सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 6 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
१२.
प्रदीर्घ काळ माझा प्रवास चालू आहे,
वाट सरत नाही
सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर
मी रथारूढ झालो,
कितीतरी तारका आणि ग्रहांच्या पथावर
माझी पावले उमटवीत आलो
स्वतः च्या नजीक येण्याचा
हा मार्ग किती पल्ल्याचा,
किती गुंतागुंतीचा,
पण किती सरळ, सोप्या सुरांकडे नेणारा!
स्वतः च्या दाराशी पोहोचेपर्यंत मुशाफिराला
प्रत्येक अनोळखी दरवाजा खटखटावा लागतो
अंतर्यामीच्या मंदिरात पोहोचण्यापूर्वी
किती परके प्रदेश धुंडाळावे लागतात!
दूरवर टक लावून माझे डोळे न्याहाळीत होते,
ते मी मिटून घेतले आणि
‘इथे आहेस तू!’ असं मला समजलं
‘कुठे शोधू तुला?’ हा चित्कार
हजारो प्रवाहांच्या ओघात
अश्रुरुपात विलीन होतो,
‘मी आहे’या आश्वासक महापुरात
विश्व भरून टाकतो.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈