप कष्ट करेन…”

कष्टच केले तिने आयुष्यभर. . . . तेव्हांही. . नंतरही. . या ना त्या कारणाने. . अथक. कंटाळा न करता.

पप्पा एव्हढाले कोहळे आणायचे ते किसायचे त्याचा रस काढायचा. पातेल्यात साखरेच्या पाकात शिजवून वड्या करायच्या. टोपलीभर कमळाचे देठ आणायचे. ते गोल  पायचे.

तिखट मीठ, जीरपूड लावून वाळवायचे. आणि तळून खायचे. त्याला कमळाची भिशी म्हणत. ही भिशी करणं अपार कटकटीचं होतं. गवारीच्या शेंगा ताकात भिजवून नंतर वाळवायच्या.

बरण्या भरुन लोणची मुरंबे करायचे. दिवाळीच्या दिवसात, सुगंधी उटणे ती घरी बनवायची. . . अनारशाचे ओले तांदुळ जात्यावर दळायची. आम्हाला म्हणायची, “येग! जात्याला हात लाव…माझे हात दुखतात..तुझ्या आईलाही भरपूर कामं असतात…”पण आम्ही तिला कधीतरीच मदत करायचो…खरं म्हणजे हे ती सर्व आमच्यासाठीच करत होती…

आता तिच्या हातचे जाळीदार कुरकुरीत सोनेरी अनारसे आठवले की वाटतं…ती गोडी अवीट होती…आणि आता कायमची दुरावली….

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments