? मनमंजुषेतून ?

☆ कळताच नाही काय करावं! ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

आपण आणि आपल्या मागच्या पिढीच्या आचार विचारात फारसं अंतर नव्हतं फक्त बायकांना शिक्षण नोकरी करता आल्यामुळे वैचारीक आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पण त्यामुळे मागच्या पिढीला थोडासा बदल स्विकारावा लागला! पण आपल्या पिढीला नव्या पिढीशी जुळवताना रेस मधे धावल्यासारखं पळावं लागतय्! प्रचंड वेगाने ती पुढे चाललीय्!

आपल्या पिढीसाठी हा बदल अतिशय वेगवान आणि वेगळाच आहे!

ममा…. अग कशाला एवढ्या लवकर उठतेस?

खुप केलसं जन्मभर आता आराम कर!

अग….पण तुला ॲाफिस आहे नं नाश्ता देते करून जा! नको मी खाईन ओट्स,फ्रुटस् ते हेल्थ साठी पण चांगले असतात!

कळतच नाही काय करावं ?

ममा……. आज तुला बाहेर जायचं आहे नं?

किती वाजता ते सांग मी गाडी ड्रायव्हर पाठवते! नाहीतर उबर बुक करून देतो

अरे जाईन मी रिक्षा नाहीतर बस ने! तु काळजी नको करूस!

ममा….. घरची गाडी असताना किंवा गाडी अफोर्ड करायची ताकद असताना का तुला बस नाहीतर रिक्षाने जायचय्? आणि ह्यापुढे शहराबाहेर जायचं तर No train travel सरळ फ्लाईटची तिकीटं काढायची!

कळतच नाही काय करावं ?

अरे आज गाण्याचा कार्यक्रम चांगलाच रंगला उशीरच झाला जरा! थांब पटकन् खिचडी टाकते

ममा…….. मुलांसाठी पिझ्जा ॲार्डर केलाय् आणि आपल्यासाठी “थाय” जेवण मागवलय् उगाच घाईगडबड करू नकोस! रिलॅक्स!

कळतच नाही काय करावं?

जरा भाजी घेऊन येते आणि वाण्याला सामानाची यादी पण देऊन येते म्हणजे तो वेळेवर पाठवेल संपत आलय् सगळं आणि येताना मार्केटमधून ताजे मासे पण मिळतात का पहाते!

अहो आई……माझ्याकडे लिस्ट द्या सगळी, “नेचर बास्केट” मधून भाजी, फळं, आणि ग्रोसरी मधून वाण सामान मागवते! २ तासात येईल फिश पण हवं ते सांगा येईल!

अग……  ताजी भाजी फळं मासे बघून आणायला लागतात! असे मागवले तर कसं?

आई……. अहो सगळं ताजंच असतं तिकडून मागवलं तरी! कशाला उगाच घावपळ करताय?

कळतच नाही काय करावं?

जरा बॅंकेत जाऊन येतो रे! एक दोन चेक पण टाकायचं आहेत! बीलं ही भरायची आहेत!

बाबा कॅश ATM मधून काढा आणि बीलं आणि चेक कोणाला द्यायचे ते सांगा Transfer करून टाकतो ! NEFT करतो २ तासात जातील

कळतच नाही काय करावं?

दिवाळी जवळ येतेय् जरा वेळ काढ गं….. पूर्ण घराची साफसफाई करून टाकूया

आई……… अहो हाऊसकिपींगच्या माणसाला बोलवलय् करून जाईल तो ५/६ तासात,  काळजी करू नका!……,,

कळतच नाही काय करावं ?

वाढदिवस होता माझा! म्हटलं साऱ्यांना बोलवून साजरा करूया ! छान स्वयंपाक करते! सगळ्यांच्याच आवडीचा! फोन आला,मॅाम तुझ्या आवडीच्या गाण्याच्या कार्यकर्माची तिकीटं काढली आहेत जा संध्याकाळी! गेले तर,

सारा मैत्रिणींचा गोतावळा तिथे हजर ! त्यानंतर छोट्याश्या हॅालमधे केक कटींग देखील आणि

मेजवानी सुध्दा, सरप्राईज म्हणे!

कळतच नाही काय करावं?

सर्वात कहर म्हणजे सोसायटीत परवा एकजण गेला. कोणि नातेवाईक नाही! अंत्यसंस्कार करायला! मुलाने एका event management कंपनीला फोन केला! भटजी पासून तिरडी, ॲम्बुलंन्स, दाहसंस्कार, ते Death certificate हातात येईपर्यंत सारी व्यवस्था केली त्यांनी!

कळतच नाही काय करावं?

आता कळलंय्, जास्त विचार करायचा नाही !आणि कळून ही घ्यायचं ही नाही! जो दिवस येईल तो सुखात घालवायचा! जुन्या आठवणी आणि जुने दिवस आठवायचे पण ह्या पुढे येणारा दिवस सुखात घालवायचा…….😀😀

संग्राहिका – सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments