सुश्री मंजुषा सुनीत मुळे
वाचताना वेचलेले
☆ काहीच नाही आपले इथे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
काहीच नाही आपले इथे
हेच खरे दुखणे आहे
श्वास सुद्धा घेतलेले
काळाकडून उसने आहे
ज्याला त्याला वाटत असते
माझे असावे अंबर सारे
मर्जीनुसार झुकून फिरावे
गुलाम माझे होऊन वारे
पान आपण झाडावरचे
कधीतरी गळणे आहे
श्वाससुद्धा घेतलेले
काळाकडून उसने आहे
आतमध्ये प्रत्येकाच्या
लपून असतो एक चोर
टपून असतो एक कावळा
संधी शोधत बनून मोर
नियतीकडून घर आपले
कधीतरी लुटणे आहे
श्वास सुद्धा घेतलेले
काळाकडून उसने आहे.
हवे ते मिळत नाही
मिळते ते रूचत नाही
दुःखच काय सुखसुद्धा
कुणालाही पचत नाही.
सुर्य जरी झालो तरी
एक दिवस ढळणे आहे
श्वास सुद्धा घेतलेले
काळाकडून उसने आहे
गंमत भारी आयुष्याची
कळून सुद्धा वळत नाही
जिंकणाऱ्या सिकंदरासही
हरणे काही टळत नाही
तारा होऊन चमकलो तरी
अखेर खाली निखळणे आहे
श्वास सुद्धा घेतलेले
काळाकडून उसने आहे.
किती खेळलो खेळ तरी
आपल्या हाती डाव नाही
स्मशानाच्या दारावरती
राजालाही भाव नाही
देहाचे या राज्य अखेर
सरणावरती जळणे आहे
श्वास सुद्धा घेतलेले
काळाकडून उसने आहे.
संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२