सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ विज्ञानाचे मूळ… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते जगातले पहीले शास्त्रज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज…

सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे (आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो).

माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ७२५ वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.

उदय-अस्ताचे प्रमाणे |

जैसे न चालता सूर्याचे चालणे |

तैसे नैष्कर्म्यत्व जाणे |

कर्मींचि असता ||

सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध आहे.

मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. माऊली लिहितात,

शुक्र-शोणिताचा सांधा |

मिळता पाचांचा बांधा |

वायुतत्व दशधा |

एकचि झाले ||

शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणित पेशी स्त्रियांच्या बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत.

सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध चारशे वर्षांतील आहे. परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदती-शिवाय शोणित पेशींचा उल्लेख केला आहे. इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसते.

पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञांत बराच काळ वाद चालला होता. पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगन्मान्य झाला आहे.

माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ७२५ वर्षापूर्वीच पृथ्वी गोल असल्याचे सांगितले.

पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा |

तरी हा भूगोलचि काखे सुवावा |

तैसा विस्तारू माझा पाहावा |

तरी जाणावे माते ||

भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. आणि पृथ्वी गोल असल्याचे निःसंदिग्ध सांगताना परमाणूचाही (Micro-Electron) स्पष्ट उल्लेख केलाय.

पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे.

परंतु माऊली ज्ञानोबाराय ७२५ वर्षांपूर्वीच सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.

तया उदकाचेनि आवेशे |

प्रगटले तेज लखलखीत दिसे |

मग तया विजेमाजी असे | सलील कायी ||

सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो. ती पावसाचे शास्त्रशुद्ध तंत्र सांगणारी ओवी अशी,

मी सूर्याचेनि वेषे |

तपे तै हे शोषे |

पाठी इंद्र होवोनि वर्षे |

मग पुढती भरे ||

विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे.

या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला या पोकळीत अस्तित्वात आहेत. विश्वाला अनंत हे विशेषण लावले जाते. या विश्वात अनंत ब्रम्हांडे आहेत म्हणून भगवान अनंतकोटी ब्रहांडनायक ठरतात. परंतु माऊलीं ज्ञानोबारायांनी ७२५ वर्षापूर्वीच सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल लिहिले आहे. विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच माऊली मंगळाचे अस्तित्व सांगतात,

ना तरी भौमा नाम मंगळ |

रोहिणीते म्हणती जळ |

तैसा सुखप्रवाद बरळ |

विषयांचा ||

किंवा

जिये मंगळाचिये अंकुरी |

सवेचि अमंगळाची पडे पारी |

किंवा

ग्रहांमध्ये इंगळ |

तयाते म्हणति मंगळ |

इतकेच नव्हे, तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीत आलाय, तसेच मूळ नक्षत्र: परी जळो ते मूळ-नक्षत्री जैसे |

किंवा

स्वाती नक्षत्र:

स्वातीचेनि पाणिये |

होती जरी मोतिये |

तरी अंगी सुंदराचिये |

का शोभति तिये ||

कॅमेरा आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट यांचे मूळही ज्ञानेश्वरीत सापडते

जेथ हे संसारचित्र उमटे |

तो मनरूप पटु फाटे |

जैसे सरोवर आटे |

मग प्रतिमा नाही ||

अर्थात संकल्प-विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही.

या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता ध्यानात येईल.

विज्ञानयुगात दिशाभुल झालेल्या युवक-युवतींनी ज्ञानेश्वरीची ही शास्त्रीयता लक्षात घेऊन मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडविण्या-या संत वाड़मयाच्या सहवासात यावे.

संग्राहिका :– सौ शशी नाडकर्णी नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments