सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-5 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(कथासूत्र : तो माणूस जबरदस्तीने बिरोजाचा हात पकडून त्यात पैसे कोंबतो…….)
बिरोजाच्या मुठीत साडेचार हजाराच्या करकरीत नोटा आहेत. प्रत्येक नोटेवर अशोकाच्या स्तंभाखाली, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हसऱ्या चेहऱ्याशेजारी छापलंय -‘सत्यमेव जयते.’
‘बोलव तिला पटकन. गाडी सुटतेय.’ तो माणूस बिरोजाला ढकलतो.
पण माधोला तो माणूस अजिबात आवडलेला नाही. तो सगळं काही बघतोय. त्याच्या नजरेत संशय आहे. तो बहिणीला म्हणतो, ‘तायडे, हा माणूस बाला रोज काय सांगत असतो?’ त्याच्या आवाजात चीड आहे.
मुरलीच्या भुवयाही वर चढल्या आहेत. ‘माय त्या दिवशी या माणसाला शिव्या घालत होती. ऐकलंस ना तू?’त्याचीही मती कुंठित झाली आहे. काय चाललं आहे, हे त्याला समजतच नाही.
कोसी सतलज एक्सप्रेसची शिट्टी वाजते. अचानक तो माणूस धावत त्यांच्याकडे येतो. जनकदुलारीचं मनगट घट्ट धरतो आणि तो तिला फरफटत फलाटावरून नेतो.
जनकदुलारी आक्रोश करू लागते,’बा, बा!बघा. हा मला फरफटत नेतोय.कुठे नेतोय तो मला? आणि का? तुम्ही काहीच काय करत नाही बा?’
‘बेबी, माझ्याबरोबर चल. तू तिथे राणीसारखं राज्य करशील. सगळं तुझ्या ताब्यात असेल. रोज तुला चारीठाव जेवण मिळेल. अगदी पोटभर. आणि मी तुझ्या बापाला आधीच पैसे दिले आहेत.’
देव जाणे कुठून, त्याचे दोन साथीदार उगवतात आणि तिच्याभोवती कोंडाळं करतात. कोणालाही ती दिसत नाही. तसंही काय चाललंय, याची कोणालाच पर्वा नसते.
जनकदुलारी आक्रोश करते आहे.
ती सुटकेचा प्रयत्न करते आहे. ती वडिलांना बिलगायला जाते; पण ते व्यर्थ जातं. तिला धावत वडिलांकडे जायचं आहे; पण ती जाऊ शकत नाही.
फलाटावर दोन पोलीस उभे होते. अगदी थोड्या वेळापूर्वीपर्यंत ते लाठ्या उगारत होते आणि सगळ्यांच्या अंगावर वसावसा ओरडत होते,’चला. चालायला लागा. गोंगाट करू नका.’ पण आता तेही हवेत विरून गेले आहेत, असं वाटतं.
जनकदुलारीचं कर्कश रडणं-ओरडणं फलाटावरच्या भयानक कोलाहलात बुडून गेलं आहे.
गाडी सुरू होते. तो माणूस तिला फरफटवतोच आहे. उडी मारून तो गाडीत चढतो. तिलाही वर ओढतो.
तिचे दोन्ही भाऊ आपल्या छोट्याश्या हातांनी निकराने वडिलांना हलवत आहेत,’बा, तो बदमाश तिला घेऊन जातोय.’
गाडी सुरू झाली आहे….. हळूहळू वेग घेते आहे……
बिरोजा त्या डब्याकडे धावतो…. आत शिरायला बघतो, पण…..
तो माणूस दारातच उभा आहे. तो बिरोजाच्या तोंडावर ठोसा मारतो,’उतर खाली. मी पैसे टिकवलेत तुझ्या हातावर. चालायला लाग, भिकारड्या!’
‘जनकू, बबडे!ये गं. खाली उतर, बाळा.’ बिरोजा धावत्या गाडीतून फलाटावर पडतो.
‘बा! तायडे, जाऊ नकोस तू.’मुरली आणि माधो गाडीच्या मागून धावत आहेत. त्यांचा आक्रोश चालू आहे. ते गाडीत चढू पाहत आहेत.
पण त्यांच्या मानाने कोसी सतलज एक्सप्रेस खूपच वेगात धावत आहे.
आणि ते दोघे भाऊ गाडी पकडू शकत नाहीत.
समाप्त
मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी
अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈