श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ हार्मोनिअमचे सूर – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
ठाणे स्टेशनात शिरलो की आठवते ते ३० वर्षापुर्वीचे ठाणे स्टेशन. पूर्वीच्या स्टेशनच्या वाटा आणि आत्ताच्या वाटांमध्ये खूप बदल झाला आहे. आता सर्वत्र माणसेच माणसे. घुसमटलेले श्वास, घामेजलेले स्पर्श, धक्काबुक्की आणि सतत घाईत असलेली झपाझप पावले. जगण्याच्या धावपळीत जगणंच विसरलेले सगळे आणि आपणही त्याचा एक भाग कधी होतो ते कळत नाही. भाग नाही तर त्या गर्दीतला एक ठिपका. घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे काटेकोर बंदिस्त आयुष्य. रोज तेच तेच बघत असलो तरी ती गर्दी मात्र नवीन असते. गर्दीचे चेहरे बदललेले असले तरी त्या नवीन गर्दीतला हताशपणा, हतबलता तीच असते. सकाळी कामावर जाताना असणारी घाई स्वतःशीच संवाद करायला लावून डोळ्यांवर झापडे लावून स्टेशनमधून जायला लावत असली तरी संध्याकाळी कामावरून येताना निवांतपणा जरा आजूबाजूला कान उघडे ठेऊन डोळ्यावरची पट्टी बाजूला करून बघायला लावणारा असतो.
स्टेशनच्या ब्रिजवर असलेला तो एक कुबडी घेऊन एका पायावर उभा असलेला सफेद दाढीवाला वर्षोनुवर्षे एका पायावर योगा करत उभा राहून आपल्या लंगडेपणाचे प्रदर्शन लावून असतो. त्याच्या पुढे थोड्या अंतरावर एका तान्हुलीला घेऊन बसलेली ती काळी बाई तिच्या मातृत्वाचा आधार घेऊन हात पसरत बसलेली. असते. दर दोन पावलांवर धुळीने मळलेले कपडे आणि चेहरे घेऊन हात पसरविणारे चिमुरडी मुले बघून मनावर दगड ठेऊन पुढे जावे लागत असले तरी मनात कुठे ना कुठे तरी त्यांच्याबद्दलचे विचार घोळत रहातात. परिस्थिती कोणाला कधी काय करायला भाग पाडेल ह्याची कोणालाच कधी कल्पना देत नसते.
स्टेशनचा ब्रिज उतरायला लागल्यावर कानावर ते हार्मोनिअमचे सूर यायला सुरवात होते. माझा थोडा फार गळा आहे आणि लहानपणी गाण्याच्या दोन परीक्षा दिल्याने मी स्वतःला गायक जरी समजत नसलो तरी थोडे फार गाणे आणि खूप काही चांगले गाणे कानावर पडल्याने त्या हार्मोनिअमचे सूर माझे नेहमीच लक्ष वेधून घेत. रोजच पावलं क्षणभर का होईना तेथे रेंगाळत असत. पुढे उजव्या बाजूच्या कोपऱ्यात अंधत्व आणि वृद्धत्व एकमेकांच्या गळ्यात गळे घालून एक जीव झालेले असतात आणि त्याची बोटे गळ्यात अडकवलेल्या त्या जुनाट अशा हार्मोनिअमवर जादू सारखी फिरत असतात. जे सूर त्या जादूच्या पेटीतून बाहेर पडत असतात त्याने जाणाऱ्या येणाऱ्यावर आपली छाप टाकलेली असते त्यामुळेच त्याला काहींची नुसती दाद मिळते तर काहींची त्या दादे बरोबर खिश्यातल्या खळखळणाऱ्या नाण्यांची साथही असते. समोर ठेवलेल्या लहान भांड्यात जेंव्हा कोणी खिशातले नाणे टाकून जाते आणि त्याचा आवाज होतो तेव्हा त्या पेटीतून निघणाऱ्या सुरांना त्याचा अडथळा होत असला तरी त्या डोक्यावर कायम सफेद कॅप, डोळ्यावर गॉगल, चांगल्या घरातला वाटावा असा स्वच्छ आणि प्रसन्न चेहऱ्यावर मात्र एक स्मित हास्याची छटा उमटलेली असते आणि त्या पेटीचा भाता ही जोरात पुढंमागं होऊन आवाज वाढतो. ती बोटे पेटी वाजवतानाच समोरच्याचे आभार मानत असत.
क्रमशः…
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈