सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २५ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
केशव रंगनाथ शिरवाडकर
केशव रंगनाथ शिरवाडकर(1926 – 25 मार्च 2018) हे साहित्य समीक्षक व वैचारिक लेखक होते.
ते वि. वा. शिरवाडकरांचे धाकटे बंधू.
केशव रं. शिरवाडकर हे तत्त्वज्ञान विषयातले भारतीय शिक्षण क्षेत्रातील प्रख्यात नाव होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात व नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी भाषा विषयात अध्यापन केले. त्यांनी ग्रामीण भागातही शिक्षणप्रसार केला. नांदेड येथे पीपल्स कॉलेज उभारण्यात त्यांचे मोठे योगदान होते. तेथे ते इंग्रजीचे अध्यापन करीत. पुढे ते तिथे प्राचार्य झाले.
पुस्तके :
- आपले विचारविश्व (तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ)
- तो प्रवास सुंदर होता :कुसुमाग्रज, वि. वा. शिरवाडकर -जीवन आणि साहित्य (चरित्रग्रंथ)
- मर्ढेकरांची कविता :सांस्कृतिक समीक्षा.
- सार गीतारहस्याचे
- विल्यम शेक्सपिअर – जीवन आणि साहित्य.
- संस्कृती, समाज आणि साहित्य
- रंगविश्वातील रसयात्रा
- साहित्यातील विचारधारा
मराठी साहित्य परिषदेने भरवलेल्या पहिल्या साहित्य समीक्षकांच्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (29-30 नोव्हेंबर 2012)
महाराष्ट्र सरकारकडून तत्त्वज्ञान व मानसशास्त्रावरील पुस्तकासाठीचा ना. गो. नांदापूरकर पुरस्कार त्यांच्या ‘संस्कृती, समाज आणि साहित्य’ या पुस्तकाला मिळाला.
☆☆☆☆☆
यशवंत नारायण ऊर्फ अप्पा टिपणीस
यशवंत नारायण ऊर्फ अप्पा टिपणीस (3डिसेंबर 1876 – 25 मार्च 1943) हे मराठी नाट्यनिर्माते, नाट्यलेखक, अभिनेते वेषभूषाकार होते.
त्यांनी रंगमंचावरील पात्रांच्या रंगभूषा, केशभूषा, वेशभूषा जास्तीत जास्त वास्तव बनवण्याचा प्रयत्न केला.
1904मध्ये टिपणीसांनी महाराष्ट्र नाटक कंपनीची स्थापना केली.’कांचनगडची मोहना ‘, (यात ते नायक होते), ‘कमला’, ‘सं. प्रेमसंन्यास ‘ ही नाटके त्यांनी सादर केली.
नंतर त्यांनी ‘भारत नाट्य मंडळी’काढून ‘मत्स्यगंधा’ नाटक केले. त्याचे लेखन, दिग्दर्शन त्यांनीच केले होते व त्यात भीष्माची भूमिकाही केली होती.नंतर त्यांनी ‘आर्यावर्त नाटक कंपनी’सुरू केली. त्यांनी ‘चंद्रग्रहण’ हे शिवाजीच्या जीवनावरचे नाटक लिहून सादर केले.या नाटकाद्वारे प्रथमच ऐतिहासिक स्वरूपातला शिवाजीचा जिरेटोप रंगमंचावर आणण्याचे श्रेय टिपणीसांना जाते.
ललितकला नाटक कंपनीतील ‘शहा शिवाजी ‘या नाटकातील काही पदे टिपणीसांनी रचली होती. या नाटकासाठी त्यांनी पुण्यातील बाबासाहेब घोरपडे यांच्याकडील ऐतिहासिक पुस्तकांचा संग्रह वाचून काढला आणि स्वतःच्या देखरेखीखाली अंगरखे, पगड्या शिवून घेतल्या. पुढे कित्येक वर्षे त्या नाटकांत व चित्रपटांत वापरल्या जात असत.
टिपणीसांनी एकूण 15 नाटके लिहिली.20 नाटकांत त्यांनी अभिनय केला.
पुणे येथे 1921 साली भरलेल्या सतराव्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
☆☆☆☆☆
मधुकर बाबूराव केचे
मधुकर बाबूराव केचे (18 जानेवारी 1932 – 25मार्च 1993) हे कवी, ललित निबंधकार होते.
एम. ए. करून ते मराठीचे प्राध्यापक झाले.
त्यांच्या कवितेत आधुनिक मानवाची निराशा, ईश्वराविषयी शंकाकुलता, ऐहिक प्रेरणांशी चाललेला संघर्ष या गोष्टी अधोरेखित होतात.
पुस्तके : ‘पालखीच्या संगे ‘, ‘आखर आंगण ‘, ‘एक भटकंती’, ‘एक घोडचूक’, ‘वंदे वंदनम’ हे ललित निबंध संग्रह.
‘पुनवेचा थेंब’, ‘आसवांचा ठेवा’, ‘दिंडी गेली पुढे’ हे कवितासंग्रह.
‘चेहरेमोहरे’, ‘वेगळे कुटुंब’ हे व्यक्तिचित्रसंग्रह.
‘झोपलेले गाव’, ‘माझी काही गावं’ ही प्रवासवर्णने.
‘मोती ज्याच्या पोटी’ ही कादंबरी.
मधुकर केचेंच्या तीन कवितासंग्रहांना महाराष्ट्र सरकारची लागोपाठ बक्षिसे मिळाली.
☆☆☆☆☆
केशव रंगनाथ शिरवाडकर, यशवंत नारायण टिपणीस व मधुकर बाबूराव केचे यांना त्यांच्या स्मृतिदिनी सादर प्रणाम.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, मधुकर केचे : वि. ग. जोशी, महाराष्ट्र नायक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈