श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ जगावेगळे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त:पादाकुलक)
जगावेगळी धरा आमुची
गगन आमुचे जगावेगळे
जगावेगळे तीर्थ आमुचे
यात्री आम्ही जगावेगळे !
विश्व मानुनी घरट्याला रे
सुखे नांदती सर्व पाखरे
अखंड अमुच्या शापित पंखी
नभापारचे खूळ सळसळे !
आलो सोडुन सुवर्णनगरी
त्या बेड्या ते पाश रुपेरी
झेलुन जखमा नक्षत्रांच्या
ह्रदयाशी आकाश घेतले !
पानगळीचा ऋतू निरंतर
अरण्य जेथे ओकेबोके
होत साजरे तिथेच अमुचे
ऋतुरंगांचे नित्य सोहळे !
प्रकाश व्हाया जरा दुजांचा
विझवुन आलो निजज्योतींना
मुळि न थांबलो दुवे घ्यावया
आनंदाश्रू तमात पुसले !
अशीच बुडता नभी पापणी
जावा जीवनओघ थांबुनी
जगावेगळे अमुचे जीवन
मरणही व्हावे जगावेगळे !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूपच अर्थपूर्ण सुंदर काव्यरचना