सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ साॅरी… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

‘सॉरी’ हा इंग्रजी शब्द खूपच कॉमन आहे. सरसकट तो सगळीकडं वापरलेला दिसतो. गंमत म्हणजे तान्हुल्या बाळालाही आई साॅरी म्हणताना आढळते. विनोदाचा भाग सोडला तरी हा खरोखरच एक जादुई शब्द आहे हे मात्र नक्की. सॉरी जितक्या सहजपणानं तोंडी येतं तितकं सहज; ‘ माफ करा हं!’,म्हंटलं जात नाही. तसं पाहिलं तर हे दोन्ही शब्द कानावर पडताच रागाचा पारा खाली जातोच.

आपल्या नकळत जेव्हा काही चूक घडते तेव्हा सॉरी म्हणताच वातावरण निवळते. उदा. एखाद्याला चुकून धक्का लागला तर सॉरी म्हणताच त्याच्या चेहऱ्यावर इट्स ओके ची स्मितरेषा उमटतेच. पण खरच चूक होते तेव्हा? ज्या व्यक्तीची चूक असते तीनं सॉरी म्हणणं अपेक्षित असतं. परंतु मीच का सॉरी म्हणू अशी आढ्यता बाळगणारे अधिक असतात.

हा शब्द नाती जपतो. मान, अपमान, अहंकार यापेक्षा नाती ज्याला महत्त्वाची वाटतात तो सहजपणानं माफी मागून रिकामा होतो. तर ज्याला अहंकार , मी पणा महत्त्वाचा वाटतो, तो दुसऱ्याला नाक  कसं खाली घालायला लावलं यातच समाधानी राहतो. अशी अहंकाराची वाळवी लागलेली नाती टिकणं दुरापास्त असतं. गंमत म्हणजे असे लोक जिथं गरज नाही तिथं साॅरी म्हणताना दिसतात.

सॉरी योग्य वेळी म्हणणं ही तितकंच गरजेचं असतं बरं. समजा एखाद्या ची काही वस्तू हरवली किंवा आपल्याकडून कोणाचं काही नुकसान झालं तर लगेचच सॉरी म्हणावं. नुकसानभरपाईचा प्रयत्न ही जरुर करावा. परंतु बघू, म्हणू केंव्हातरी किंवा त्यात काय एवढं असा विचार केला , माफी मागायला वेळ झाला तर नात्यातील तणाव वाढत गेलेला दिसतो. बऱ्याचदा अशा नात्यातून बदसूरच उमटतो.

सॉरी वेळेवर म्हणणं जसं महत्त्वाचं तसंच माफी मागण्याची पद्धत ही महत्त्वाची! रागारागानं, आदळ आपट करत सॉरी म्हणताना माफी मागणाऱ्याची नाराजी व्यक्त होते. आक्रस्ताळेपणानं चिडचिड करत माफी मागणं अयोग्यच. तर गोड लडिवाळ आवाजात सॉरी म्हणणारी व्यक्ती मनापासून माफी मागतेय हे जाणवतं. हात जोडून किंवा कान हातात पकडून माफी मागितली की समोरच्याचा पारा एकदम उतरतो.

एखादी जादूची कांडी फिरवावी तसा हा शब्द काम करतो. समोरच्या माणसाला हसवतो. त्याच्या चेहऱ्यावरील शंका दूर करतो. पुन्हा नव्यानं संवाद साधायला मदत करतो. रागाला पळवून लावतो. जाने दो म्हणत पुन:श्च हातात हात गुंफले जातात. खांद्याला खांदा लावून कामं केली जातात. माणसा माणसांमधील सहकार्य वाढतं. खेळीमेळीचं वातावरण निर्माण होते. हा शब्द मैत्री टिकवायला, मैत्री निभावून न्यायला, मैत्री निर्माण करायला देखील धावून येतो.

हा शब्द आपल्या शब्द कोशातला नाही आहे. तसा तो परकीय आहे. तरीही तो आपला मित्र आहे. कितीतरी गोष्टींसाठी सीमा, प्रांत, देशाच्या सीमा आपण ओलांडल्या आहेत. रितीरिवाज, परंपरा, वेषभूषा, खाद्यसंस्कृती अशा खूपशा बाबतीत आपण बदल करतो.गरजेपेक्षा सोयीचा विचार करुन वेषांतर  किती सहज केले ना आपण? धोतरा ऐवजी शर्ट पॅंट आले, साडी ऐवजी देखील ट्राऊझर्स- टॉप्स आले. हे बदल जितके आवश्यक तितकेच चांगलेही आहेत. मग शिष्टाचाराचे नियम तितक्याच प्रमाणात वापरायला काहीच हरकत नसावी.

ग्लोबल च्या नावाखाली लोकल विसरतो. अगदी रोज बोलताना देखील कितीतरी इतर भाषेतील शब्द वापरतो.पण सॉरी म्हणण्यात बहुतेक वेळा कमीपणा समजतो. या लहानशा शब्दाला ओठांवर आणायचे टाळतो.

तसंही नकळतपणे का होईना, दुसऱ्याचं मन दुखावलं गेलं की आपणही थोडे उदास होतो. खरं ना? मग काय हरकत आहे या जादूवाल्या शब्दाशी दोस्ती करायला?

माणूस हा सोशल प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही.  समाजात, नातेवाईंकांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर तो करतो ते व्यवहार भावनांनी युक्त असतात. कोरडेपणानं होत नाहीत. एकूण काय , नात्यातील, व्यवहारातील, सकारात्मकता वाढवण्यासाठी, नाती अधिक सुदृढ करण्यासाठी थॅंक्यू इतकंच सॉरी म्हणणं महत्त्वाचं.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments