जीवनरंग
☆ अतिलघुकथा – चांगुलपणा ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆
लघुतम कथा – -1.
वडील गेल्यावर भावांनी संपत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खुप भाग्यवान, माझ्या वाट्याला तर आयुष्य आलंय.
लघुतम कथा – -2.
काल माझा लेक मला म्हणाला, “बाबा,मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही. कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस.” एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले मला .
लघुतम कथा – -3.
खूप दिवसांनी माहेरपणाला आलेली नणंद टी व्ही सिरीयल पहाता पहाता वहिनीला म्हणाली, “वहिनी किती मायेने करता तुम्ही माझे!” तर वहिनी म्हणाल्या, “अहो, तुम्ही पण माहेरी समाधानाचे वैभव उपभोगायलाच येता की. सिरीयल मधल्या नणंदेसारखी आईचे कान भरून भांडणे कुठे लावता? मग मी तरी काय वेगळे करते?”
रिमोट ने टीव्ही केव्हाच बंद केला होता.
लघुतम कथा – -4.
तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये, तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच ₹5000 चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला. म्हणाला,
“लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता, माझा दोस्त बरा झाला की छानसी साडी घ्या.”
त्या पाकिटा पुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.
लघुतम कथा – -5.
आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला, ऑफिस सुटल्यावर. पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावतपळत घर गाठले तिने. स्वैपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या, ” हातपाय धू पटकन, भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.”
संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
puran katha ahet ka ya laghu kathechya. Please email me.