श्री उदय गोपीनाथ पोवळे
कवितेचा उत्सव
☆ आजकाल ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
इमारतीची उंची वाढली, माणुसकीची झाली कमी
काळाने माणूस उंचावला, व्यक्तिमत्वाची नाही हमी
पदव्या झाल्या स्वस्त, शहाणपणाची आहे वाण
खऱ्याचे झरे गहाळ, खोट्याचे डोंगर महान
स्वची भाषा वाढली, मूल्य धारातीर्थी पडली
सुखसोयी मुबलक, वेळेची कमतरता आली
हुशारी त्याची वाढली, समस्या ही वाढली
दुरूनच बोलणे त्याचे, नकोशी नाती झाली
रस्ते झाले रुंद, त्याची दृष्टी झाली अरुंद
अन्यायाचे दर्शन होता, डोळे झाले बंद
औषध झाली मुबलक, त्याचे आरोग्य मात्र कमी
जगण्यात वाढ वर्षाची, पण वर्षांमध्ये जगणे कमी
प्रेम क्वचितच करतोय, पण तिरस्कार सहज होतॊय
शुद्ध हवेसाठी झटतोय, पण मन प्रदुषीतच असतय
आवक खूप वाढतेय, पण नियत कमी होतेय
मदतीची मूठ त्याची, बंदच कायम दिसतेय
गप्पा जागतिक शांतीच्या, घरात वातावरण युद्धाचे
वाटण्या झाल्या जमिनीच्या, तुकडे झाले नात्याचे
राहणीमान सुधारले त्याचे, जगण मात्र खालावले
घर खूप विस्तारले त्याचे, कुटुंब वृक्ष रोडावले
घरं खूप सजवली त्याने, पण घरटी नसे साजेशी
वस्तू वाढल्या माणसे कमी, बोलावे तरी कोणाशी
दिखाव्याच्या खोलीत त्याच्या, खूप काही मांडलेले
मनाची खोली रिक्त त्याची, खूप काही सांडलेले
आजकाल हे असच होतय, पहिल्यापेक्षा वेगळे घडतंय
आजकाल हे असच होतय, त्याच्यासाठी ते वेगळे नसतंय
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈